विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 December 2023

सरदार आनंदराव थोरात गढी - पानोडी

 




सरदार आनंदराव थोरात गढी - पानोडी
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पानोडी या गावात मराठ्यांचे शूर सरदार आनंदराव थोरात यांची भव्य गढी उभी आहे. पानोडी हे गाव संगमनेरपासून २५ कि.मी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भारताच्या स्वातंत्र्यपर्यंत योगदान दिलेलं हे घराणं आजही तितकेच आदराने वागणे विचारपूस करणे हे संस्कार भेटीदरम्यान दिसून येतात. गावात प्रवेश करतानाच ह्या भव्य वास्तूचे दर्शन होते. ह्या वास्तूत प्रवेश करतानाच दारात आपल्याला एक जाते दिसते ते जाते बैलांनी चालविले जायचे. संपूर्ण सैन्याची रसद पुरवण्यासाठी ह्याचा उपयोग होत असे. आतमध्ये असलेले भूमीगत धान्यकोठार ज्यात जवळपास ३०० पोती धान्य बसेल इतके मोठे आहे. मुदपाकखाना एकदम भव्य त्याला असलेले धुराडे, पाणी घेण्याची वेगळी आणि विशिष्ट पद्धत हे सर्व पाहून आश्चर्यचकित होतो. काळाच्या ओघात आतमध्ये पडझड झाली आहे पण आपल्या खूणा आजही जिवंत ठेवल्यात या गढीने.गढीच्या बाहेर आडातून पाणी काढण्याची व्यवस्था, भव्य भिंती, काष्ठशिल्प, विविध पाषाणातील वस्तू, स्वयंपाक घरातील वस्तू, जुने रेडिओ, थर्मास अशा अनेक गोष्टी आणि त्या सर्व गोष्टी दाखवताना असलेली आपुलकी खरच धन्य करते. सरदार थोरातांचे वंशज विक्रम थोरात सर खूप व्यवस्थित सर्व दाखवितात.
मूळ आनंदराव थोरात दिनकरराव जहागीरदार ठाणे मौजे वीरगावपैकी अकोले, जि. अहमदनगर यांनी शिवकालात शिकस्तीचा पराक्रम केल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. सिन्नर, पारनेर, संगमनेर, अकोला, जुन्नरचा काही भाग • असलेल्या शिवनेरी परगण्यातील ७२ गावांची जहागिरी थोरातांकडे होती. थोरातांचे मूळ गाव वाळवे हे असल्याचे सांगितले जाते.पुणे जिल्ह्यातील वाळकी येथेही त्यांची एक शाखा आहे.
छत्रपती. शिवाजीमहाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली आनंदराव मकाजी हे सरदार होते. छ. शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटले त्या वेळी प्रतापराव गुजरांच्या बरोबर आनंदराव शहाजादा मोअजमकडे तहासाठी गेले होते. इ.स. १६७२ मध्ये प्रतापराव व आनंदराव यांनी बहलोलखान मोहोकमसिंग व दरकोजी भोसले यांना युद्धात पकडले. त्यांचे अकरा हत्ती व १७०० घोडे लुटले. ९ मार्च ते ७ एप्रिल १६७३ च्या दरम्यान आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोवर प्रतापराव व आनंदराव यांनी सामना दिला.
इ.स.२२-२३ मार्च १६७४ रोजी आनंदरावांनी संपगाव बाजारपेठ लुटली. इ.स. १६७४ मध्ये औरंगजेबाचा कुतुबशाहीतील मुलूख उदध्वस्त करण्यास व वाईपासून लक्ष्मेश्वरापर्यंतचा मुलूख आपल्या ताब्यात आणण्यास महाराजांनी आनंदरावांस आज्ञा दिली. बंकापूर येथे खिदरखानाशी सामना करून त्याचे दोन हत्ती घेतले. इ.स. १६७७ मध्ये छ. शिवाजीमहाराजांबरोबर आनंदराव भागानगरला गेले होते. २२ जुलै १६७८ रोजी आनंदराव व रघुनाथपंत हणमंते यांनी बेलूरचा किल्ला घेतला. १० मार्च १६७९ रोजी आनंदरावांनी दोड्ड वाळापूर जिंकले. बहललोलखानावरील हल्ल्याच्या वेळी प्रतापरावांच्या बरोबर आनंदरावांनी जो पराक्रम केला त्याचे वर्णन जयराम पिण्ड्ये यांच्या 'पर्णाल पर्वतग्रहणाख्यानम् याकाव्यात त्यांनी असे केले आहे
पपात पृष्ठतो भून्वा वीरैः कतिपयैस्तदा । सोऽतिविंद्धोऽपि दैस्तैर्मस्तके दत्तखेटकः ॥७०॥ अध्याय ५ प्रविष्टः खङ्गमुद्यस्य पठाणविकटाटवीम् । तेनैवात्पुलवणं तेषां कटकं घटिकात्रयम ॥७१॥ अ. ५
अर्थ- लगेच युद्धश्रीने चमकणाऱ्या आनंदरावाने त्यांच्या पिछाडीला होऊन काही वीरांसह त्यांच्यावर हल्ला केला. क्रुद्ध शत्रूंनी त्यास अतिशय जखमी केला असता तो डोक्यावर ढाल धरून व तलवार उगारून पठाणसेनारूपी भयंकर अरण्यात घुसला आणि त्यानेच तीन घटकांपर्यंत शत्रुसैन्याची त्रेधा उडविली.
याशिवाय आनंदराव छ. शिवाजीमहाराजांबरोबर कर्नाटक मोहिमेत असल्याचे उल्लेख आढळतात. पेशवेकालीन अनेक कागदपत्रांतून थोरातांच्या वतनासंबंधी उल्लेख आढळतात.थोरातांना 'दिनकरराव' ही पदवी भोसले शाहूमहाराजांच्या काळात मिळाल्याचा देख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळतो.
आधुनिक काळात १९२५ साली अहमदनगरच्या जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली. त्याचे पहिले निर्वाचित अध्यक्षपद भूषविण्याचा मान या घराण्यातील मा. श्री. शिवराम थोरात यांना मिळाला. त्यांना 'सरदारसाहेब' असे म्हणत असत.
बडोदानृपती सयाजीराव गायकवाड यांनी उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांना विलायतेस पाठविले त्यास सरदारसाहेबांची शिफारस होती. पानवडी येथील गढीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले होते. त्याचप्रमाणे क्रांतिसिंह नाना पाटील, आदरणीय यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, डॉ. पंजाबराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ, ना.पी.सी. पाटील यांनी पानवडी येथील वाड्यास भेट दिली होती. नित्यनेमाने दैनंदिनी लिहिणारे सरदार साहेब लोकसंग्रह आणि पत्रव्यवहार यांच्यामुळे अत्यंत लोकप्रिय असे नेते होते.. सन १९५२च्या विधानसभा निवडणुकीत ते श्रीगोंदा-कर्जत मतदारसंघातून आमदार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोरारजीभाईच्या मनाविरुद्ध भाग घेतला. दि. ३ एप्रिल १९५६ चे त्यांचे विधानसभेतील भाषण हे त्यांच्या वाक्पटुत्वाची व सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे. त्यांचे चरित्र एका ग्रंथाचा विषय होऊ शकते.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...