विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - २०

 संताजी घोरपडे : भाग - २०

दुःखातिरिकाने संताजी म्हणाले, "जाधवजी, म्हणूनच सख्ख्या भावाच्या वधाची बातमी कळली तरी, कर्तव्य विसरलो नाही."

"संताजी, तू तुझ्या कुटुंबात जाऊन सांत्वन करायला हवे."

"धनाजी.. तू.. तू बोलतोस?"

"होय वीराचं काळीज दगडाचं असलं तरी, दगडालाही पाण्याचा ओलावा असतोच ना? तू कठोर मनाचा आहेस हे मी जाणतो. तरीसुद्धा तुला जावंच लागेल."

"पण का?

"बादशहाने आपला मोहरा जिंजीकडे वळवला आहे. तो नीच बादशहा राजाराम महाराजांना कैद करण्याच्या खटपटीत आहे. जोपर्यंत आपण दोघे जिवंत आहोत तोपर्यंत तो काहीच वाकडे करू शकत नाही. झुल्फीकारखान अजून निघायचा आहे. त्याच्या सैन्याचा अंदाज लागेपर्यंत तू दत्तवाड आणि कापशीला जाऊन ये व रामबाग जवळ आमच्या छावणीत येऊन सामील हो....! मी सर्व फौजेनिशी रामबागला छावणी टाकतो."

राहुटीत बसून संताजी, धनाजींचे मनसुबे ठरत होते. जेवण वगैरे झाल्यावर दुपारचे दोन प्रहर टळत आल्यावर धनाजी निघताना म्हणाले, "मी माझी तुकडी घेऊन इथे मुक्कामाला येतो.तू कापशीला निघ."

दोघांनी एकमेकांचे निरोप घेतला. धनाजी आपल्या तुकडीकडे निघून गेले. संताजीचा घोडा दक्षिणेकडे वळला. संध्याकाळच्या सुमारास संताजीने आजची रात्र पन्हाळगडावर काढण्याचा विचार केला. ते किल्ल्यावर पोहोचले तेव्हा किल्लेदार पिराजी घाडगेने त्यांचे स्वागत केले. रात्री जेवणानंतर दोघेही स्वराज्याबद्दल चर्चा करू लागले. सेनापतींनी मोगलांकडून मिळवलेले उत्पन्न गडावर पाठवले होते. त्याबद्दल चौकशी केल्यावर, घाटगेने थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली. संताजींना काही केलं झोप येईना. शिपायांनी जिवावर उदार होऊन स्वराज्या साठी मिळवलेली लूट! निश्चितच घाटग्यांनी चोख हिशोब ठेवला नसावा असा संशय आला.

सकाळी सेनापती घाडगेंशी बोलताना तोच विषय काढला, तेव्हा मात्र घाडगेनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांना वाटलं रामचंद्रपंत किंवा शंकराजींनी सुद्धा अजून विचारपूस केली नसताना घोरपडे आपल्याला जाब विचारतात याचा त्याला राग आला. संताजी इरेला पेटले. शिपायांनी स्वराज्यासाठी रक्ताचे सिंचन करावे. आणि उद्या मोगलांची सरशी झाली तर, हाच किल्लेदार सर्वस्वानिशी त्याच्या पायावर लोळण घेतील. सूर्याजी पिसाळाचे ताजे उदाहरण नजरेसमोर होते. सेनापतींनी त्याची कानउघाडणी केली. दोघात तेढ निर्माण झाली. संताजींना वाटले, ही बाब धनाजीच्या कानावर घालावी. पण विचार केला, यापेक्षा झुल्फिकारखान महत्त्वाचा आहे. म्हणून घाडगेकडे दुर्लक्ष करून, संताजी तडक कापशीला गेले.

मालोजीरावांच्या मृत्युनंतर दत्तवाड आणि गजेंद्रगडाचे सर्व कुटुंबिय कापशीला आले होते. बहीर्जीही जिंजीहून आले. संताजी आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सेनापतीच्या वाड्यावर दुःखाची छाया पसरली. सांत्वनासाठी बरीच मंडळी येऊन गेली. त्यानंतर अनेक लोक आपापले लहान मोठे कार्य घेऊन आली होती. संताजींनी आलेल्या सर्वांची सर्व कामे संध्याकाळपर्यंत हातावेगळी केली.

संध्याकाळी बहिरेवाडी वरून नारोची आई मुद्दाम भेटायला आली. नारोला व्यंकटेश नावाचा मुलगा झाल्याची गोड बातमी दिली. नजरांना म्हणून संताजीने ओंजळ भरून स्वर्ण होन नारोच्या आईच्या पदरात घातले. तिचा उर आनंदाने भरून आला. आनंदाश्रू डोळ्यात तरळले. घोरपडे घराण्याचे उपकार ती कधीच विसरणे शक्य नव्हते.

सर्व निरवानिरव झाल्यावर शिणलेले संताजी पलंगावर आडवे झाले. पुन्हा घाडगेचा विषय डोक्यात घोळू लागला. सूर्याजी पिसाळानंतर प्रत्येक किल्लेदाराबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची अढी निर्माण झाली होती. आणि त्यांची अटकळ सहसा खोटी ठरत नसे. वास्तविक रामचंद्रपंत हुकूमतपन्हांनी कडक निर्बंध ठेवणे आवश्यक होते. पण त्यांना कोण सांगणार? जिथे महाराज सुद्धा त्यांचा शब्द अखेरचा मानत होते. स्वतः पंतांनाना अनुभव होता. स्वराज्यासाठी मृत्युशी झुंज देऊन शीर तळहातावर घेऊन लढणाऱ्या मराठ्यांना मजबूत किल्ले आणि जबाबदार किल्लेदाराची गरज होती. थोरल्या महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून स्वराज्य स्थापन केलं आणि वतनाच्या तुकड्यासाठी त्या पिसाळाने रायगड मोगलांच्या घशात घातला. राजमुद्रा, राज सिंहासन, राजदंड सर्व शत्रूच्या ताब्यात. मग आमच्या शिपायाच्या कुर्बानीला काय मोल? आम्ही लढतो, झुंजतो. रात्रंदिवस घोड्यावरून दर्‍याखोऱ्यात संचार करतो. प्रत्यक्ष मृत्यूला गुंगारा देऊन लूट लुटून आणतो. तिचा जर योग्य विनयोग झाला नाही, राज्याच्या खजिना रिकामा असेल तर भविष्यात कशाच्या जोरावर फौज लढवायची?

ते विचारात असतानाच पत्नी द्वारकाबाई दुधाचा पेला घेऊन आल्या. दोघात थोडा हास परिहास झाला. नंतर द्वारकाबाईंनी त्यांच्या गंभीरतेचे कारण विचारलं. संताजींनी पन्हाळगडावरील हकिकत सांगितली. तशा द्वारकाबाई धूर्त, मुत्सद्दी व द्रष्ट्या. बाईंना आधीपासूनच राजकारणाचा ओढा होता. संताजी तिथे असताना सतत राजकारणाविषयी बोलणे व्हायचे. राजकारणातील खाचखळगा, तंटेबखेडे, माणसांची पारखी या सर्व बाबी त्यांना अवगत होत्या. संताजी तलवारबाजीत तरबेज असले तरी सल्लामसलतीत ते नारो आणि द्वारकाबाईंना मान देत असत.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...