विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३५

 संताजी घोरपडे : भाग - ३५

स्वराज्याचा खजिना भरण्यासाठी संताजीने सुरतवर स्वारी करण्याचा बेत केला. संताजीच्या या संभाव्य स्वारीची वार्ता सूरत शहरात धडकताच सर्व शहरात घबराट निर्माण झाली. प्रत्येक जण आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडू लागला.

अचानक संताजीने सुरत स्वारीचा बेत बदलला आणि सुरत ऐवजी नंदुरबार शहरावर हल्ला चढवला.. संताजीने प्रथम शहराला वेढा दिला आणि नंदुरबारच्या फौजदाराकडे चौथाईची मागणी केली. फौजदाराने मागणी धुडकावून लावली व शहराचा कडेकोट बंदोबस्त केला. सलाबुदला येऊन मराठ्यांवर हल्ला चढवला. पण मराठ्यांपुढून लवकरच त्याला परतावे लागले. मराठ्यांनी नंदुरबारच्या परिसरात धुमाकुळ घालायला सुरुवात केली. पण नंदुरबार मध्ये जास्त वेळ वेढा देऊन बसणे शहाणपणाचे होणार नाही, म्हणून मोगली हल्ले सुरू होण्यापूर्वीच संताजीनी साताराकडे कूच केले. सुरत नंदुरबार लुटता आले नाही तरी, तेवढ्याच तोलामोलाच्या चीज वस्तू घेऊन संताजी आले होते. मोघलांच्या घोड्यांनाच नव्हे तर, खुद्द बादशहाला संताजी जळी स्थळी दिसू लागले. हा आदमी आहे की भूत? एका मुलखात दंगा केला म्हणून फौज पाठवावी तर, दुसऱ्या मुलाखात जाऊन ठाणे मारतो. बादशहाचा थयथयाट होत होता. शिवाचा गनिमी कावा हा वापरतो. हे परवदिगार! या बदमाश संताला तू जहन्नुममध्ये कधी नेणार? त्याला अद्दल घडविणारा एकही माणूस आमच्या फौजेत नसावा? अफसोस! अफसोस है! जोपर्यंत हा बदमाश संता आम्हाला शरण येत नाही वा मारला जात नाही, तोवर आम्ही डोक्यावर टोपी घालणार नाही. असे म्हणून बादशहाने डोक्यावरची टोपी रागाने भिरकवून दिली.

संताजीचे युध्दकौशल्य बादशहाच्या डोळ्यात कुसळासारखे सलत होते. संताजीला जिवंत अथवा मृत पकडून देणाऱ्यास औरंगजेबाने मोठमोठी वंशपरंपरागत वतनं, पाच हजारी मनसब, ५० हजार होनच्यावर बक्षीस जाहीर केले. संताजीच्या पारिपत्यासाठी दोन बलाढ्य सेनानीच्या तुकड्या व हिम्मत खानला जादा कुमक पाठवली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डावपेचाचा आदर्श समोर ठेवून संताजी मोगलांशी चौफेर युद्ध करत होते. बादशहाने आपल्या पारिपत्यासाठी भले मोठे बक्षीस लावून तीन महान सेनानी पाठवल्याची खबर लागताच, संताजीने मुत्सद्दिगिरीचा वापर करून, दक्षिण हिंदूस्थानातील औरंगजेबच्या सर्व मांडलीक हिंदू राजांचे सहकार्य घेण्याचे ठरवले.

पैकी बिदनूरच्या राणीचे सहकार्य आधी मिळालेच होते. शिवाय तिचे कर्नाटकी बंकरदाज सैन्य त्यांच्या सेनेत सामील झाले होते. संताजींचे रणांगणावरील कर्तुत्व अचाट होते. झुल्फिकारखान सारख्या महान मोगल सेनानीवर उपासमारीची पाळी आणली होती. तीच पाळी आसदखानवर आणली होती. मोगलांचा पराभवावर पराभव होत असल्यामुळे मोगलांच्या हिंदू मांडलीक राजांचा संताजींबद्दल विश्वास निर्माण झाला होता.

खानदेश स्वारीवरून परतल्यावर संताजींनी आपला संचार सातारा भागापर्यंतच मर्यादित ठेवला होता. आपल्या फौजेची वाताहात न होता, शत्रू कोंडीत कसा सापडेल यावर त्यांचा अधिक भर होता. परळी भागात आल्यावर समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यस्थळाला भेट द्यावी या उद्देशाने परळीला छावणी टाकली.

संपूर्ण मराठेशाही दुहीने पोखरली जात असताना घोरपडे बंधू स्वराज्यासाठी स्वतंत्रपणे एकदिलाने लढत होते. पण छत्रपतींच्या वारसांना ही एक जुट सांभाळता आली नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. संताजी परळीत असल्याचे कळल्यावर त्याचे धाकटे बंधू बहिर्जी दक्षिणेतून त्यांना भेटायला आले. त्याच सुमारास संताजींनी बहिर्जीच्या दोन मुलांची, मुरारराव व सिंधोजीरावांची लग्ने स्वामींच्या पूण्यस्थळी लावून दिली.

संताजी केवळ रणांगणच गाजवत होते, असे नाही तर, घरचेही कर्तव्य चोख बजावत होते.

मोगल,पावसाळ्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे सहसा युद्ध टाळत असत. आणि संताजींनी नेमकी हीच संधी साधून, मुसळधार पावसात खटावच्या ठाण्याला वेढा दिला. रामचंद्र नावाचा एक मराठा खटावचा ठाणेदार म्हणून मोगलांच्या चाकरीत होता. त्याने ठाणे टिकवून धरले व जिद्दीने लढण्यात सज्ज झाला. बादशहाने त्याच्या मदतीसाठी खानखाजाखान व हमीउद्दीन खानास रवाना केले. संताजी व दोन्ही खानात घनासाम युद्ध सुरू झाले. मोगल एकीकडे लढत होते आणि दुसरीकडे जाळपोळ करीत होते. सैन्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने संताजीने किल्ल्याचा आसरा घेतला.

संताजींची माघार तात्पुरती होती. चंदनवंदनाच्या लढाईची खबर धनाजींच्या कानी गेली. ते होते तेवढ्या सैन्यानिशी संताजीच्या मदतीला धावून आले. मराठे आणि मोगल सैन्य जिकरीने लढू लागले. पुन्हा मोगलांनी जाळपोळीचे तंत्र अवलंबिले. लुटीला उत आला. पावसाळ्यात सुद्धा संताजींनी शत्रूला मोकळीक न देता संधी मिळेल तिथे हल्ल्या चढवून त्यांची झोप उडवली होती.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...