संताजीरावांच्या नजरेसमोर शिवाजी महाराजांची मूर्ती साकार झाली. त्यांच्या पायी वाहिलेली निष्ठा, छत्रपतीची गादी आबाधीत राहावी म्हणून होणारी जीवाची घालमेल, स्वराज्य टिकवण्यासाठी घेतलेली शपथ आणि संभाजीराजेंसाठी आपले वडील म्हाळोजींनी झेललेले वार,... आता मी कुणासाठी लढावं? ज्यांच्यासाठी मी जिवाचं रान करून रानोमाळ घोडदौड केली, त्यांनीच माझी आणि माझ्या शौर्याची कदर केली नाही. राजाराम महाराजांनी जरी माझं पद रद्द केलं असलं तरी, माझ्या ठायी असलेल्या सच्च्या शिपाई बाणा कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. मराठेशाहीला लागलेली कीड, मग ती परकीयांची असो वा स्वकीयांची, कायम हटवणार.
या विचारातच ते मेरुस्वामी असलेल्या राहुटीत आले. स्वामींनी स्नानाची इच्छा व्यक्त करताच, दोघेही राहूटी पासून काही अंतरावर खळखळत वाहत असलेल्या झर्यावर आले. संतजीरावांचे स्नान झाल्यावर, पाण्यात स्थितप्रज्ञ उभे असलेल्या मेरुस्वामी जवळ आले. संताजी नजीक येताच, स्वामिनी त्यांच्या कानात गुरुमंत्र उच्चारला ..."ॐ श्री.." मंत्राच्या शब्दाबरोबर संताजीच्या सर्वांगात एक अद्भुत शक्ती संचारली. संताजींना मेरुस्वामींचा अनुग्रह मिळाला.
नारो स्वामींची व्यवस्था अगदी चोख ठेवत होता. दुपारची वामकुक्षी न घेता सतत पदभ्रमण करीत अध्यात्माचा प्रचार करण्याचे व्रत घेतलेले मेरूस्वामी जिंजीच्या दिशेने निघाले. जणू थोरल्या छत्रपतींच्या वारसदाराला समर्थांचा संदेश पोहोचण्यासाठीच!
मराठीशाहीचे भाग्याचे दिवस उजाडत असताना संशयित वातावरण निर्माण झाले. राजाराम महाराजांनी सरसेनापतीची सूत्रे धनाजी जाधवांना दिली आणि तेढ वाढतच गेली. मराठी मुलखाची, जिंजीच्या संरक्षणाची हमी राहिली नव्हती. यावेळी एकच पराक्रमी वीर बहिर्जी घोरपडे फक्त होते महाराजांजवळ. तहाच्या वाटासाठी सुरू होत्या. पण मोघलांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सगळं वातावरण संशयास्पद झालं होतं. सेनापतीपदाची सूत्रे मिळताच धनाजीराव महाराष्ट्राकडे रवाना झाले होते. यावेळी संताजीराव नेमके कुठे आहेत याची जिंजी दरबाराला कल्पना नव्हती.
जिंजीच्या परिसरात आधीच संताजींच्या कारवायांमुळे मोगल सैन्याची अवस्था फार बिकट झाली होती. अजूनही तशीच होती. औरंगजेबने पाठवलेल्या सर्व सरदारांची नाचक्की झाली होती. राजाराम महारांजासकट जिंजी ताब्यात घेण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले होते. त्याच्या सर्व युक्ती प्रयुक्तांना कट शहा देत, संताजींनी जिंजीच्या पायथ्याशी मोगलांची दाणादाण करून सोडली होती. संताजींच्या नुसत्या नावानेच मोगल सेनेत थरकाप उडत होता. एके दिवशी मोगल तोफखान्यावरच्या लोकांनी सामानसुमानासहित छावणी बाहेर निघून, आम्ही बंदीवशला जात असल्याचा निरोप झुल्फीकारसाठी ठेवला.
झुल्फीकारखानने व इसदखानने आपले वकील राजाराम महाराजांकडे पाठवून विनंती केली की, सैनिकात संताजींची दहशत असल्यामुळे, त्याला आवर घालावा. खान धूर्त होता. त्याने प्रयत्न करून एक लाख होनावर आपली सुटका करून घेतली. आणि तहाचे नियम लखोट्यातच राहिले. खानाने आणखी ६० हजार होनचे जडजवाहिर राजारामांना दिले व वेढा उठवून बंदीवशकडे निघून गेला. तिथे राहिलेल्या सामानावर मराठ्यांनी कब्जा केला.
बंदीवशला जाणाऱ्या मोगलांना वाटेत अडवून कित्येकांना गिरफ्तार केले. तेवढ्यात विजापूरचा फौजदार कासीम खान मुबलक व मोठा फौजफाटा, रसद घेऊन येत असल्याची खबर मराठ्यांना मिळाली. संताजींना खबर कळल्याबरोबर कोप्पीजवळ काशीदखानवर मराठे तुटून पडले. तो जीवाच्या भीतीने देवळात लपून बसला. खबर मिळताच, झुल्फिकारखानने त्याची सुटका केली.
इतके होऊनही राजाराम महाराज तहाच्या बोलण्यावर कायमच असल्याचे कळताच, संताजींचा संताप अनावर झाला. त्यांचा राजारामावरचा राग आणखी वाढला. आम्ही जीवाची बाजी लावून युद्ध खेळतो. मोगलांचे अव्वल दर्जाचे सेनापती, बादशहाचे वजीर, शहाजादा कामबक्ष एका पेक्षा एक वरचढ मोहरे ताब्यात आलेले असताना, शत्रूला नेस्तनाबूत करण्याची संधी राजेंनी वाया घालवली, म्हणून संताजी बरोबरच इतरही मराठी सरदार महाराजांवर नाराज झाले. बहिर्जी घोरपडे आणि याचप्पा नाईक जिंजीवरुन निघून गेले .
झुल्फिकारखानने वेढा उठवून बंदीवशला आश्रय घेतल्यामुळे, संताजी घोरपडेंना कर्नाटकात राहावेसे वाटेना. स्वतःहून महाराजांनी आपल्याला बोलावून सन्मानाने सरसेनापतीची सूत्रे दिल्याखेरीज त्यांच्याकडे जायचे नाही असे ठरवून, संताजी महाराष्ट्राकडे वळले. त्यावेळी त्यांचेकडे २०,००० सशस्त्र घोडदळ एवढा मोठा फौजफाटा होता. मोगलांशी समोरासमोर सामना करण्याची कुवत दक्षिणेत फक्त संताजी जवळच होती. ते महाराष्ट्रात येताच फौजांना साताऱ्याकडे कुच करायला सांगून संताजीराव कापशीला आले. ते येताच सेनापतीच्या वाड्यात चैतन्य संचारले..
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment