२८ ऑक्टोबरच्या पत्रातील महत्त्वाचा मजकूर असा...
छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची व राजकारणाची यशोगाथा सातासमुद्रापार थेट लंडनपर्यंत जाऊन धडकली होती. म्हणूनच लंडन स्थित कंपनीचे मुख्यालय २८ ऑक्टोबर १६८५ च्या पत्राद्वारे आपल्या भारतीय अधिकार्यांना सुचना देते की,
“... it being our desire yt you should enter into a close confedaracy and friendship with Sombajee Rajah and maintain always a strict friendship with him, and then you need not fear either the anger of Mogul or ye Portuguese having Sombagee's country and his arms always to friend...'
यावरून संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाचा पगडा कसा बसविला होता याचा थोडाही विचार केल्यास स्वार्थी लोकांनी दुष्टाव्याने त्यांच्या चरित्रावर कलंक चढविण्याचे जे प्रयत्न केले ते किती हीन वृत्तीचे होते याची सहज कल्पना करून घेता येते. असो. संभाजीराजे व इंग्रज याची मैत्री दृढ होऊन टिकली आणि त्यामुळे पश्चिम किनारा अल्प सायासाने सांभाळता आला...
सारांश, दक्षिणेतील राज्यांची मोगलाविरुद्ध एकजुट करण्यात संभाजी महाराजांस जरी तितकेसे यश येण्याची शक्यता नव्हती तरी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या राज्यांना मोगला विरुद्ध भांडावयास लावले. तसे करिताना त्यांनी त्यास शक्य तितके साहाय्यही केले. दक्षिणेतील शाह्या अगदीच असंघटित असल्याने त्यांनी केवळ फितुराने आपले किल्ले मोगलाचे हवाली केले आणि किल्ल्याबाहेरील राज्यांवर हुकमत चालवील असा कोणी सरदार उमराव धीर धरून उभा राहिला नाही. कारण त्या राज्यांतील लोकांची समजुतच ही की राजा नाही तर राज्य नाही. संभाजी महाराजांच्या, पोर्तुगीजांच्या व इंग्रजांच्या राज्यात देशनिष्ठा किंवा राष्ट्रनिष्ठा बाणली असल्याने राजा असो वा नसो राज्यसंस्था अमर मानली गेली...
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील संघटना, प्रजेला राजनिष्ठ आणि स्वामिनिष्ठ ठेवण्यात दाखविलेली तत्परता, सैन्याची तयारी व शिस्त, तशीच सैनिकांची निर्भयता व चपळाई, ऐन दुष्काळातही सैन्यासाठी ठेवलेल्या सामुग्रीची विपुलता वगैरे गोष्टी हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देत होत्या. सतत तीन चार वर्षे मोगलावर छापे घालून आपल्या साहसाने औरंगजेबाचा पाणउतारा करून शत्रुत उत्पन्न केलेली अनिश्चितता व भीति, आपल्या सैन्याचे नुकसान होऊ न देता गनिमी काव्याने मोगली हल्ल्यांचा केलेला प्रतिकार हे सर्व विक्रम दक्षिणेतील लोकांच्या मनातून मोगली सामर्थ्याची भीति दूर करित होते, तसेच त्यांना संभाजीराजांच्या कर्तृत्वावर व त्यांच्या शब्दावर विश्वास धरण्यास लावीत होते इतकेच नव्हे तर आदिलशाही व कुत्बशाही राज्यांत अंतःस्थ फूट नसती तर त्यांची राज्ये मोगलाला घेता आली नसती असे ती राज्ये गेल्यानंतरही मानणारे त्यांचेच सरदार उमराव होते. सारांश, हिंदवी स्वराज्याची शिवाजी महाराजांनी करू घातलेली संघटना संभाजीराजांच्या कारकीर्दीतील परचक्रापत्तीत अधिक दृढ झाली आणि या धकाधकीत तयार झालेली तरुण शूर वीर मंडळी राजापेक्षाही प्राणप्रतिष्ठित राज्यसंस्थेशी अधिक निष्ठेने वागून हिंदवी स्वराज्याची जोपासना करू शकली...
इतिहासचार्य : वा.सी.बेंद्रे.

No comments:
Post a Comment