विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 November 2025

सवाई माधवराव

 रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६-६।। च्या सुमाराला वाताच्या झटक्यात ( हिस्टेरिया ) शनिवारवाड्यातील गणेश महालाच्या वरच्या मज-त्यावरील स्वतःच्या दिवाणखान्याच्या सज्जातून (बाल्कनी) माधवराव तोल जाऊन खाली कारंजाच्या कठड्यावर पडले. उजव्या मांडीला मोठी जखम झाली. अस्थीभंग झाला. जबड्याच्या उजव्या बाजूला मार लागून दाताची कवळी बाहेर निघाली. नाकावाटे रक्त वाहू लागले,

अपघाताची बातमी समजताच नाना फडणीसांनी तातडीने येऊन माधवरावांना आरसे महालात आणवले. वैद्य व हबीब (अस्थी तज्ञ) बोलावून ताबडतोब उपचार केले. पण काहीही उपयोग न होऊन, मंगळवारी २७ ऑक्टोबर सन १७९५ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमाराला (राक्षस-नाम संवत्सर, अश्विन शु. १४ शके १७१७) माधवरावांचा १५८ अपघाती अंत झाला. *
त्याचबरोबर नाना फडणीसांनी 'शर्थीने राज्य राखण्यासाठी' २३ वर्षे केलेले प्रयत्न वाया गेले. 'श्रीमंत आमरणांत बोलत होते. बोलून चालून राजश्री नानास सांगितले. 'आमची वेळ जवळ आली. आम्हास राज्याची इच्छा नाही. तुम्ही आमचे नावाचा दुसरा करणे. आपण सूर्यमंडळ भेद करून जातो.

सवाई माधवरावांच्या मृत्यूबद्दल इंग्रज वकील युथाप म्हणतात : १६० "The death of the Peshwa in consequence of a fall from an upper appartment.' जास्त चौकशी केल्यानंतर युथाप म्हणतो: 'The Peshwa in a temporary fit of delirum or derrangement jumped or fell from an upper room or terrace into a fountain below.' 'सवाई माधव-रावाने गणपतीचे दिवाणखान्याचे दुसऱ्या मजल्यावरून दक्षिणेकडे कारंजांचे हौदात उडी टाकली.
हा दिवाणखाना पूर्व बुरुजाजवळ आहे, तर हजारी कारंजे पश्चिम भागात आहे यावरून सवाई माधवरावांनी उडी टाकली ती हजारी कारंजावर नव्हे, तर आठ कारंजाचे हौदावर. ६ जानेवारी १८०६ ला सवाई माधवरावांच्या अस्थी प्रयागला पाठवल्या.

Thursday, 20 November 2025

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले

 २३ ऑक्टोबर १६६२ रोजी,


छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे...

छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते...
शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. "मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे...'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत. १९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते...
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥

शिवरायांच्या वैचारिक प्रज्ञेचा “असामान्य कल्पकता”

 असामान्य कल्पकता ।।


शिवरायांच्या वैचारिक प्रज्ञेचा “असामान्य कल्पकता” हा मुख्य पैलू होता. परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो त्यांच्या व्यक्तिमत्वातील अष्टपैलू गुण नेहमी दिसून येत असतं. शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थाने यांना शिवरायांनी कधीही थारा दिला नाही. याउलट आपल्याच जाळ्यात शत्रुला पकडण्यात ते यशस्वी होत असत. आग्र्याला गेल्यावर ज्यावेळी त्यांना नजरकैदेत ठेवले गेले त्यावेळी त्यांची असामान्य कल्पकता आपल्याला पहावयास मिळते. औरंगजेबाच्या कपटाला आणि कारस्थानाला दाद न देता अगदी यशस्वीरित्या शिवराय तिथून निसटले आणि औरंगजेबाला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या पराभवाचे दर्शन घडवून दिले. सदैव जागृत असणे, गाफील न राहणे, नेहमी आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे अशा गुणांमधून शिवरायांचे अद्वितीय अष्टावधान दिसून येते...!
डग्लस म्हणतो, “एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते तसा शिवाजीराजा सतत कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात जे राजाच्या लहानशा बोटांत होते ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे त्यांची झोप सावध असे...”
धाडसाच्या बाबतीत ऑर्मची साक्ष अर्थपूर्ण आहे. तो म्हणतो, “एका हातात नागवी तलवार घेऊन घोडदौड करीत शिवाजीराजा शत्रूच्या प्रदेशावर चालून जात असल्याचा प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे त्याचे सैनिक इतरांना अभिमानाने सांगत असत...”
: पराक्रमापलीकडले शिवराय.

२४ ऑक्टोबर “मराठा आरमार दिन”.

 


२४ ऑक्टोबर “मराठा आरमार दिन”...

🚩
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल, आदिलशाह, निजामशहा, कुतुबशाह इ. यांनी देखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही...
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्या नंतर तेथील समुद्र पाहून सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले.धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली पोर्तुगीज तर स्वतःला हिंदी महासागराचे मालकच समजत समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत मोगलांची हि स्थिती.. त्यावेळच्या सागरी किनारपट्टी वरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली...
शिवाजी महाराजांनी इ.स १६५६ मध्ये जावळी काबीज केली. जावळी मध्ये कोकणाचा बराचसा भाग येत असल्याने राजांचा कोकणात प्रवेश झाला ४ नोव्हेंबर १६५६ पूर्वी मराठ्यांच्या सिद्दीशी अनेक झटापटी झाल्या ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ या कालावधीत शिवरायांनी १००किमी. लांबीचा समुद्रकिनारा व मुलुख मिळविला. मिळविलेल्या या नव्या मुलुखाच्या संरक्षणासाठी व सिद्दीच्या कुरापती थांबविण्यासाठी व त्याला समुद्रमार्गे मिळणारी रसद तोडण्यासाठी नाविक दल (लढाऊ आरमार) असणे गरजेचे होते त्यासाठी योग्य अशी जागा/तळ असणे गरजेचे होते ऐन समुद्रामध्ये नौका बांधता येत नाहीत लष्करीदृष्ट्या समुद्रामधून आत घुसलेली खाडी हि जहाजबांधणीसाठी उत्तम जागा असते...
आणि अखेर तो दिवस उजाडला...!
२४ ऑक्टोबर १६५७ रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी व पेन येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली, यावर्षी या घटनेस ३६५ वर्षे पूर्ण झालेली आहेत हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे...
अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली म्हणून ‘२४ ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ साजरा केले जात. भारतीय मराठा आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते...🙏🚩
सर्वाना मराठा आरमार दिनाच्या सह्याद्री, जलदुर्ग एवढ्या शुभेच्छा...
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे ।।

बसरूरची मोहीम

 २४ ऑक्टोबर, मराठा आरमार दिन,


बसरूरची मोहीम..

🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वादळी कारकिर्दीत अनेक लढाया केल्या, वेळप्रसंगी तह केले, कित्येकदा यशस्वी माघार घेतली, छापा टाकून शत्रूचा पराभव केला, समोरा समोर भेटून कोथळा बाहेर काढला, पण सर्व अतुलनीय पराक्रमांना मागे सोडणारी एक लढाई तुमच्या अंगावर शहारे आणल्या शिवाय राहात नाही. ती म्हणजे "बसरूरची आरमारी मोहीम" या मोहिमेच नेतृत्व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे, जे विजापूरच्या आदिलशाही सत्तेला, आशिया खंडातील बलाढ्य सत्तेचा बादशहा औरंगजेबाला उभ्या हयातीत साधता आले नाही ते शिवरायांनी वयाच्या ३५ व्या वर्षी करून दाखवले, त्यामुळे ह्या मोहिमेला मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे...
१. छत्रपती शिवाजी महाराजांचे सागराशी परिचय माणसाच्या मनात आलं अन काम साध्य केलं अस कधीच होत नाही, त्यामागे अथक परिश्रम, दूरदृष्टी, अचूक व्यवस्थापन गरजेचे असते. महाराजांनी १६६५ ला यशस्वी केलेल्या बसरूरच्या मोहिमेची बीज १० वर्षे आधीच जावळी प्रकरणात रोवली गेली होती. मग्रूर जावळीच्या मोऱ्यांच पारिपत्य केल्यावर रायरीचा (रायगड) किल्ला ताब्यात आला अन स्वराज्याची सरहद्द थेट समुद्राला भिडली व सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्या सागरी शत्रू सत्तांशी शिवरायांची ओळख झाली...
२. आरमाराची स्थापना व विस्तार : किनारपट्टीच्या सुरक्षित करायची असेल तर सिद्धी, इंग्रज पोर्तुगीज यांच्याशी दोन हात करावे लागतील, त्यासाठी दर्यालाच वेसण घालावी लागेल हे महाराज जाणून होते, यथावकाश १६५७ मध्ये कल्याण, भिवंडीचा प्रदेश महाराजांनी जिंकून घेत राजापूरपर्यंतचा प्रदेश काबीज केला, २४ ऑक्टोबर १६५७ ला कल्याणच्या खाडीत आरमार उभारणीला प्रारंभ करत, हजारो वर्षात हिंदुस्तानच्या इतिहासात जे झाले नाही ते करून दाखवले. जहाजे बांधायची म्हंटल्यावर कारागीर हवेत अन डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आपल्या मराठी माणसांकडे जहाज बांधणीची कला अवगत असणे अशक्यच. वसईला जहाज बांधणीत निष्णात असलेले पोर्तुगीज कारागीर होते. रुई लैंताव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस लैंताव या बाप लेकांच्या बरोबर तब्बल ३५० पोर्तुगीज कारागीर कामाला लागले. इथं महाराजांची मुत्सद्देगिरी वाखाणण्याजोगी आहे, बांधत असलेलं आरमार हे जंजिऱ्याच्या सिद्यांचा विरोधात वापरणार आहे असं जाहीर केले होते.(पुढे याच आरमाराने सिद्यांसहित डच पोर्तुगीज इंग्रजांची दातखीळ बसवली, खांदेरी उंदेरी प्रकरण तर कळसच) पुढे वसईचा कॅप्टन आंतोनियू मेलू द कास्त्रूच्या पत्रावरून हि पोर्तुगीज कारागीर मंडळी आरमाराच काम सोडून रातोरात वसईला निघून गेली. दरम्यानच्या काळात १६५७ ते १६५९ मध्ये २० जहाजे तयार झाली होती...
३. बसरूरचीच मोहीम का : बेदनूरचा राजा (स्थानिक लोक बेदनूर म्हणत व पोर्तुगीज इंग्रज बार्सिलोर म्हणत) शिवाप्पा नायकाने १६४५ ते १६६० आदिलशाहीच्या दुर्बलतेचा फायदा घेत डचांच्या मदतीने महाबळेश्वरपासून निळेश्वरपर्यंतची किनारपट्टी काबीज केली. १६६० ला शिवाप्पा मृत्यू पावला, त्याचा मुलगा भद्रप्पा आणि भाऊ वेंकटप्पा ह्यांच्या सत्तासंघर्ष झाला, शेवटी १६६१ ला वेंकटप्पा गादीवर आला, पुन्हा एका वर्षात भद्रप्पाने गादी मिळवली, १६६४ ला भद्रप्पा मृत्यू पावला अन ह्या अनागोंदीचा फायदा उचलत आदिलशहाने या प्रदेशात भरमसाठ खंडणी वसूल केली हे महाराजांना समजले, ह्या स्थळावर स्वारी केली तर भरपूर धनार्जन होईल असे महाराजांना वाटले अन महाराजांनी योजना आखली...
४. बसरूरच्या मोहिमेची पूर्वतयारी : महाराजांच्या मनात आलं आणि अचानक मोहीम उघडली अशी एकही घटना माझ्या तरी वाचनात नाही. प्रत्येक मोहिमेआधी त्या प्रदेशाची खडान्खडा माहिती, चोरवाटा, शत्रूची बलस्थाने, कमकुवत बाजू, जाण्याचा मार्ग, येण्याचा मार्ग, शत्रूची फौज, दारुगोळा, या सगळ्याची गुप्तपणे इत्यंभूत माहिती जमवून महाराज मोहिमेची आखणी करत. २६ नोव्हेंबर १६६४ च्या इंग्रज पत्रावरून समजते कि महाराजांची ८० जहाजे भटकळ बंदरापर्यंत जाऊन पुन्हा माघारी आली होती. (बसरूरचा मार्ग ह्याच बंदरातून जातो)...
५. मोक्याच्या क्षणी हल्ला : बसरूरला पोहोचायचे म्हणजे जमिनीवरून जाणे शक्य नाही. एकमेव पर्याय सागरी मार्ग. मी वरती दिलय कि पूर्वतयारी म्हणून महाराजांची काही जहाजे १६६४ मध्ये भटकळ पर्यंत जाऊन आली होती. पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना दिले ते समारंभपूर्वक हस्तांतरित करण्यासाठी दिनांक ८ फेब्रुवारी १६६५ ला मोठा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला होता, त्यासाठी पोर्तुगीज आरमार मुंबईला गेले होते, ह्याच नामी संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलत निर्धोकपणे बसरूरकडे प्रयाण करायचं ठरवलं, मित्रहो हि आहे शिवाजी महाराजांच्या सक्षम हेरखात्याचे दमदार कामगिरी, विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात समुद्रही शांत असतो. हे निसर्गाचे योग्य आकलन...
६. मिर्झाराजाचे संकट : बसरूरच्या मोहिमे दरम्यान औरंगजेबाचा विश्वासू सरदार मिर्झाराजा आणि दिलेरखान बलाढ्य फौजेनिशी स्वराज्यात उतरत होता, ३ मार्च रोजी ते पुण्यात पोहोचले पण अशाही स्थितीत महाराज विचलित झाले नाहीत त्यांनी बसरूरची मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून दिले...
७. बसरूरच्या आरमारी मोहिमेचा लेखाजोखा : ८ फेब्रुवारीला मालवणहुन तीन मोठी गलबते, ८५ छोटी गलबते, ६-७ हजार सैन्यबळ घेऊन राजे गोवा, कारवार, कुमठा, होनावर, भटकळ, या मार्गाने १३ फेब्रुवारीला गांगुळी बंदरापाशी पोहोचले. येथून भूमार्गाने चालत महाराज बसरूरला पोहोचले. शहरावर छापा मारून व्यापाऱ्यांकडून खंडणी जमा करून महाराज गलबताने गोकर्णामार्गे अंकोल्याला परतले. प्रत्यक्ष ह्या मोहिमेत आरमारी लढाई झाली नसली तरी, पोर्तुगीजांच्या नाकावर टिच्चून महाराज २०० किमी चे अंतर ५-६ दिवसांत समुद्रमार्गे पार करून गेले व अगणित माल, जडजवाहर तब्बल २ कोटी होनांचा ऐवज (सभासदाच्या नोंदीनुसार) घेऊन स्वराज्यात परतले हि हिंदुस्तानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी घटना आहे...
भारतीय मराठा आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते...🙏🚩
सर्वाना मराठा आरमार दिनाच्या सह्याद्री, जलदुर्ग एवढ्या शुभेच्छा...
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे ।।

सेनापती संताजी-धनाजींचा बेळगाव-धारवाड प्रदेशात धुमाकूळ...

 २७ ऑक्टोबर १६९२ रोजी,


सेनापती संताजी-धनाजींचा बेळगाव-धारवाड प्रदेशात धुमाकूळ...

🚩
या सुमारास मराठ्यांचे सेनानी संताजी आणि धनाजी बेळगाव-धारवाड या कर्नाटक प्रदेशाच्या सीमेवर धुमाकूळ घालीत होते. (सप्टें. ऑक्टबर, १६९२)..
प्रथम त्यांनी बेळगावच्या परिसरातील किल्ले व ठाणी जिंकून घेतली. उभ्या पिकांत लष्कराची घोडी घालून त्यांची नासधूस केली. एवढेच नव्हे तर खुद्द बेळगावच्या किल्ल्यासही त्यांनी वेढा दिला. लवकरच हा वेढा उठवून संताजी जिंजीच्या दिशेने गेले पण लगेच विचार बदलून ते बेळगावकडे आले. तिथे काही दिवस संचार पुन्हा करून तो व धनाजी धारवाडकडे गेले आणि धारवाडच्या किल्ल्यास त्यांनी वेढा दिला. सेनानी संताजी आणि धनाजी यांच्या या कर्नाटक प्रदेशातील हालचालींची माहिती आपणास केवळ औरंगजेबाच्या दरबारातील अखबारांतून मिळते. हे अखबार म्हणजे दरबारातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी बातमीपत्रेच होती. मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासास ही बातमीपत्रे बहुमोल मदत करतात. त्यांच्या साहाय्यानेच मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील त्यांच्या शेकडो लढाया व हालचाली यांच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळते..
● २७ ऑक्टोबर १६९२ चे बातमीपत्र म्हणते...,
“हरकाऱ्यांच्या तोंडून बातमी आली की; धनाजी जाधव व संताजी घोरपडे हे आजमनगर बेळगाव भागातून बाहेर पडले ते धारवाडला पोहोचले असून, त्यांनी धारवाडच्या किल्ल्याला वेढा दिला आहे...” पण लवकरच धारवाडचाही वेढा उठवून मराठे नरगुंदकडे निघून गेले. नोव्हेंबरच्या मध्यावर ते कर्नाटकातील गोविंदगडाजवळ होते आणि त्यांच्या मागावर विजापुरी कर्नाटकाचा मोगल फौजदार कासिमखान हा होता..
● सेनापती संताजी घोरपडे यांनी ही लढाई गनिमी काव्याने खेळून ती कशी जिंकली, हे समजून घेण्यासाठी गव्हर्नर मार्टिनच्या डायरीतील नोंद काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे. संताजीच्या विजयाचे साग्र वर्णन पांदेचरीचा फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत केलेले आहे. मार्टिनसारख्या परकीयाने दक्षिण हिंदुस्थानातील या महत्त्वाच्या लढाईचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की, ते वाचून मार्टिनच्या चौकस बुद्धीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. संताजींच्या गनिमी काव्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मार्टिनच्या डायरीतील उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे :
मार्टिन लिहितो...,
“Ali Mardan Khan ordinarily held the plain with 1200 to 1500 horse for the security of the convoys. This month he was escorting a very large convoy to the camp. Santaji Ghorpare, a famous Maratha was coming from the other coast with 10 to 12 thousand horsemen to reinforce Jinji and received intelligence of the Mughal convoy being escorted by Ali Mardan. This General, clever and expert in the art of war, posted himself on the route by which the Moors (Mughals) had to pass. He chose the terrain for his premediated design and when it appeared that the enemy was near, he caused one part of his cavalry to fall back and himself appeared before the enemy with only 2 or 3 thousand horse. The Muslim cavalry, which didnot reck a corps of the Marathas twice as numerous as themselves, gave chase to Santaji, His retreat was well-planned; it appeared that Santaji was only trying to get time; but when the enemy came near the place where the remainder of the Maratha cavalry was posted, the Moors (the Mughals) were enveloped and after a fight of many hours, although their strength was very unequal, the escort was totally defeated. The Marathas seized and took into Jinji without any opposition, Ali Mardan Khan, many of his officers, many merchants who have believed the opportunity safe for going to that side, five elephants, 300 good horses, the baggage, and generally all the convoy and transport animals..”
(या प्रदेशातील मोगल रसदींचे संरक्षण करण्याची जबाबदारी अलिमर्दानखान हा आपल्या १२००/१५०० घोडदळानिशी सांभाळत असे. या महिन्यात जिंजीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदेचे संरक्षण करण्याचे काम तो करत होता. मराठ्यांचा नामांकित सरदार संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातून जिंजीच्या मदतीला आपल्या १०-१२ हजार घोडदळासह निघाला होता. त्याला ही मोगली रसदेची बातमी समजली, तेव्हा युद्धकलेत अत्यंत हुशार व निष्णात असणाऱ्या या मराठा सेनानीने आपले लष्कर मोगल रसदेच्या मार्गावरच उभे केले. त्याने निवडलेली जागा त्याच्या लष्करी डावपेचाला अनुकूल अशी होती. शत्रू जवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः २-३ हजार घोडदळासह शत्रूस सामोरे गेला. मराठ्यांचे घोडदळ मोगलांच्या घोडदळाहून दुप्पट होते. पण त्याची पर्वा न करता मोगलांनी मराठ्यांचा पाठलाग सुरू केला. संताजीची ही माघार पूर्वनियोजित होती. त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता. आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशा जागी आणले की, जिथे मराठ्यांचे मुख्य घोडदळ तयारीत होते. शत्रू टप्प्यात येताच मराठ्यांनी त्यांस सर्व बाजूंनी घेरले. मोठी धुमश्चक्री उडाली. मराठ्यांनी अलिमर्दानखानासह कित्येक मोगल अधिकारी व व्यापारी यांना कैद केले. शिवाय ५ हत्ती, ३०० उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि सर्व सामानसुमान त्यांच्या हाती पडले. त्या सर्वांना घेऊन मराठे जिंजी किल्ल्यात निघून गेले)..
――――――――――――
🎨 @rambdeshmukh

‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले ते म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”....

 शिवकाळात गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला


‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले ते म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज”....

🙏🚩
शिवरायांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मुळं उखडून टाकण्यासाठी नव्हता तर, अखंड भारत भूमीच्या संस्काराच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती. ती पुन्हा उजेडात आणली ती छत्रपती शिवरायांनी. अशा या परिस्थितीत "शिवराय" जन्माला येतात आणि या समाजाला कुठच्या कुठे घेऊन जातात. आधुनिकता काय आहे हे या समाजाला शिकवतात. अक्षरशः जिवंत मृतांमध्ये एक जीव ओतला हो या महाराजाने. जवळ-जवळ १८०० वर्षानंतर पुन्हा या भयभीत आणि गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला ‘अखंड भारत’ या संकल्पनेचे स्वप्न दाखवले. गोरगरीब आणि शेतकरी वर्गाला हाताला धरून या महाराजाने एक स्वतंत्र राज्य स्थापन केले. परकियांची सावली आपल्या प्रखर तेजस्वी पराक्रमाने नेस्तनाबूत करून टाकली..
“बादशाहाची बाहुलं बनलेले हे पराक्रमी मराठे आता आपल्या राजाच्या पायाची पावलं बनली आणि हि पावलं जिथं पडली तिथली जमिन स्वतंत्र झाली”...!
● परकीय आक्रमण थांबवण्यासाठी अखंड भारत हाच एकमात्र पर्याय आहे, याची जाणीव शिवरायांनी या समाजाला करून दिली. आणि हिच जाणीव पुन्हा जिवंत करायची गरज आहे, म्हणुन इथे मला रियासतकारांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे मांडलेले शब्दचरित्र आठवते, ते म्हणतात :
“ज्या पुरुषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रीस मातेसमान मानले, ज्याने स्वधर्माप्रमाणे परधर्मास आदर दाखवला, ज्याने युद्धा मध्ये पाडाव केलेल्या शत्रूच्या लोकांस त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पोहचवले, ज्याने फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश रक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली, ज्याने सर्वात आधी स्वत: संकटात उडी मारून आपल्या लोकांना स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, ज्याने अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धिसामर्थ्याने स्वतःचा बचाव केला, ज्याने औरंगजेबा सारख्या प्रतापी बादशाहाचे भगीरथ प्रयत्न सतत ३० वर्षे पावेतो यत्किंचित चालु दिले नाहीत. इतकेच नव्हे, तर तीन राज्यांच्या अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वतंत्र राज्य स्थापन करुन, त्याची किर्ती पृथ्वीवर अजरामर करुन ठेवली; त्या प्रतापी व पुण्यशील पुरुषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे...
...कोणास कधी जागीरी अगर जमीनी तोडून न देणारा, न्यायाचे कामांत कोणाची भीडमुर्बत न धरणारा, दुष्टांचा काळ पण गरीबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाने वागवणारा, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारा, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा, पापभीरु परंतु रणशुर, असा हां आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक “छत्रपती शिवाजी महाराज” प्राचीन पुण्यश्लोकांचे पंगतीत बसण्यास सर्वथैव प्राप्त आहे...”
शिवरायांच्या जीवनाकडे किंवा त्यांच्या चरित्राचा विचार केला तर आज आपण त्यांच्याकडे विशेष आदराने पाहतो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात. आज जवळजवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये शिवरायांची प्रतिमा आढळते. असं काय त्यांच्यामध्ये वेगळं होतं की, शिवराय आजही मनामनामध्ये घर करून राहिले आहेत. त्यांचे साधेपण, त्यांची रयतेबद्दल असणारी प्रेमभावना, रयतेला पुढे ठेऊन घेतलेले निर्णय, शेतकऱ्यांबद्दल असणारे विशेष प्रेम आणि आदर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे शिवराय हे आपल्यातलेच आहेत असेच वाटते. स्वतः राजा आहे म्हणून स्वतःला त्यांनी कधीच एका उंचीवर नेऊन ठेवले नाही जेणेकरून रयत त्यांच्यापासून दूर जाईल. भावनिक असणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु समाजामध्ये किंवा स्वतःच्या कुटूंबामध्ये वावरत असताना नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी भावना नक्कीच महत्वाची असते ज्याला आपण इंग्रजीमध्ये Emotional Attachment असे म्हणतो..
छत्रपती शिवरायांनी रयतेबरोबर जी भावनिकता जपली ती ना त्यांच्या आधी कोणाला जमली ना नंतर कोणाला जमली. त्याच बरोबर कुटूंबामध्ये सुद्धा त्यांची अशीच वागणूक दिसून येते. शिवरायांनी एकोजीराजांना लिहिलेली पत्रे जर पहिली तर त्यामध्ये प्रेम, काळजी, शिकवण या सर्व गोष्टी दिसतात. एका पत्रामध्ये शिवराय त्यांना म्हणतात की, “गृहकलह वाढवू नये, वाढलियाने पहिले युगी कौरव पांडव बहुत बहुत कष्टी जाले”..
एकोप्याने आणि प्रेमाने रहा अशीच त्यांची नेहमी धारणा होती. रयतेबद्दल महाराज किती आदर भावनेने विचार करतात याचे उदाहरण जर द्यायचे झाले तर त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही' म्हणजे, प्रजेला कोणताही त्रास होता कामा नये. आणखी अशी असंख्य पत्रं आहेत ज्यामध्ये महाराज नेहमी रयतेचा प्रथम विचार करताना दिसतात. जो माणूस तुमच्या बरोबर आपुलकीने आणि प्रेमाने वागतो तोच माणूस तुम्हाला आपलासा वाटतो. हेच शिवरायांच्या बाबतीत आहे. आणि त्यामुळे शिवराय वेगळे ठरतात आणि आजही ते आपलेसे वाटतात..

छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची व राजकारणाची यशोगाथा

 २८ ऑक्टोबरच्या पत्रातील महत्त्वाचा मजकूर असा...


छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची व राजकारणाची यशोगाथा सातासमुद्रापार थेट लंडनपर्यंत जाऊन धडकली होती. म्हणूनच लंडन स्थित कंपनीचे मुख्यालय २८ ऑक्टोबर १६८५ च्या पत्राद्वारे आपल्या भारतीय अधिकार्यांना सुचना देते की,
“... it being our desire yt you should enter into a close confedaracy and friendship with Sombajee Rajah and maintain always a strict friendship with him, and then you need not fear either the anger of Mogul or ye Portuguese having Sombagee's country and his arms always to friend...'
यावरून संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाचा पगडा कसा बसविला होता याचा थोडाही विचार केल्यास स्वार्थी लोकांनी दुष्टाव्याने त्यांच्या चरित्रावर कलंक चढविण्याचे जे प्रयत्न केले ते किती हीन वृत्तीचे होते याची सहज कल्पना करून घेता येते. असो. संभाजीराजे व इंग्रज याची मैत्री दृढ होऊन टिकली आणि त्यामुळे पश्चिम किनारा अल्प सायासाने सांभाळता आला...
सारांश, दक्षिणेतील राज्यांची मोगलाविरुद्ध एकजुट करण्यात संभाजी महाराजांस जरी तितकेसे यश येण्याची शक्यता नव्हती तरी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या राज्यांना मोगला विरुद्ध भांडावयास लावले. तसे करिताना त्यांनी त्यास शक्य तितके साहाय्यही केले. दक्षिणेतील शाह्या अगदीच असंघटित असल्याने त्यांनी केवळ फितुराने आपले किल्ले मोगलाचे हवाली केले आणि किल्ल्याबाहेरील राज्यांवर हुकमत चालवील असा कोणी सरदार उमराव धीर धरून उभा राहिला नाही. कारण त्या राज्यांतील लोकांची समजुतच ही की राजा नाही तर राज्य नाही. संभाजी महाराजांच्या, पोर्तुगीजांच्या व इंग्रजांच्या राज्यात देशनिष्ठा किंवा राष्ट्रनिष्ठा बाणली असल्याने राजा असो वा नसो राज्यसंस्था अमर मानली गेली...
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील संघटना, प्रजेला राजनिष्ठ आणि स्वामिनिष्ठ ठेवण्यात दाखविलेली तत्परता, सैन्याची तयारी व शिस्त, तशीच सैनिकांची निर्भयता व चपळाई, ऐन दुष्काळातही सैन्यासाठी ठेवलेल्या सामुग्रीची विपुलता वगैरे गोष्टी हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देत होत्या. सतत तीन चार वर्षे मोगलावर छापे घालून आपल्या साहसाने औरंगजेबाचा पाणउतारा करून शत्रुत उत्पन्न केलेली अनिश्चितता व भीति, आपल्या सैन्याचे नुकसान होऊ न देता गनिमी काव्याने मोगली हल्ल्यांचा केलेला प्रतिकार हे सर्व विक्रम दक्षिणेतील लोकांच्या मनातून मोगली सामर्थ्याची भीति दूर करित होते, तसेच त्यांना संभाजीराजांच्या कर्तृत्वावर व त्यांच्या शब्दावर विश्वास धरण्यास लावीत होते इतकेच नव्हे तर आदिलशाही व कुत्बशाही राज्यांत अंतःस्थ फूट नसती तर त्यांची राज्ये मोगलाला घेता आली नसती असे ती राज्ये गेल्यानंतरही मानणारे त्यांचेच सरदार उमराव होते. सारांश, हिंदवी स्वराज्याची शिवाजी महाराजांनी करू घातलेली संघटना संभाजीराजांच्या कारकीर्दीतील परचक्रापत्तीत अधिक दृढ झाली आणि या धकाधकीत तयार झालेली तरुण शूर वीर मंडळी राजापेक्षाही प्राणप्रतिष्ठित राज्यसंस्थेशी अधिक निष्ठेने वागून हिंदवी स्वराज्याची जोपासना करू शकली...
इतिहासचार्य : वा.सी.बेंद्रे.

महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई, श्रीमंत ‘महाराजा यशवंतराव होळकर

 २८ ऑक्टोबर १८११...स्मृतिदिन


महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई, श्रीमंत ‘महाराजा यशवंतराव होळकर’...🙏💐
राजे यशवंत हे अतिशय महापराक्रमी व लढवय्ये योद्धे होते.. ते इंग्रजांचे केवळ शत्रूच नव्हे तर कर्दनकाळ ठरलेले होते, त्यांनी इंग्रजांच्या बलाढय सेनेस अनेकदा वारंवार पराभूत करून धुळ चारली.. त्यांना सळो की पळो करून सोडले इंग्रजांच्या बेबंदशाहीला लगाम घालून अजेय ठरलेला एकमेव भारतरत्न नावाप्रमाणे सार्थकता ठरविणारा यशवंत होय...!
राजपूतांवर मराठा व मोघल सत्तांनी खंडणी लादली तेव्हा ती भरपाई करताना त्यांचा कोषागार रिता झाला त्यांच्या राज्यातील मंदिरात अमाप संपत्ती असतांना सुद्धा ना वैदिक पुजारी मदतीला आलेत ना राजपूत राजांना मंदिरातील पैसा अडचणीच्या काळात वापरावासा वाटला शेवटी राजस्त्रीयांची अलंकार उतरवून राजपूतांना खंडणीची भरपाई करावी लागली परंतू राजे यशवंत यांनी इंग्रजाविरूद्ध लढा उभारताना आर्थिक टंचाईची भरपाई करण्याकरिता मंदिरातील संपत्तीचा उपयोग करण्यासही मागे पुढे पाहिले नाही त्यांनी देवापेक्षा देश श्रेष्ठ मानला म्हणून ते हे करण्याचे धाडस करू शकलेत...
भारतातून ब्रिटीशांना हाकलून लावण्याकरिता इतर धर्मीय राजांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी राजे यशवंत यांनी स्वधर्म त्यागाची केलेली घोषणा ही धर्मापेक्षा देश श्रेष्ठ आहे हे दर्शविते. देशापेक्षा स्वधर्मास श्रेष्ठ ठरविणाऱ्या व मानणाऱ्या धर्म मार्तंडांनी राजे यशवंत यांच्या पासुन बोध घ्यावा..
● पुस्तकाचे लेखक न.र.फाटक, राजे यशवंतराव बद्दल म्हणतात :
लाथ मारिन तेथे पाणी काढीन अशा कर्तबगारीचा पुरूष जसा वागेल तसाच महाराजांचा वर्तनक्रम या काळात दिसतो. महाराज लढाई करीत होते सगळ्या स्वराज्यासाठी, एकटया होळकरशाहीसाठी नव्हे.. त्यांनी या साठीच हत्यार उपसले होते. त्यांच्या अनेक पत्रातून स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी आपण साऱ्या देशाला रणांगणाचे रूप दिले आहे. अशा भावना दृष्टिस पडते. हे शब्द भोसल्यांनी देखील वापरले आहे. कदाचित ती महाराजांची उसनावारीही असेल. या शब्दाचा वापर भोसल्यांनी फक्त लेखणीने केला. त्यांना तलवारीचे पाठबळ मात्र पुरवू शकले नाही. महाराज व पेशवाईंचे तत्कालीन घटक सरदार यांचातला हा फरक लक्षात घेऊनच महाराजांच्या कर्तृत्वाचे परीक्षण केल्याशिवाय महाराजांना न्याय मिळण्याची आशा नको, महाराज हे इंग्रजांसारख्या सेनाबलाढ्याला सुद्धा खडे चारू शकणारा युद्धकुशल वीरपुरूष, अशी त्यांनी देशभर ख्याती संपादली..
शिंदे, भोसले, पेशवे, होळकर व तत्सम मराठा सत्तेच्या सर्व सरदारांनी आपसी मतभेद विसरून फिरंग्यांना देशा बाहेर घालविण्यासाठी एकजूटिने प्रयत्न करावे असे महाराज वारंवार निक्षून सांगत होते. परंतू मराठा सत्तेचे सर्व सूत्रधार हात गंडाळून बसलेत. महाराज यशवंत हे इंग्रजांशी एकाकी झूंज पाहत होते. राजे यशवंतराव यांना इंग्रजांशी लढण्या पेक्षा इतर संस्थानांचा भाग काबिज करून होळकर व पर्यायाने मराठा साम्राज्याचा विस्तार सहज करता आला असता, पण त्यांनी देशास महत्वाचे मानले. इतरांच्या सहकार्याची वाट न पाहता, ना उमेद न होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांविरूद्ध राजे यशवंत यांनी झूंज दिली. अवघ्या ३५ व्या वर्षी ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना या आद्य स्वातंत्र्यवीराने एकाकी देह त्यागला..
अशा महान देशभक्त स्वातंत्र्यवीराचा इतिहास कित्येक वर्षे जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलल्या गेला. महाराजांच्या नसानसात व रक्ताच्या थेंबाथेंबात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती. हे इतिहासातून स्पष्ट होते. भारताचे खरे आद्य स्वातंत्र्यवीर हे "महाराजा यशवंतराव होळकर" स्वतंत्र्याच्या प्रणेत्यास, राष्ट्रभक्तास स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम...🙏🏻🚩

२९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छापा

 २९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छापा

२९ ऑक्टोबर १६६४ बार्सीलूरच्या छाप्याचा विचार करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाहा व मोगल यांचे परस्पर संबंध या कसे होते, पूर्वीच्या परिस्थितीचे वर्णन डचांच्या तत्कालीन नोंदीत मिळते :
"ही लढाई म्हणजे मोगल व त्याचा वकील यांच्या समजुती करिता आदिलशाहा एक देखावा करित आहे, इतकेच. औरंगजेब आदिलशाहाला सारखा लिहीत आहे की, शिवाजी महाराजांविरुद्ध सेना उठवून त्याचे बंड मोड. जर तसे केले तर तीस लाखाची वार्षिक खंडणी माफ केली जाईल. न केले तर मात्र आदिलशाहीवरच स्वारी करण्यात येईल. परंतु ज्या गोष्टी ऐकण्यात येत आहेत त्यावरून असे दिसते की, या लढ्यात विशेष गांभीर्य नाही. कुडाळच्या वेढयात अजीजखान दूर सुरक्षित जागी राहिला होता व देसाईला तेव्हढा आघाडीवर पाठविला होता. लखम सावंताने हल्ले चढविले. त्यांतील काही थोडे यशस्वी झाले. आदिलशाही सैन्याने फारशी हालचाल केली नाही. पट्टागडीही लोकांनी कुचराई वगैरे केली, परंतु त्यांचे शासन केले नाही. शिवाजी महाराजांनी आदिलशाहाला तीस हजार पगोडे, हत्ती व २० उत्तम घोडे नजर केले. त्याचे आदिलशाहाला मोगलाविरुद्ध लढा देण्या बद्दल बोलणे चालले असून आदिलशाहाने तसे केले तर तो वार्षिक तीस हजार खंडणी देऊ करित आहे. त्या दोघांचा गुप्त करारही झाल्याचे बोलतात. आदिलशाहा शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्याऐवजी मोगलांविरुद्धच लढेल असा लोकांचा कयास आहे...
मोगलाने जरी मैत्रीचा कितीही मैत्रीचा भाव दाखविला असला तरी त्याच्यापासून आदिलशाहीला धोका आहे ही समजूत आदिलशाही सरदारात पूर्णपणे जागृत होती. निजामशाहीचा मोड होताच याच कारणास्तव शहाजी महाराजांनी आदिलशाहाने जवळ केला होता. शहाजीमहाराजांचा मृत्यू पावल्याने मावळ घाटमाथ्यावरील लोक जर आपल्या बाजूस राहिले नाहीत व त्यांस मोगलाकडे जाऊ दिले, तर त्यांच्याच साह्याने आदिलशाहीची इतिश्री मोगल अगदी स्वल्प काळात करील, अशी भीती वाटत होती. शिवाय पठाणी सरदारांना शिवाजी महाराजांच्या सैन्यास डोंगर-जंगलांच्या व खाड्या-दलदलीच्या भागात तोड देण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यांना मराठा बारगीरांवर नेहमीच अवलंबून राहावे लागे. त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांना एका शत्रूशी लढा द्यावयाचा, तर सभोवतालच्या इतर शत्रूशी काही तरी कारण शोधून त्या अनुसंधानाने संगनमत करून आपली पिछाडी सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे भासत होते...
अशी जुट करीताना शिवाजी महाराज मात्र सामदामा दिभेदांना धरून सर्व उपाय योजित असे. आदिलशाहतील पठाणाच्या वर्चस्वाबद्दल मत्सर बाळगणाऱ्या रुस्तुम जमासारख्या सरदारांशी गुप्त मैत्री ठेवून आदिलशाहीतील मुलुखगिरीत ते एकमेकांचा बोज राखला जाईल, असा डाव समरंगणावर खेळत. याच कारणाने पठाणी सरदारांना या कोकण भागांत लढे देण्याची ताकद राहत नसे. हा जो राजकारणी खेळ चालू होता, त्यावरून साहजिकच डचांसारख्या त्रयस्थांना या लढ्यातील हेतूबद्दल संशय वाटत असे...
मोगलांच्या दटावणीस्तव आदिलशाहाने बेदनूरच्या स्वारीतून मोकळीक घेऊन शिवाजीराजेंच्या मुलखावर स्वारीचे चक्र जोरात सुरू केले होते. थोडाफार मुलूखही १६६४ च्या पावसाळ्यापूर्वी पादाक्रांत केला होता. साहजिकच मोगली राजकारणातून अवसर मिळताच शिवाजी महाराजांनी आदिलशाही परचक्राला तोड देण्याची पावसाळ्यात बरीच तयारी केली. आदिलशाही सरदारांनी कोकणात जरा अधिक जोर धरला होता. त्यांना राजापूर परत घ्यावयाचे होते. याचवेळी आदिलशाही पठाणाचे प्राबल्य मोडण्याकरिता शिवाजी महाराजांचे प्रयत्न चालू झाले. तसेच युरोपीय शत्रू परकीय पोर्तुगीज यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक भासू लागले होते. समुद्रकिनाऱ्यावर आपली आरमारी सत्ता वाढवून परकीय सत्तांचा जो मुख्य आधार व्यापार त्यातही आपली शक्ती पणाला लावण्याकडे शिवाजी महाराजांचे लक्ष प्रथम कोकणात उतरल्या पासूनच लागले होते. याचे शब्दचित्र, संक्षिप्त का होईना, पण डचांच्या सप्टेंबर १६६४ मधील एका नोंदीत पाहावयास मिळते...
"In the meantime, Siwasi(Shivajiraje) took advantage of the fact that the Mogul's army had retired (June 1664) and announced that he had united with him (Mogul) for 22 lacks pagodas to be paid in 10 years. His forces consisted of 50,000 footmen and 10,000 horsemen whom he has kept together in the rainy season and moreover he has got 40 good frigates, which are all lying in the river of Currepattanam (Kharepatan) and Ragiapour (Rajapur) and another 50 frigates were on the stocks. It is duly confirmed that he is after something big, it appears from many circumstances that he will choose battle and that this will take place on the seaside not far from Wingurla (Vengurla). On an island opposite the village Harni (Harana) he is building a very strong castle and he still occupies the fortress Prapatghary (Pratapgadhi) where by he manages to warn his troops continuously of any alaram and from where he makes his profit as soon as opportunity arises. And although the King of Visiapour has got a considerable army in Caudel (Kudal) he is not strong enough to make Siwasi (Shivajiraje) evacuate that district...
यावरून १६६४ चा पावसाळा संपेपर्यत शिवाजी महाराजांची तयारी कशी झाली होती, हे समजून येते. परंतु या आरमारी तयारीचा रोख पोर्तुगीजांवर असावा, असा जरी डच व इंग्रज संशय घेत होते; तरी या आरमाराचा पहिला आघात कोठे व कसा होणार याची यत्किंचितही कल्पना या युरोपियन दयावर्दी लोकांना शिवाजी महाराजांनी येऊ दिली नव्हती, यात शंका नाही...
पावसाळा संपताच दिवाळीनंतर शिवाजी महाराजांनी आपले सैन्य आदिलशाही सरदारांवर स्वारी चढवून गेलेला मुलूख परत जिंकण्याच्या इराद्याने बाहेर काढले. शकवलीतील माहिती प्रमाणे १६६४ च्या ऑक्टोबरात आदिलशाहा व शिवाजी महाराज यांच्यात बिघाड झाल्यावरून महाराज सेनेसहवर्तमान गेले आणि बाजी घोरपडे यांस ठार मारीले. नंतर खवास खानाशी युद्ध करून त्याला अडचणीत पकडून पळावयास लाविले. तो घाटावर गेला. नंतर नोव्हेंबरात खुदावंतपूर वसूल केले ; परंतु कारवारकरांना २९ ऑक्टोबर १६६४ जी बातमी मिळाली, त्यात वेंगुर्ले बेचिराख केल्याचे व आदिलशाहाने शिवाजी महाराजांवर पाठविलेले सैन्य पराजित होऊन पळून गेल्याचे वृत्त होते. नंतर ५ डिसेंबरच्या गोव्याच्या पत्रात शिवाजी महाराजांचा मुक्काम फोंड्यापर्यत आल्याचे आणि शिवाजी महाराजांजवळ ८०० स्वार व १००० पायदळ असल्याचे लिहिले आहे..
@rambdeshmukh

समय सुचकता, हा एक छत्रपती शिवरायांच्या विचार प्रणालीचा अतिशय महत्वाचा भाग

 


समय सुचकता, हा एक छत्रपती शिवरायांच्या विचार प्रणालीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कोणतीही आखणी करताना मग ती स्वतःच्या जीवनाची असो वा कोणत्यातरी मोठ्या कार्याची असो, योग्यवेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते, हे आपणास माहितच आहे. परंतु योग्यवेळी योग्य निर्णय घेणे केव्हा शक्य होते हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आजुबाजूच्या प्रत्येक बाबींवर सुक्ष्म नजर असणे खूप महत्वाचे असते. त्यासाठी विचारांमध्ये समय सुचकता असणे गरजेचे असते. कारण मनुष्य-जीवन हे नशिबावर अवलंबून नसते असे मला वाटते. जीवनाच्या प्रवासामध्ये अनेकवेळा अपयश येऊ शकते, परंतु विचारांची समय-सुचकता जपली तर अपयशाचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. आयुष्यामध्ये प्रत्येक बाबींवर सुक्ष्म लक्ष ठेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास नुकसान कमी होऊ शकते किंवा झालेले नुकसान आपण भरून काढू शकतो, आणि यासाठी विचारांची समय-सुचकता महत्वाची असते..

● सन १६५९-६० :
छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढला हे आपणा सर्वांना माहितच आहे. ही घटना म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातला मैलाचा दगड होता. खूप मोठे यश प्राप्त झाले होते. अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा संपूर्ण नाश केल्यामुळे शिवरायांचा धाक चारीबाजुला बसला होता. शिवरायांनी मनात आणलं असतं तर या घटनेनंतर शिवराय निवांत बसले असते. कारण, अफझलखानाचा नाश करून शिवरायांनी एक प्रकारे आदिलशाहीच्या पाठीचा कणाच मोडला होता, त्याचबरोबर भरपूर खजिनाही हाती लागला होता. अफझलखानाच्या मृत्यूमुळे आदिलशाहीमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होणे हे साहजिकच होते, कारण अफजलखान म्हणजे आदिलशाहीचा हुकमी एक्का होता. पण शिवराय निवांत बसले नाहीत. त्यांनी येथे त्यांच्या विचारांची समय-सुचकता दाखवली कारण तीच योग्य वेळ होती असे काहीतरी करण्याची जेणेकरून आदिलशाहीवर संपूर्ण वचक बसेल. अफजलखानाचा वध केल्यानंतर फक्त दोन महिन्यात शिवरायांनी पन्हाळगड, पावनगड, वसंतगड, रांगणा, खेळणा (विशाळगड) अशा महत्वाच्या किल्ल्यां बरोबर अनेक लहानसहान किल्ले जिंकले आणि आपली ठाणी कृष्णानदीच्या दोन्ही तिरांपासून ते बत्तीस शिराळाच्या गढीपर्यंत बसवुन तिकडील महसूल जमा करण्यासाठी शिवरायांनी आपली लोकं नेमली. लोहा गरम है तबही हातोडा मारो! यालाच आपण समय-सुचकता म्हणतो. शिवरायांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे समय सुचकतेमुळे अद्भूत असे यश शिवरायांनी मिळवले. कदाचित शिवरायांच्या या कौशल्याकडे डोळेझाक केल्यामुळे त्यांच्या अनेक मोहीमा आपणांस चमत्कारिक वाटल्या. ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही करू शकत नाही तीच गोष्ट एखाद्याने केली तर ती आपणास नक्कीच आश्चर्यचकित करते आणि ती आपल्यासाठी चमत्कारिक ठरते. पण तसे काही नसते..
● सन १६६४, सुरतेची स्वारी :
अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्दी जोहर या सरदारांवर शिवरायांनी विजय मिळवला हे खरे आहे. परंतु त्यांनी जी स्वराज्याची नासाडी आणि केली होती लुट त्यामुळे स्वराज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. यामध्ये अफजलखानाला तर शिवरायांनी मारलाच होता, पण सिद्दी आणि शाहिस्तेखान हे अजुन जिवंत होते. बदला घेण्याच्या विचाराने शिवराय लगेच त्यांच्यावर तुटून पडले नाहीत कारण त्यांच्यापेक्षा महत्वाचे काय तर स्वराज्य होते. शिवरायांनी समय-सुचकता दाखवली आणि स्वराज्याची झालेली लुट भरून काढण्यासाठी सुरत मोहीम आखली. कोणत्यावेळी काय सुचकता. त्याचबरोबर आजुबाजूच्या महत्वाचे आहे याचे निरीक्षण म्हणजे समय परिस्थितीचे बारीक निरीक्षण व गोपनीयताही महत्वाची असते. याचे उदाहरण म्हणजे आपण सुरत वसुलण्यास जात आहोत याची शंका मोगलांना येऊ नये म्हणून, “आपण नाशिकतीर्थास जाऊन तिथून पुढे मोरोपंतांनी घेतलेल्या किल्ल्यांची पाहणी करण्यास जात आहोत” अशी अफवा पसरवली आणि आपल्या योजनेची गोपनीयता कुणालाही कळू दिली नाही. नाहीतर आज "सिक्रेट वही होता है जो सारे गांव को पता हो” अशी परिस्थिती आहे. विचारांची समय सुचकता ठेऊन, आजुबाजूच्या परिस्थितीची सुक्ष्म पाहणी करून योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे. हा कसलाही चमत्कार नव्हता तर तो एक शिवरायांच्या विचारप्रणालीचा भाग होता जो आपण समजुन घेतला पाहिजे..
वरील समय सुचकता हा छत्रपती शिवरायांचा गुण जर पाहिला तर मला असे वाटते की..,
समय सुचकता आणि आणि त्यातून घेतलेले साहसी निर्णय ह्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाच्या अतिशय महत्वाच्या बाजू आहेत, ज्यांच्या आधारे शिवरायांनी अनेक मोठ्या मोहीमा इतक्या सोप्या करून टाकल्या की शत्रू सुद्धा चकित झाले. औरंगजेबाला कधी स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की मोगल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतेवर शिवराय असा अचानकपणे हल्ला करतील. शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, पन्हाळगडावरून निसटणे, आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात परत येणे अशा अनेक घटना ज्यांच्याकडे समय सुचकता आणि साहसी निर्णय या शिवरायांच्या गुणांचा आधार घेऊन पाहिले तर आपण या घटनांच्या मुळापर्यंत पोहचून याचा योग्यरित्या अभ्यास करू शकतो जेणेकरून हा कोणताही चमत्कार नसून फक्त आणि फक्त समय सुचकतेतून साधलेले यश आहे याची प्रचिती होईल, असे माझे प्रामाणिक मत आहे..

इतिहास प्रसिद्ध भातवडीचे युद्ध

 ३१ ऑक्टोबर १६२४


इतिहास प्रसिद्ध भातवडीचे युद्ध...

“शरीफजीराजे भोसले” स्मृतिदिन...🙏🚩
मराठा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराजांना त्यांचे लहान बंधू शरीफजी राजे भोसले यांनी खुप मोलाची साथ दिली.. प्रभु श्रीरामचंद्रांना जशे लक्ष्मण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अगदी तशीच शरीफजीराजे भोसले शहाजीराजांना शरीफजीराजे भोसले यांची साथ होती. शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या पराक्रमाचा परमोच्य बिंदू म्हणजे “भातवडी चे युद्ध”...
१६२४ साली भातवडीच्या युद्धात महाबली शहाजी महाराजांनी आपल्या शौर्य आणि धाडसाच्या जोरावर मोगल व आदिलशाही सैन्याच्या विरोधात मोठा पराक्रम गाजवला, याचे सविस्तर वर्णन शिवभारत या साधनात आहे...
१६२३ मध्ये आदिलशाहने निजामशाहीचा वजीर मलिक अंबर विरुद्ध मोगलांना लष्करी मदत केली होती, सरलष्कर मुल्ला महमद यास ५००० निवडक स्वारानीशी बऱ्हाणपूर येथे मोगलांच्या मदतीस पाठवले होते. मलिक अंबर यामुळे संतापला आणि कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि आदिलशाहीवर आक्रमण करून बेदरचा प्रदेश जिंकून घेतला आणि विजापूरवर चालून गेला. मलिक अंबरने विजापूरास वेढा दिल्याचे समजतास आदिलशाही सरदार मुल्ला महमद व मोगल सरदार सरलष्कर खान विजापूरच्या दिशेने निघाले, ही बातमी समजतास मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठवला व त्वरित आपल्या सैन्यानिशी 'अहिल्यानगर' दिशेने निघाला. त्याच वेळी मोगल आदिलशाही या संयुक्त फौजेची आणि मलिक अंबरच्या सैन्याची गाठ भातवडी येथे पडली आणि युद्धास तोंड फुटले. या युद्धात महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे भोसले तसेच इतर मराठा सरदारांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या बळावर निजामशाहकडे विजयाश्री खेचून आणला...
भातवडीच्या युद्धात मोगल, आदिलशाही तसेच निजामशाहीच्या फौजेत कोणतेकोणते सरदार लढत होते त्यांची नावे तसेच युद्धाचे अतिशय अचूक आणि रसाळ वर्णन हे शिवभारत या समकालीन साधनात आहे. लेखनसीमे अभावी या युद्धात महाबली शहाजी महाराज आणि शरीफजीराजे भोसले यांनी गाजवलेल्या पराक्रम यांचे वर्णन शिवभारतकार नमूद करतात.., "..नंतर शहाजीराजे व शरीफजीराजे, महाबलवान खेळोजीराजे, सिद्दी, त्याचप्रमाणे हंबीररावप्रभूति इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे, घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेंव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली.."
ही धांदल सुरू असतानाच मनचेहर नावाचा मोगल सरदार त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. मनचेहर यास पाहून महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे इत्यादी सर्व भोसल्यांनी पुन्हा शत्रूची कापाकापी सुरू केली. युद्धात शरीफजीराजे भोसले यांनी भाल्याच्या फेकीने हत्तीदळावर हल्ला चढवला होता, याप्रसंगी शत्रूच्या बाणाच्या हल्ल्याने शरीफजीराजे भोसले धारातीर्थी पडले. आपला धाकटा भाऊ शरीफजीराजे धारातीर्थी पडलेले पाहून महाबली शहाजी महाराज मनचेहर व त्याच्या सैन्यावर वेगाने चालून गेले. महाबली शहाजी महाराज यांच्या भीतीने मनचेहर हा मोगल हत्तीदळासह पळून जाऊ लागला, तेंव्हा शहाजीराजे यांनी पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि मनचेहरसहित अनेक लोकांना कैद केले...
――――――――――――
वीरयोद्ध्याच्या स्मृतिस विनम्र अभिवादन...🙏🏻💐🚩

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...