विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

न्यायनिष्ठूर छत्रपती ..

 


न्यायनिष्ठूर छत्रपती ..

एक आदर्श शासक हा जितका त्याच्या पराक्रमामुळे ओळखला जातो तितका त्याच्या न्यायबुद्धी मुळे.मध्ययुगात शेवटचा न्याय हा तख्ताधीश राजा करीत पण त्यांच्या न्यायबुद्धिला धार्मिक किंवा जातीय निकष असत.शिवछत्रपती लोकोत्तर महापुरुष का ? ह्याचे उत्तर त्यांच्या न्यायबुद्धीचा आढावा घेतल्यास सहजच मिळते.
रोहिडखोरे भोर तर्फेचे देशमुख जेधे .कान्होजीरावांच्या बाजी,चांदजी आणि शिवजी ह्यांची वाटणी गोतसभेने झाली होती पण बाजी काही केल्या शिवजी ह्या आपल्या सावत्र बंधूस वाटणीत मिळालेली जमीन करु देईना.हि तक्रार महाराजांकडे गेली वास्तविक पहाता ह्या बाजीस महाराजांनी खळद -बेलसर च्या लढाईत "सर्जेराव" किताब दिला होता .आग्रा भेटीत हि हा बाजी महाराजांसमवेत होता .तसं पाहिलं तर हा अगदिच थोर कथला नव्हता पण न्यायाची चाड असलेल्या शिवछत्रपतींनी बाजी जेध्यास कडक समज दिली-'त्याचा तुमचा निवाडा होऊन गेला असता मागुते कथला करावयाची काये गरज आहे ? सेतेही द्याना,घरही द्याना,म्हणजे हे गोष्टी कैसे चालु पहाते ?इतकिया उपरी सेताविषयी कथला न करणे...कथलियात फाइदा नाही ?
ह्या शिवजी जेध्यांचा वंश आजही कारी येथे नांदतो आहे .कान्होजी जेध्यांच्या आजच्या वाड्याच्या मागील बाजूची मिळकत ह्यांची ,घटना काल इ.१६६९.
संदर्भ - शिवचरित्रसाहित्य खंड २,लेख २२१
दुसरे उदाहरण महाराजांना जातीच्या अतिरेकी कोंदणात बसवलेल्यांना चपराक आहे-पुण्याजवळच्या सुपे खुर्द गावची पाटीलकी चांबळीचे सरनाईक,काटकर व एक धनगर यांत विभागली गेली होती.पण जगताप नावाच्या एका माणसाने पाटीलकी आमची असा दावा करुन तेथील सुभेदाराकडून धनगराची माणसे तुरुंगात डांबिवली.महाराजांना हे समजताच त्यांनी राघो बल्लाळ व जगताप ह्या दोघांनाही महाराजांनी पत्रे पाठवून सुनावले कि "जगतापाच्या बोले धनगराची माणसे बंदित घातली हा कोण इन्साफ ? धनगराची माणसे सोडून देणे.जगतापाचा निवाडा हूजूर करतील "
शिवचरित्रसाहित्य,खंड २.लेख.२५३ मध्ये एक उल्लेख आहे.दादाजी यशवंतराव शिवथरकर ह्याने परस्त्रीगमन केले हा आरोप सिद्ध झाल्यावर महाराजांनी त्याचे डोळे काढून त्याला कैदेत टाकले.
क्षणभर कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेचे प्रकरण काल्पनिक जरी धरले तरी महाराष्ट्राच्या सारस्वतांना "अशीच असती आमची आई सुंदर रुपवती,आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती" हि कल्पना सुचली त्यास महाराजांची काळाने जपलेली प्रतिमा कारणीभूत आहे.खाफीखानासारख्या मुगल पगारी इतिहासकारांनी सुद्धा महाराजांचे हे "स्त्रीदाक्षिण्य " नावाजले.ह्या मुळेच अबलेवर अन्याय होताच महाराज कठोर होतात.
व्यंकोजीराजांसोबत सला झाल्यावर रघुनाथपंत हनुमंते ह्यांच्या मध्यस्थीने कलमे ठरली ह्यातील एक कलम आजच्या युगात हि जसेच्या तसे आमलात आणण्यासारखे आहे.महाराज व्यंकोजी राजांना सांगतात कि-"गोरगरिबास न्याय देते वेळेस द्रव्यास नाडू नये ,ऐसे केलियातस तो कुळास बट्टा लालेल"
आज शतके लोटली न्यायाची चाड शोधायला इसवी सनाच्या सतराव्या शतकात जावे लागले.आमची परंपरा सांगते कि " राजात ईश्वराचा अंश असतो".पण ज्यांनी शिवचरित्र अभ्यासलय ते छातीठोकपणे सांगतील तर "जर ईश्वर असेल तर त्यात माझ्या शिवाजीराजाचा अंश असायलाच पाहिजे".
|| जय शिवराय ||

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...