"पण काय खान साहेब?"
"राजाजी, संताजीच्या धाडी, अचानक हल्ले आणि लुटमार, या खतरनाक माणसाने आमच्या गळ्याला फास लावण्याची पाळी आणली आहे."
"चिंता नसावी खान साहेब. संताजीची भेट झाली की, आम्ही योग्य खबरदारी घेऊ."
"पण कधी? आमची फौज पूर्ण गारद झाल्यावर तुम्ही संताजींचा लगाम खेचणार आहात का?"
"तसं मनातही आणू नका."
खान म्हणाला, "राजाजी तुम्ही जर संताजीला रोखले तर काही दिवस विश्रांतीसाठी बंदीवशला राहण्याचा आमचा इरादा आहे."
महाराज म्हणाले, "यापुढे तुम्हाला संताजी कडून तकलीफ होणार नाही हा आमचा वादा."
खानच्या मनात संताजी बद्दलची रुखरुख राजाराम महाराजांनी दूर केली. नंतर दोघात गुप्त तहाबद्दल खलबते झाली. प्रल्हाद निराजी स्वतःसाठी आपल्याकडे काही रक्कम मागत असल्याचे खानाने सांगितल्यावर, महाराज म्हणाले, आम्ही त्याला बडतर्फ केले असून परत तुमच्याकडे येणार नाही. जास्त वेळ खान महाराजांबरोबर राहू शकत नसल्यामुळे आणि गुप्त वाटाघाटी बद्दल कोणाला संशय येऊ नये म्हणून तो लवकरच माघारी फिरला.
इकडे संताजी, धनाजींनी मोगलांची चांगलीच दमछाक केली होती. जिंजीच्या पायथ्याशी पाय पसरुन बसलेल्या मोगल सैन्याची रसद तोडल्यामुळे टाचा घासायची वेळ आली होती. त्यांची अन्नान्न दशा करून हल्ला करायचा बेत सेनापती संताजीचा होता. त्या दृष्टीने संताजींची फौज जिंजीकडे निघाली. चढाईच्या आधी थोडी विश्रांती मिळावी म्हणून जिंजी पासून काही अंतरावर तळ पडला. संताजी बरोबर चक्रीवादळासारखं सैन्यालाही गरगर फिरावे लागत होते. तळ पडल्याने त्यांच्या श्रांत जीवाला उभारी आली.
छावणीत संताजी, धनाजी मनसुबे रचत असताना जिंजी कडून महाराजांचा लखोटा आला. संताजींना एकट्यालाच महाराजांनी भेटीला बोलावलं होतं. तेवढ्यात नारो येऊन संताजींना संरक्षणाची कशी खबरदारी घ्यावी याबद्दल सांगितले.
संताजींनी आपला घोडा जिंजीकडे वळवला. सेनापती संताजी घोरपडे जिंजीच्या दरबारात पोहोचले. दाराशी असलेल्या खंडो बल्लाळच्या पाठोपाठ सदरेवर महाराजांसमोर हजर झाले. त्यांनी महाराज, महाराणींना मुजरा केला. एकंदर वातावरण पाहून, परिस्थिती संताजींच्या लक्षात आली आणि संताजीच्या डोक्यात लखकन वीज चमकली. क्षणात त्यांना कापशीच्या वाड्यातील प्रसंग आठवला. नागोजी मानेला फौजेत सामील करून घ्यायला आपण स्पष्ट नकार दिला होता. महाराज म्हणाले, "बसा संताजी."
"नको महाराज मी उभाच ठीक आहे."
क्षणात संताजींच्या चेहर्यावरचे भाव पालटून प्रक्षब्धता पसरली. "महाराज माफी मागून फक्त एकच प्रश्न विचारतो, सरकार स्वामीच्या मनात आमच्याबद्दल पराक्रमाबद्दल विश्वास उरला नाही का?"
संताजीच्या अशा अचानक आक्रमक बोलण्याने महाराज गोंधळले... "म्हणजे काय?" मधेच ताराऊ हस्तक्षेप करत म्हणाल्या, "तुमच्या इनामाबद्दल व शौर्याबद्दल मुळीच शंका नाही. फक्त तुम्ही दिलेल्या हुकमाची काटेकोर तामिली न करता फाटे फोडता, किंवा मर्जीला येईल तसे वागता अशी राजमंडळांची तुमच्याविरुद्ध तक्रार आहे."
"मी कोणाची कधी अवज्ञा केली हे कळले तर...?"
"संताजीराव तुम्हाला माहीतच आहे की, हुकमतपन्हाच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला सरसेनापतीचा बहुमान दिला आणि त्याच पंतांची तुम्ही पन्हाळगडावर एकाकी लढणाऱ्या घाटगेच्या मदतीला जाण्याची अवज्ञा केलीत."
"पण राणीसाहेब, त्याचा खुलासा आम्ही पंतांजवळ केला होता."
"खुलासा केला म्हणजे? तुमच्या आणि घाटग्यांच्या खाजगी भांडणाचा राज्याशी काय संबंध? हुकूमतपन्हाची आज्ञा सरसेनापतींना होती. तुम्ही हुकुम न पाळल्याने पन्हाळगड हातचा गेला. त्याला कोण जिम्मेदार?"
आता संताजींची खात्री झाली... कोणीतरी सत्य लपवून आग पाखडण्यासाठी हुकूमतपन्हाचे कान भरले. त्यांनी आत्ताच सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले. तोच महाराज म्हणाले, "नागोजी माने त्यांचा पुत्र सुभानरावासह पोख्त जामीनिशी आलेत. त्यांना सैन्यात दाखल करून घेण्याबद्दल आम्ही त्यांना तुमच्याकडे पाठवले तर त्यांना तुम्ही हाकलून लावले. आमच्या शब्दाला काय किंमत राहिली?"
संताजी म्हणाले, "महाराज, नागोजी माने काय लायकीचा माणूस आहे हे आपण जाणता. अशा स्वार्थी, दगलबाज फितूराचा कोण भरोसा धरेल? मराठी दौलतीच्या रक्षणासाठी अशा ढोंगी माणसांचं सहकार्य फसवं असते. शत्रूच्या गोटातून फिरणारे, स्वराज्यापेक्षा स्वार्थ जपणारे कधी दगाफटका करतील याचा नेम नसतो. म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला."
महाराणी थोड्या वरमून म्हणाल्या, "संताजीराव, ते काही असले तरी महाराजांचा शब्द तुम्ही मोडायला नको होता. जे तुम्हाला कळले ते महाराजांनाच्या लक्षात आले नाही असे तुम्हाला वाटते का? संताजी, सध्याची वेळच अशी आहे की, मिळतील त्या उपायाने माणसे जमा करावी आणि तुम्ही तर वैराग्नी पेटवून बसलात."
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment