संताजीराव ताडकन म्हणाले, "मी सांगतो", असे म्हणून त्यांनी बहिर्जींना हाक मारली. "बहिर्जी, नागोजी माने व त्यांचे पुत्र सुभानराव यांना निरोपाचे विडे दे आणि वाड्याच्या महाद्वारापर्यंतचा रस्ता दाखवा. मर्जी असेल तिकडे जातील."
"त्याची काही गरज नाही घोरपडे." मानोजी जायला उठत म्हणाले. "आम्ही आमची वाट शोधत सुरक्षित जाऊ. तुम्ही मात्र विनाशाच्या वाटेने निघालात. चला, सुभानराव... "
नागोजी माने व सुभानराव निघून गेल्यावर, गंभीर शांतता बराच वेळ राहिली. शंकराजी चिंताक्रांत मुद्रेने बसून होते. धनाजीरावांना इकडे आड तिकडे विहीर असे झाले होते. शांततेचा भंग करत संताजीरावांनी आवाज दिला.. "धनाजीराव.. मला तुम्ही महाराजांचे बदसल्लागार ठरवलेत..."
शंकराजी म्हणाले, "संताजीराव, तुम्हाला दोन हिताचे शब्द सांगतो."
संताजी म्हणाले, "मानेची कीड गेली. आता तुम्ही जे सांगाल ते मला ऐकलंच पाहिजे. तोच नारो लगबगीने आत येत म्हणाला, "तात, इतिकखान जंगी फौज घेऊन जिंजीवर चालून जात आहे."
संताजी ताडकन उठले. त्याबरोबर धनाजीही.. "काय? जिंजीवर?प्रत्यक्ष महाराजांवर हल्ला?"
नारो म्हणाला, "तात, खबर पक्की आहे."
संताजी म्हणाले, "इतिकखानाच्या फौजेवर चालून जायचे."
शंकराजी म्हणाले, "संताजी, आपली बोलणी पुरती झालेली नाहीत."
"ती सवडीने पुरी होतील. आधी शिकार. सरकार आपण येथे निश्चिंतपणे आराम करा. बहिर्जी तुमच्या सेवेत असेल. जय भवानी जय शिवाजीऽऽऽ." सेनापती संताजीराव घोरपडे ढाल तलवार घेऊन बाहेर पडले. त्याबरोबर धनाजी व नारोजीही. काही क्षणात फौजा सज्ज झाल्या. तुताऱ्यांच्या गगनभेदी आवाजात वातावरण निनादले. सेनापती संताजी घोरपडेंची फौज इतिकखानाच्या पाठलागावर निघाली.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीत जम बसवत होते. त्यांच्याजवळ १४००० घोडेस्वार व एक लाख २५ हजार पायदळ अशी फौज अल्पावधीतच तयार झाली. अनेक हिंदूराजे, कैक जमीनदार येतच होते. लष्करी संघटन होऊ लागले होते. कुतुबशाहीच्या सैन्यातून निसटून आलेले मोहम्मद सादिक, इस्माईल खान आणि याचप्पा नाईक हे तीन कुतुबशाही सरदार छत्रपती राजाराम महाराजांच्या झेंड्याखाली आले. महाराजांनी जिंजीतले आपले स्थान शक्य तेवढे बळकट केले आणि शत्रूशी झुंज देण्यासाठी महाराष्ट्रात केसो त्रिमल बरोबर पंधरा हजार घोडदळ २५ हजार पायदळ आणि एक लाख होन खजिना देऊन त्यांना तातडीने विशालगडाकडे रवाना केले. ही मोठी फौज आल्याने रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना मोठी उमेद आली. त्यांनी मोगलांवर दमदार हल्ले चढवायला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किती दूरदृष्टीने जिंजीच्या किल्ल्याची व्यवस्था केली होती हे ते जाणून होते. बलाढ्य औरंगजेबशी कधी ना कधी मुकाबला करावा लागेल. अत्यंत सुरक्षित जिंजीचा किल्ला स्वराज्याच्या संकटाच्या वेळी नक्कीच उपयोगी पडेल. त्या दृष्टीने त्यांनी जिंजीभोवती नवीन साठ फूट उंचीचा व तटाभोवती ८० फूट रुंदीचा तट बांधला. खंदक खोदले. मनोरे उभारले होते. हा किल्ला म्हणजे समभुज त्रिकोणाच्या तीन कोनबिंदूंच्या जागी उभारलेल्या तीन बालेकिल्ल्यांच्या मिळून एक गड बनलेला आहे. या गढीत पोहोचण्याच्या एकमेव मार्ग म्हणजे पाण्यावर असलेला लाकडी पूल ओलांडणे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी भिंती असून, त्यात बंदूक डागण्यासाठी जागा ठेवल्या आहेत. फक्त दहा सैनिक शत्रूंच्या दहा हजारावर भारी पडतील, अशी ही जागा आहे.
असा मोक्याच्या जागी असलेल्या जिंजी किल्ला अत्यंत मजबूत बेलगाव व थोड्याशा साधनसामग्रीवर व दारू गोळ्यांनिशी महिने नो महिने शत्रूशी झुंजत राहू शकतो. शिवाजी महाराजांनी गोवळकोंडाच्या कुतुबशाहीचा नशेरी खान सरदार कडून मोठ्या हिकमतीने रक्ताचा थेंबही न सांडता स्वराज्यात दाखल करून घेतला होता. अश्या दुर्दम्य ठिकाणी स्वराज्याची पुन्हा राजधानी उभारत असलेली पाहून, औरंगजेबने आपली सर्व शक्ती एकवटून पणाला लावली होती.
बादशहाच्या आदेशानुसार अफाट सैन्य घेऊन झुल्फिकार खान कर्नाटकाकडे निघाला असता, वाटेत सेनापती संताजी, धनाजी जाधव, बुवाजी पवार, पाटोळे इत्यादींनी त्याचा मार्ग रोखला. समोरासमोर लढाई न करता गनिमी काव्याने युद्ध तंत्र वापरून त्याला जिंजीपर्यंत लवकर पोहोचू न देण्यासाठी बखेडे घालण्यात सेनापती संतांजी आघाडीवर होते. मराठ्यांना तोंड देत कसातरी झुल्फिकारखान गुरूम कोंडा येथे पोहोचला.
हा किल्ला जिंजीच्या अलीकडे साठ कोसावर आहे. महाराजांच्या सेवेत नव्याने रुजू झालेले सरदार इस्माईल खान व याचप्पा नाईक मोगलांना आडवे आले. इस्माईल खानने प्रयत्नाची शिकस्त केली, पण झुल्फिकारखान जिंजीच्या निकट येऊन पोहोचलाच.
बुवाजी पवार म्हणाले, "संताजी, खान तर जिंजीला भिडल्यातच जमा आहे."
धनाजी म्हणाले, "अजून आम्ही जिवंत आहोत. त्याची काय हिम्मत?"
संताजी संतापाने म्हणाले, "धनाजी आपण प्राणपणाने लढू... पण धनाजी, तो नागोजी माने, त्यांचा पुत्र व मानकोजी पांढरे आहेत कुठे?"
धनाजी म्हणाले, "तुम्ही त्यांचा अपमान केलात, नाही तर...."
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment