विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - २५

 संताजी घोरपडे : भाग - २५

सेनापती संताजी घोरपडे यांच्या गनिमी काव्याने मोगल सैन्य जेरीस आले होते. पांडेचारीच्या फ्रेंच गव्हर्नर मार्टिनने संताजींच्या विजयाचे समग्र वर्णन आपल्या डायरीत नोंदवले होते.

इकडे बादशहाला खबर मिळताच त्याने हमीउद्दीन खान व मतलब खान यांना कर्नाटकात पिटाळले. पण कोणत्याही सरदाराला संताजींची घोडदौड रोखता आली नाही. बादशहा अगदी मेटाकुटीस आला. विजापूर ते जिंजीपर्यंतच्या सर्व मोगल ठाण्यांवर संताजीच्या नावाची जबरदस्त दहशत बसली. सेनापती संताजींची औरंगजेबाच्या सरदारांनी इतकी धास्ती घेतली होती की घोडे पाणी पीत नसत तेव्हा त्यांना वाटे, या अल्लाह या घोड्यांना देखील पाण्यात संताजी दिसतो की काय? हा अजिंक्य मराठा सेनापती केव्हा कुठून येऊन झडप घालील व लुटालूट करून कोणत्या दिशेने कसा निसटेल याचा कुणालाच अंदाज बांधता येत नव्हता. त्याची वस्ती आज कृष्णातीरी तर न्याहारी तुंगभद्रावर. अशा जलदगीतेने संताजींच्या हालचाली होत होत्या.

छत्रपती राजाराम महाराजांच्या दिमतीला मराठी सैन्य पोहोचू नये म्हणून औरंगजेब जीवापाड धडपड करीत होता. त्यामुळे उत्तर कर्नाटकात मराठी मोगल यांच्यात सारख्या चकमकी झडू लागल्या. यासाठी संताजी सतत आघाडीवर असत. संताजीच्या सतत पराक्रमाच्या वार्ता ऐकून छत्रपती राजाराम महाराज संतुष्ट झाले. खुश होऊन त्यांनी हुकुमतपन्हा रामचंद्रपंत यांच्या हस्ते मिरज प्रांताची देशमुखी संताजींना बहाल केली. पंतानी मिरज प्रांतांच्या सुभेराव खंडोबा यादवास खलिता धाडला. खलित्यात संताजींच्या पराक्रमाची हकीकत लिहून, मिरजची देशमुखी संताजी घोरपडेंच्या स्वाधीन करावी अशी आज्ञा दिली.

कापशी, बहिरेवाडी, खडकलाट ही वतने आधी संताजी घोरपडेंकडे होतीच. त्यात मिरजेच्या देशमुखीची भर पडली. पण संताजींना वतने सांभाळण्यापेक्षा तलवार चालवण्यातच गम्य असल्यामुळे संताजींच्या मांडीखालील घोड्याला व हातातल्या तलवारीला उसंत मिळत नव्हती. संभाजी राजेंच्या वधानंतर मराठीशाहीचे रक्षणार्थ नियतीने जणू संताजीला जन्माला घातले असावे. छत्रपतींच्या संकट समयी संताजी वतनांची मोजदाद करण्यापेक्षा मराठ्यांचा राजा आणि गादीच्या संरक्षणाचाच रात्रंदिवस विचार करत होते.

सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, हंबीरराव मोहिते (दुसरे ) यांच्या फौजा उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घालू लागले. जिंजी सर करण्याकरिता अनेक मोगल सरदार बादशहाच्या दरबारात विडा उचलून कर्नाटकात उतरत होते. औरंगजेबाने जाननिसार खान व तहसब खान या सरदारांना पाठवले.. पण मध्ये संताजींनी त्यांचे वर हल्ला चढवून दणदणीत पराभव करून त्यांचे सर्वस्व लुटून फजिती केली. दोघेही खान जखमी अवस्थेत कसेबसे निसटले.

छत्रपती राजाराम महाराजांनी हुकूमतपन्हाच्या मुत्सद्देगिरीची तारीफ केली. योग्य वेळी योग्य सेनापतीची निवड केल्यामुळे दौलतीचे रक्षण तर झालेच, शिवाय महाराजांना संरक्षणाची हमी मिळाली. महाराजांना हेराकरवी रोज मिळणाऱ्या खबरांमध्ये संताजी, धनाजींनी मोगलांची उडवलेली त्रेधातिरपट, याच्याच खबरा जास्त असायच्या. महाराणी ताराऊंनी देखील संताजींचे कौतुक केले.

संताजी घोरपडेंनी सुद्धा परमुलखात आपली बुद्धी आणि तलवारीचा योग्य उपयोग करून आपण सरसेनापतीपदास कसे लायक आहोत हे दाखवून दिले. अशा वेळी दौलतीच्या धन्यापेक्षा दौलतीचे रक्षण करणारे लढवय्ये, हेच खरे आधारस्तंभ असतात. त्यांची उमेद आणखी वाढावी म्हणून महाराजांनी दरबारात मुत्सद्यांशी खलबते करून, खुद्द महाराणी ताराबाईंनी देखील शिफारस केली. त्यानुसार राजाराम महाराजांनी अमात्य रामचंद्रपंत निळकंठ यांच्या नावे लखोटा दिला की, वाई प्रांतातील काही गावांची इनामे संताजीच्या नावे जाहीर केली, त्याप्रमाणे त्यांचे सुपुर्द करावी.

सेनापती संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांकडून सतत गौरवीले जात होते आणि संताजींचा ध्यास एकच होता, छत्रपतींची गादी अबाधीत रहावी. राजाराम महाराजांचा अभिषेक व्हावा, औरंगजेबाच्या कचाट्यातून महाराणी येसूबाई व बाल राजे शाहूंची सुटका व्हावी, या प्रयत्नात त्यांची सतत घोडदौड सुरू होती. जिंजी ते राजगडचा टापू संताजी, धनाजींच्या घोड्यांच्या टापांखाली भरडून निघू लागला. संताजी, धनाजी यांचा वचक इतका बसला होता की बादशहाला वेड लागायचेच बाकी राहिले होते.

इकडे जिंजीच्या पायथ्याशी तीन वर्षापासून वेढा घालून बसलेला झुल्फिकारखान अस्वस्थ झाला होता. त्याने अगोदरच राजाराम महाराजांची संधान बांधले होते. पण संताजी घोरपडेंचा सततचा मोगल सैन्यावर होणाऱ्या हल्ल्याने बादशहा हैराण झाला होता. त्याने जिंजीचा पाडाव लवकर करण्याचा तगादा झुल्फिकार खानाकडे लावला. मराठ्यांचा राजा जेरबंद झाल्या शिवाय संताजी काबूत येणार नाही अशी बादशहाची अटकळ होती.

संताजीच्या कारवायांना पायबंद घातला तर आपण इथे निवांत राहू शकू. शिवाय महाराजांशी झालेल्या गुप्त वाटाघाटीनाही यश मिळेल, असा विचार करून खान महाराजांच्या भेटीला किल्ल्यावर आला. राजाराम महाराजांनी त्याचे स्वागत केले. राजासाब, इधर ज्यादा देर रुकना ठीक नाही. किसी को मालूम हुआ तो आप जानते है क्या होगा? राजा साहब आपल्या दोन दिलखुलास मुलाखतीत आपले मनसुबे पक्के ठरले. पण.....?

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...