मराठ्यांच्या हल्याला तोंड देत लल्फुल्ला खान कसाबसा खटाव परिसरात पोहोचला. तिथे त्याने छावणी टाकली. मोगली लष्करातील ठाणेदारी नारो माधो या शूर मराठा सरदारास दिली. त्यांने लोकांना बोलावून संरक्षणाची हमी दिली. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. खान स्वतःच मराठ्यांच्या कचाट्यात सापडला. पाऊस इतका पडत होता की, छावणी भोवती तटबंदी किंवा खंदक खणण्यासही उसंत मिळत नव्हती. धनाजी, संताजी सातारच्या पायथ्याशी छावणी करून होते.
संधी साधून संताजी घोरपडे खानाच्या छावणीवर चालून गेले. संताजींची भूमिका मोघलांना जेरीस आणून त्यांना त्यांच्या मुलाखत घालवून देणे अशी होती. मोगल सेनेजवळ लांब पडल्याच्या तोफा होत्या. त्याचा सामना मराठ्यांना शक्य नसल्यामुळे, गनिमी कावा हीच युद्धनीती बनवली. मोगल सैन्याचे हाल करणे, उपासमार घडवणे, अडचणीच्या जागी गाठून लुटणे असे वेगवेगळे डावपेच आखून संताजी मोगलांचे सामर्थ्य खिळखिळे करीत होते. एखाद्या मोगली तुकडीवर अचानक छापा टाकून त्यांचे हत्ती, घोडे, उंट, बैल, सामान पळवून हाती लागलेल्या सैन्याला कैद करत असत.
सातारच्या पायथ्याशी असलेल्या सेनापती संताजीच्या छावणीवर नारो आपल्या तुकडीसह हजर झाला. त्याला असे अचानक आलेले पाहून विचारले, ''तू असा अचानक कसा आलास?
''यावंच लागलं. दुसऱ्या कोणाकडून कळविण्यापेक्षा स्वतःच आलो."
"काय झाले? काही विशेष?'
"आपले धाकटे बंधू मालोजी काका...."
"बोल... बोल ...काय झाले मालोजीला?"
''मोगलांनी कैदेत त्यांचा वध केला....''
संताजीच्या डोळ्यासमोर मालोजीचे लहानपणापासूनचे सारे प्रसंग चलचित्राप्रमाणे साकार झाले. त्यांचा थोरला बंधू मराठ्यांचा सेनापती असताना त्याला कैदेत मरण पत्करावे लागले. संताजींची मूठ तलवारीवर घट्ट बसली.
नारो म्हणाला, "जिंजीला असलेल्या बहिर्जी काकांना ही दुःखद वार्ता कळविण्यासाठी हेर पाठवले आहेत. तसेच कापशी, दत्तवाडलाही पाठवले. व मी स्वतः तुमच्याकडे आलोय."
संताजी भावाच्या दुःखाने व्याकुळ झालेले पाहून, नारो त्यांचे सांत्वन करत म्हणाला, "तात, मरण का माणसाच्या हातात असतं? स्वराज्यासाठी मेला तो वीरगतीला पोहोचला. दुःख करू नये."
संताजी म्हणाले, "नारो, तुझा मला या माझ्या तलवारी इतकाच आधार वाटतो. तू धनाजी इतकाच प्रिय आहेस."
नारोने एक दिवस संताजींच्या छावणीत मुक्काम केला. संताजीला मोहीम अर्धवट सोडून जाता येणे शक्य नसल्यामुळे, नारोला दत्तवाडला जायला सांगून घराच्या मंडळींना धीर द्यायला सांगितला. शिवाय पुढच्या मोहिमेच्या महत्त्वाच्या सूचना व आपला सांत्वनपर खलिता देऊन नारोला रवाना केले. तो नजरेआड होईपर्यंत शून्य मनाने संताजी त्या धुळीच्या लोटाकडे पाहत होते.
अवघ्या दहा महिन्यात संताजी घोरपडेंनी मुकर्रबरखान, जानिसारखान, लल्फुल्ला खान, रुस्तमखान या चार बलाढ्य मोगल सरदारांचा दणदणीत पराभव केला. लढाईच्या काळात सुद्धा संताजींची नजर चौफेर असायची. हेराकरवी त्यांना सर्व ठिकाणच्या बातम्या मिळत होत्या. संताजींची चौकसदृष्टी, असामान्य नेतृत्व यामुळे जिकडे तिकडे मराठ्यांची सरशी होऊ लागली. सध्या त्यांच्याजवळ वीस हजारांची फौज होती. इतर फौजबंद सरदारही हाताखाली असत. या सरदारांच्या साहाय्याने, समृद्ध शहरावर हल्ला करून उध्वस्त करणे, नामांकित मोगल सरदारावर तुटून पडणे यात संताजींची प्रसिद्धी होती. ज्याला संताजींशी लढाईचा किंवा मुकाबला करायचा प्रसंग आला तर, त्याच्या नशिबी तीन पैकी एक परिणाम ठरलेला असायचा. एक तर ठार मारला जाई, किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडणे, नाहीतर त्याचा पराजय होऊन सैन्यासह गारद होत असे. त्यातूनही सुटलाच तर आपला पूनर्जन्म झाला असे त्याला वाटे.
संताजी बरोबर युद्ध करण्यास मोगलांच्या मोठमोठ्या सरदारांना देखील धडकी भरत असे. हृदय कंपायमान होत असे.
नेहमीप्रमाणे संताजी सकाळचे अन्हीक उरकून राहुटीत बसले असताना, अचानक समोर धनाजींना पाहून आश्चर्यचकित झाले. "धनाजी, कधी आलात?''
"थोड्याच वेळापूर्वी."
नंतर दोघेही बैठकीवर बसले. धनाजी गंभीर मुद्रेने संताजीकडे पाहत असलेले पाहून संताजींना काही उमगेना. मग गंभीरपणे धनाजींनी विचारले, "नारो येऊन गेला ना? मला सुद्धा मालोजीच्या मृत्यूची बातमी उशिराच कळली. व तसाच तडक इकडे निघून आलो." धनाजी त्यांचे सांत्वन करत म्हणाले, "मालोजी सारखे ऐंशी कैदी वीरगतीस गेले म्हणूनच राजाराम महाराज जिंजीला पोहोचू शकले. धनाजी, या स्वराज्याचे काय होणार? अरे तुझ्यासारखा सेनापती महाराष्ट्राला लाभला तर नियतीला सुद्धा विचार करावाच लागेल."
"त्या त्यासाठी मला तुझ्यासारख्या साथीदाराची साथ हवी."
'संताजी, दुःख होते ते शंभूराजे नाही, याचं."
"आता दुःख करीत बसण्यात उपयोग नाही. घेतलेला वसा सर्व बळ एकवटून पुढे नेलाच पाहिजे."
"संताजी, दुःखी होऊ नकोस. जिथे साक्षात देवांनाही भोग चुकले नाही तिथे आम्हा माणसांचा काय पाड?"
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment