या सर्व लुटीसह महाराज परत फिरले तेंव्हा मोगलांचे सरदार रणमस्तखान , आसफखान , जाबीतखान व केसरसिंग सरदारखान आणि दहा हजाराची फौज महाराजांच्या वर चालून आली . या मोगली सरदारांनी महाराजांना गाठून त्यांच्या वर कठीण प्रसंग आणला होता . सिदोजी नाईक निंबाळकर पंचहजारी सरदार महाराजांच्या सोबत होते . यापूर्वी महाराजांनी मोगलांचे जुन्नर , अहमदनगर , सुरत , कारंजा ही शहरे लुटुन स्वराज्य कार्यासाठी संपत्ती आणली होती . त्या वेळी लुट आणताना महाराज कधी एवढे अडचणीत आले नव्हते . यावेळी मात्र त्यांना मोगल सरदार आणि त्यांच्या ताज्या दमाच्या फौजेशी सामना करायचा होता . महाराजांच्या सोबत असलेली मराठा फौज सततच्या दौडी मुळे दमलेली होती . अश्या प्रसंगी सिदोजी निंबाळकर यांनी मोगल सरदारांना थोपवून धरण्याचा मनसुबा महाराजांना बोलून दाखवला . त्या प्रमाणे चार पाच हजारांचे सैन्य घेऊन ते शत्रूला सामोरे गेले . काही निवडक सैन्य सिदोजी निंबाळकर यांना देऊन बाकीच्या सैन्यांच्या सह आणलेल्या लुटीसह शिवाजी महाराज पट्टा किल्ल्या कडे निघून गेले . मोजक्या लोकांच्या मदतीने सिदोजी निंबाळकर यांनी मोगलांशी सतत तीन दिवस प्रखर झुंज दिली . शत्रूला थोपवून धरण्यात ते यशस्वी झाले . शिवाजी महाराज पट्टा किल्ल्यावर 22 नोव्हेंबर 1679 रोजी सुखरूप पोहचले . मात्र मोगलांच्या सैन्याला तोंड देत असताना सिदोजी निंबाळकर धारातीर्थी पडले . ही खबर ऐकून महाराजांना फार दुःख झाले .
याच पट्टा किल्ल्यावर संभाजी राजे मोगलांच्या तावडीतून सुटुन परत स्वराज्यात दाखल झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना मिळाली .
No comments:
Post a Comment