विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 November 2023

घाटवाटा

 






घाटवाटा ❤️❤️
सह्याद्रीतील घाटवाटा म्हणजे जणू काही धमण्या आणि रक्तवाहिन्या म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्याच घाटवाटांना प्राचीन काळी खूप महत्व होत, मग त्या निर्माण झाल्या असतील किंवा निर्माण केल्या असतील. माझी स्वतःची भटकंती सुरु झाली ती गड-किल्ले वारीने! दिवसेंदिवस आवड वाढत गेली आणि दर शनिवार- रविवार सह्याद्री खुणाऊ लागली. त्यातल्या काही केलेल्या गड किल्ल्यांच्या वाऱ्या ह्या घाटवाटांतून पण झाल्या होत्या, पण हे कळायला थोडा उशीर लागला. जस जसा वाचनाद्वारे / संगतीद्वारे अभ्यास वाढला तशी ज्ञानात भर पडत गेली आणि हळू हळू समजायला सुरवात झाली, पण अजून खूप समजायचं बाकी आहे.
फाल्कन आणि अनवट म्हणजे खूप वेगळ्या अश्या घाटवाटा सफर हे एक समीकरणच झाले आहे. आता प्लॅन होता तो रायगड च्या प्रभावळीतल्या दोन घाटवाटांचा. जननीच्या नाळेने उतरून भिकनाळेने वर यायचं. दोन्ही वाटा खाली पणदेरी मध्ये उतरतात.
रायगड ते तोरणा या परिसरात बोचेघोळ, बिंब नाळ , गायनाळ, बोराट्याची नाळ, सिंगापूर नाळ, तवीची नाळ, आग्यानाळ, फणशीची नाळ, फडताड नाळ , भीकनाळ , जननी ची नाळ अश्या बऱ्याच घाटवाटा आहेत. ह्यातील बऱ्यापैकी वाटा पूर्वी वापरात असाव्यात पण कालांतराने लोप पावत चाललेल्या.
नेहमीप्रमाणे दिलीप दादांचा, मेसेज आला आणि 19 तारखेचा प्लॅन नक्की झाला. हे श्री दिलीप वाटवे म्हणजे सह्याद्रीतील गड किल्ले , आणि घाटवाटांची खडा अन खडा माहिती असणारे, ती हि ऐतिहासिक आणि भौगोलिक! मग काय आम्ही चौदा जण 18 च्या रात्री 10 वाजता चिंचवड हुन निघालो. सगळं सामान घेऊन बरोबर चालायचं होत म्हणून मोजकंच सामान घेऊन साधारण 11:00 वाजता वारज्यातून निघून वेल्ह्यामार्गे दीड वाजता कुसारपेठ येथे पोहचलो. पोहचताच मुक्कामाच्या ठिकाणी झोपी गेलो.
सकाळी कोंबड्याच्या अरवण्याने विना गजर भल्या पहाटे चार पासूनच जागा होतो. आवरा आवर करून , तांत्रिक सामग्रीसह आम्ही सर्व जण पावणे सात ला श्री कोंडीबा कचरे उर्फ कोंड्या नाना बरोबर जननीच्या नाळेकडे निघालो.
पठारावरून मळलेल्या वाटेने, कारवीपर्यंत पोहचलो. इथून वाटा फसव्या आहेत आणि अजिबात मळलेली नाही. कदाचित पावसाळ्यानंतर तिकडे जाणारे आम्हीच असू त्यामुळे कसरतीने दाट वाळलेल्या कारवीतून वाट काढत साधारण दीड तासांच्या पायपिटीनंतर जननी मातेच्या राईत पोहचलो. तिथेच सामान ठेऊन पुढे दुर्गा च्या माळावर गेलो जिथून लिंगाणा, बोराट्याच्या नाळेचा ट्रायव्हर्स, आणि समोर रायलिंग पठार स्प्ष्टपणे दिसत होत. नंतर दिलीप दादांनी आम्हाला समोर दिसणाऱ्या नाळांची भौगोलिक माहिती दिली आणि त्यांनी केलेल्या खडतर अश्या बिंब नाळ ट्रेकच्या आठवणी सांगितल्या. बिंब नाळ पूर्ण खडी आणि तेवढीच कठीण. बघूनच रौद्र रूप जाणवत होत. पुढे परत राईत येऊन आरती केली. दिवा बत्ती करून जननी मातेला नतमस्तक होऊन पुढे कूच केली. अचानक कोंड्या नानांनी आमचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले.
सुरवात केली ती रॅपलिंग नी. प्रवीण आणि मंगेश सरांनी पूर्ण सेट अप लावला.जननी नाळ उतरताना सुरवातीला जवळपास 80 फुटांचा पॅच रॅपल करून उतरून खाली नाळ उतरायला सुरवात केली. अर्धा तास खाली उतरल्यावर पूर्ण ड्रॉप होता आणि वाट सापडत नव्हती . मग दिलीप दादांचा अनुभव कामी आला आणि दादांनी वाट शोधून काढली. पुढे दोन ठिकाणी रोप लावून मध्यात पोहचलो. पुढे गर्द झाडा झुडपातून दादा वाट काढत होते आणि आम्ही त्यांच्या मागे ! शेवटी दुपारी दोन वाजता एका पाणवठ्यावर पोहचहलो, यथेच्य पाणी पिऊन बाटल्या भरून घेतल्या आणि लगेचच पुढे भिकनाळेला निघालो. आज पाणी म्हणजे आमच्यासाठी अमृत होत ! इथपर्यंत पोहचेपर्यंत पूर्ण ट्रायव्हर्स वरून आलो होतो आणि पदरात उतरलो होतो.
पुन्हा वाट शोधत पुढे शेवटी भिकनाळेला लागलो. वर ऊन तापत होत , त्यात अजिबात वाऱ्याचा कण पण नव्हता. खडी चढाई पार करत एका रॉक पॅच ला पोहचलो. इथं खरा कस लागणार होता. मग काय नाळेत दहीहंडी करून आमचा गोविंदा संदीप ने पुढे जाऊन दोर लावला. दहीहंडीत सगळ्यात खालच्या थराला पैलवान हरीश कुलकर्णी होते. दोराच्या साहाय्याने एक एक जण करून वर जात होते आणि शेवटी अंधार पडायच्या आत आम्ही U मध्ये पोहचलो.
बॅक लीड टीम ची हि कसब होती कारण पूर्ण तांत्रिक सेटअप काढून त्यांनी ट्रेक अंती फ्रंट लीड ला गाठले.
इथं ट्रेक संपला नव्हता कारण इथून पुढे परत दीड दोन तास लागणार होते कुसारपेठ मध्ये पोहचायला! पुन्हा एकदा दाट कारवीच्या जंगलातून वाट काढत पुढे कूच केली. सूर्य मावळला होता आणि प्रत्येकाच्या टॉर्च च्या प्रकाशात पुढे जात होतो. कुसरपेठ च्या पंधरा मिनिटेच आधी अति विषारी पट्टेरी मण्यार सर्पाचे दर्शन वाटेवरच झाले. त्यानंतर साधारण सव्वा सात ला कुसूरपेठ मध्ये पोहचलो.
तांत्रिक सामग्रीची बांधणी करून लागेचच वेल्ह्याकडे निघालो. तिथे हॉटेल तोरणा ला नेहमीपेक्षा डबल आडवा हात मारून असंख्य आठवणींनी रात्री साडे दहा ला पुणे गाठले.
ह्या ट्रेक चे वैशिष्ठ्य म्हणजे विना वाटाडया, आणि न मळलेल्या अनवट अश्या दोन्ही घाटवाटांचा ट्रेक झाला तो म्हणजे दिलीप दादांच्या तगड्या अनुभवामुळे आणि खंबीर नेतृत्वामुळेच !
अश्या ह्या अनवट घाटवाटांचा ट्रेक बरंच काही शिकवून गेला त्याची येणाऱ्या काळातील भटकंती साठी खूप मदत होईल !
भेटूया लवकरच पुढच्या मोहिमेला !
टीप : हा ट्रेक तांत्रिक सामग्री शिवाय करू नये. सोबत वाट शोधण्याची कसब असणे गरजेचे आहे !!
हरीश कुलकर्णी 🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...