विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - २९

 संताजी घोरपडे : भाग - २९

संताजी परतत असताना त्यांना महाराणी येसूबाई आठवल्या. गलगली मुक्कामी येसूबाई आणि शंभुराजे अजूनही मोगल कैदेत आहेत. आपले दीर इतके कफल्लक झाले हे कळले तर, त्यांचा विश्वास बसेल? नाही... नाही.. मी असं घडू देणार नाही. छत्रपतींनी माझ्या सगळ्या सनदा व वतन रद्द केले तरी, मी स्वराज्य रक्षणाची, छत्रपतींच्या गादीशी घेतलेली आण आणि निष्ठेला कलंक लागू देणार नाही. शरीरातील शेवटच्या रक्ताचा थेंबापर्यंत या संताजींची घोडदौड मराठेशाहीच्या रक्षणार्थ तलवार तळपत राहील.

चिंतामग्नावस्थेत राहुटीच्या बाहेर नारो उभा पाहून, संताजींनी विचारले, "धनाजी आहेत तळावंर?"

"नाही. ते महाराजांच्या भेटीला गेलेत."

"का?"

'बादशहाच्या छावणीवरून एक सांडणीस्वार तुमच्याकडे बादशहाचा लखोटा तुम्हाला देण्याकरता घेऊन आला होता. मी सर्व दुरून बघत, ऐकत होतो. धनाजींनी लखोटा वाचला आणि त्याच क्षणी घोड्यावर स्वार झाले."

बादशहाचा कुटील डाव संताजींच्या लक्षात आला. पण तसं भासवलं नाही. नारो म्हणाला, "तात मला चिंता वाटते."

'अरेऽ, कसली चिंता? नारो, जर नियतीचाच कोप झाला तर संकटाची मालिका सुरू होते. नारो, काळानेच प्रलय मांडला तर आधार कुणाचा घ्यायचा?"

"तात, काय झाले? मला नाही सांगणार?"

'नारो, सध्या मला एकांताची आवश्यकता आहे."

काहीतरी विपरित घडले असावे असे नारोला वाटले.

"तात, एक खुशखबर आहे."

"काय?"

"तात, मातोश्री द्वारकाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. आपले विश्वासू हेर नाईक बाबा खबर घेऊन आलेत. आत ते थोडे विसावले आहेत."

संताजी राहुटीच्या आत गेले. त्यांच्याशी थोडे बोलणे सुरू होत नाहीत तोच, राहुटी बाहेर "जय जय रघुवीर समर्थ" स्वर ऐकू आला.

संताजीरावांच्या मनी आले, अनेक घटना एकाच दिवशी अशा काही घडून येत आहेत की, एकीचा मेळ दुसऱ्याशी घालता येत नव्हता. आपल्या अनुपस्थितीत बादशहाच्या स्वाराने लखोटा धनाजीच्या हाती का दिला असावा? म्हणजे मराठ्यांचा सेनापती मोगलांना फितूर झालाय ही गोष्ट अजून जाहीर व्हायची आहे, तोच हा बैरागी?

नारो समोर गेला. आजवर साधुसंत कधीच राहूटी अथवा तळावर उतरले नव्हते. आपल्यावर कठीण प्रसंग ओढवला असता, अकस्मात दैदीप्यमान साधूने दर्शन द्यावे... नक्कीच नियतीचा काही हेतू असावा. असा विचार करून संताजीराव साधूच्या स्वागतासाठी पुढे आले आणि नमस्कार केला.

"अजिंक्य भवतु!"

"महाराज, तुम्ही मला अजिंक्य म्हणून आशीर्वाद दिलाय!"

"होय! संताजीराव!"

"पण.... मला सर्व ठाऊक आहे. छत्रपतींनी नुकतेच माझे सेनापतीपद रद्द केले आहे. छत्रपतींच्या गादीला समर्थांचा आशीर्वाद आहे. आणि मी समर्थ सेवक मेरुस्वामी तुला अजिंक्य असा आशीर्वाद देतो आहे."

"पण महाराज, तुमच्या आशीर्वादाने माझं गेलेलं सेनापतीपद थोडंच परत मिळणार आहे?"

"वत्सा, तू दरबारात सेनापतीपदाबद्दल आव्हान देऊन आला आहेस. तू अजिंक्यच ठरणार आहेस. छत्रपतींच्या हुकमाने सेनापतीपद रद्द झाले असले तरी, ते परत मिळण्याकरिता तुझ्या वाड्यावर नुतन बालक जन्माला आला आहे."

संताजींनी मेरु स्वामींचे पाय धरले. "महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात. तुमची आमच्यावर कृपा व्हावी."

राहुटीत त्यांच्यासाठी तयार केलेल्या बैठकीवर बसल्यावर, मेरुस्वामींनी पुन्हा "जय जय रघुवीर समर्थ" चा उच्चार केला.

नुकतेच अपमानित होऊन जिंजीहून परत आल्यावर मेरू स्वामीच्या दर्शनाने संताजीची उदासीनता कुठल्या कुठे पळून गेली. मध्यरात्र झाली तरी मेरू स्वामी व संताजींची अखंड चर्चा चालूच होती.

"संताजी, पन्हाळा पुन्हा मराठी दौलती सामील झाला."

"ही वार्ता प्रथमच आपल्या तोंडून ऐकतो आहोत. एवढी महत्त्वाची वार्ता आमच्यापर्यंत पोहोचू नये ही खास खबरदारी घेतलेली दिसते."

"तसं असलं तरी माझ्याकडून का होईना बातमी समजलीच ना? संताजीराव, स्पष्टवक्तेपणा तुमचा खरा अलंकार आहे. तडजोडीला तुमच्याजवळ वाव नाही. पण मनुष्य जीवनात असे काही प्रसंग आणि योगायोग येतात की…"

"होय स्वामीजी, गेले दोन दिवस मी त्या योगायोगांच्या फेऱ्यात भरडला जात आहे."

संताजीरावांच्या मनाला सांत्वना मिळेल असे उपदेशाचे चार शब्द सांगून त्यांना निद्राधीन होण्याचा आदेश दिला.

संताजी आपल्या राहुटीत येऊन पडले. त्यांचे खवळलेले मन मेरुस्वामींमुळे थोडं शांत झालं. पण जिंजी दरबारातले वाक्य सारखं त्यांच्या मनात घुमत होते.. शिक्का कटारीवर असलेले शब्द...

'श्री राजाराम चरणी तत्पर। संताजी घोरपडे निरंतर।'

नाही... नाही ह्या अमली पदार्थाच्या व्यसनाधीन झालेल्या राजाची सेवा चाकरी कदापी करणार नाही. या संतांजीची तलवार मराठेशाहीच्या रक्षणार्थ सदैव तळपत राहील. पण अशा बदफैली राजाची सेवा करणार नाही. राजा नागवला तर प्रजेने जाणीव करून देण्यात काहीच गैर नाही आणि मी तर मराठ्यांचा सरसेनापती आहे.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...