विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - २४

 संताजी घोरपडे : भाग - २४

संताजी म्हणाले, "नाहीतर काय धनाजी? मी त्यांना मोगलांच्या विरुद्ध लढण्यास थोडीच मनाई केली? त्यांना माझ्या फौजेत सामील करून घ्यायला नकार दिला होता. त्यांना स्वराज्याची सेवा करायची होती ना? त्यांच्यानंतर स्वराज्यात आलेले याचप्पा नाईक व इस्लाम खान मोगलांना आडवे गेलेच ना? यांना कोणी अडवले होते?"

पाटोळे म्हणाले, "त्यांचा पाणउतारा झाला म्हणून कदाचित..."

"म्हणून ते मोगलात तर गेले नाही ना? स्वार्थासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्यांना स्वराज्याचा अर्थ कधी उमणार आहे का?"

धनाजी म्हणाले, ''मला खात्री आहे त्यांच्याबद्दल."

प्रसंग चिघळत आहे असे पाहून, बुवाजी पवार दोघांनाही शांत करीत म्हणाले, "आधी पुढचे मनसुबे ठरवा."

"खानाला मोर्चे बांधायला अवधी द्यायचा नाही. खानावर हल्ले सुरूच ठेवायचे."

तेवढ्यात एक स्वार दौडत येताना दिसला. स्वाराने पायउतार होऊन सेनापतींना मुजरा केला. तो स्वार होता सेनापतीचा खास विश्वासू, नारो महादेव. नारोने थोडी उसंत घेऊन खबर दिली.... "बादशहाने वजीर आसदखानास झुल्फिकारखानाच्या मदतीला पाठवले आहे."

धनाजी म्हणाले, "संताजी जिंजीला वेढा देण्याचा बादशहाशाचा बेत पक्का दिसतो. कारण झुल्फिकार खान गुरुमकोंडा किल्ला ताब्यात घेण्याऐवजी पुढे सरकला आणि आता तर आसदखान...."

नारो म्हणाला, "आसदखानला अडवण्यासाठी कापशीहुन बहिर्जी काका निघाले आहेत. रसद तोडल्यामुळे झुल्फिकारखानाच्या सैन्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. उपाशी पोटी सैन्य कितपत लढणार?"

सेनापती म्हणाले, "आपण हेच धोरण पुढे चालवू. खानाचे सैन्य अन्न पाण्यावाचून तडफडेल. गनिमी काव्याने जागोजागी हल्ले चढवू. त्याखेरीस मोगल जेरीस येणार नाही."

जिंजीची वाट रोखण्यासोबतच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी कर्नाटकातील बेळगाव, धारवाडच्या परिसरात धुमाकूळ सुरू केला. प्रथम त्यांनी बेळगाव परिसरातील ठाणे जिंकले. उभ्या पिकात लष्करी घोडे घालून पिकाची नासधूस केली आणि बेळगावच्या किल्ल्याला वेढा दिला. थोड्याच दिवसात संताजी धनाजींनी धारवाडच्या किल्ल्यालाही वेढा दिला. ह्या सर्व बातम्या बादशहाला कळत होत्या. संताजी धनाजीने धारवाडचा वेढा उठवून दोघेही नरगुंद कडे निघून गोविंदगडाजवळ आले. त्यांच्या मागावर असलेल्या कासिम खानची नुसती फरफट होत होती. अशा चक्रावून टाकणाऱ्या बातम्या ऐकून बादशहाला मराठ्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही.

बेळगाव, धारवाड भागात धुमाकूळ घालून संताजी, धनाजी जिंजीकडे रवाना झाले. या दरम्यान महाराजांचा राणीवसा विशाळगड वरून जिंजीला आणला होता. शिवाय जिंजी मराठ्यांची राजधानी म्हणून घोषित केल्यामुळे जिंजी सुरक्षित राहणे महत्त्वाचे होते.

धनाजी, संताजी जिंजीकडे जाताना मार्गात मिळेल तेवढ्या मोगल सैन्याचा समाचार घेत होते. शत्रू प्रदेशाची नासाडी करत ते जिंजीच्या परिसरात दाखल झाले.

आसदखान व शहजादा कामबक्ष दोघे जिंजीच्या मोगल श्रावणीत येऊन दाखल झाल्यामुळे झुल्फिकार खानाच्या सैन्याला नवा हुरुप आला. मोगलांनी मोर्चाबंदीला सुरुवात केली. त्याचबरोबर दोन्ही पक्षी तोफा व गोळीबार आणि लहानसहान चकमकी नेहमीच झडू लागल्या.

छत्रपती राजाराम मोठ्या शर्थीने किल्ला लढवत होते. पण मोगली लष्करी सामर्थ्य वाढले. जोरदार हल्ले चढवून जिंजीचा पाडाव करणे त्यांना सहज शक्य होते. पण राजाराम महाराजांनी अंतस्थ सूत जमवल्यामुळे खानाचा प्रामाणिकपणा अथवा जोर राहिला नव्हता.

तोच संताजी, धनाजींच्या फौजा जिंजीला येऊन धडकल्या. संताजी जवळ १५००० तर, धनाजी जवळ ७००० घोडस्वार होते. किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या मोगली लष्करावर धनाजीने अचानक हल्ला चढवल्यामुळे मोगलांची दाणादाण उडाली. वेढा उठवून ते मुख्य तळावर निघून गेले.

अशा नाजूक राजकीय परिस्थितीतील हालचालींमागे सेनापती संताजी घोरपडेचे गनिमी डावपेच, धाडसी हल्ले महत्त्वाचे होते. या लढाईत मोगलांचा नामांकित सरदार इस्माईल खान मारवा धनाजीच्या तावडीत सापडला. त्याला कैद केले गेले. दुसऱ्या दिवशी संताजींनी अशाच नामांकित सेनानी अलिमदखानला कैद करून जिंजीच्या किल्ल्यात आणले. हा कांचीपुरमचा फौजदार अलीमद खान रसद घेऊन झुल्फिकारखानाच्या मदतीला येत असल्याचे कळताच, सेनापती संताजींनी आपल्या गनिमी काव्याचा उपयोग करून त्याला जेरीस आणले. शेवटी तो पराभूत होऊन आपल्या सहकाऱ्यांसहित धनाजींच्या हाती सापडला. त्याच्याबरोबरच बरीचशी जनावरे, प्रचंड रसद संताजींना प्राप्त झाली.

कावेरीपाकच्या परिसरात संताजीने आपल्या फौजेसह मोठ्या हिकमतीने अलिमदखानच्या फौजेचा निःपात केला.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...