वास्तविक संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी एकाच वेळी लांबच्या मोहिमा आखून शत्रूचा पाडाव करण्याकरता सीमाल्लोंघन केले होते. संताजी रामदुर्ग, गदक, चित्रदुर्ग, बसवपट्टण अशा मोहिमेत गुंतले असताना धनाजी जाधव जिंजीकडच्या भागात आले. बंदीवशाहून परतलेल्या झुल्फिकारखानाबरोबर एक दोन चकमकी केल्या आणि छत्रपतींसमोर आपल्या पराक्रमाचे गोडवे गायले आणि संताजी दाखवत असलेले शौर्य हे स्वराज्यासाठी नसून स्वतःसाठी वेगळ्या राज्यउभारणीसाठी करत आहेत, असे वरचेवर राजाराम महाराजांच्या गळी उतरवत होते. महाराजांची अगोदरच संताजी घोरपडे वर खप्पा मर्जी होती.
सेनापतीपद देते वेळेस महाराजांचा कल धनाजी जाधवांकडे होता. पण पंतांच्या आग्रहांमुळे सेनापती पद संताजी घोरपडेंना मिळाले. वय आणि अनुभव लक्षात घेता हे पद धनाजीना हवे होते. ते पद संताजींना मिळाल्यापासूनच धनाजींच्या अंतकरणात द्वेषाचा अंकुर फुटला. दोघांच्या अभेद तटबंधीला इथेच तडा गेला. धनाजींच्या मनात तेढ वाढतच गेली. नागोजी माने, माणकोजी पांढऱ्यांना जवळ केले.
तसे पाहिले तर धनाजी व संताजींच्या स्वभावात फार मोठा फरक होता. संताजी कडक शिस्तीचे, स्वराज्याचे कट्टर अभिमान होते, तर धनाजीचा स्वभाव ढीला, चालढकल करणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या शिस्तीचे काटेकोर पालन संताजी करत होते. त्यामुळे त्यांचे वर्तन न्यायी व कठोर बनले होते. गंभीर गुन्ह्याला त्यांच्याजवळ दयामाया नव्हती. आपपर भाव नव्हता, पक्षपात त्यांना शिवलाही नव्हता. याउलट धनाजीचे होते. त्यामुळे त्यांच्या सैनिकांचे वर्तन स्वैर होते. त्यामुळे धनाजीचे वजन वा प्रभाव कधीच पडला नाही
संताजींचे व्यक्तिमत्वच वेगळे होते. शिवाय ते अति बुद्धिमान व अति पराक्रमी सेनानी होते. म्हणूनच बादशहाच्या एकाहून एक सरस सरदारांना त्यांनी खडे चारले होते. संताजींच्या मोठमोठ्या विजयाच्या बातम्या येऊ लागल्या, तसतसे धनाजी डिवचले जाऊ लागले आणि राजाराम महाराजांना चिथावणी देत राहिले.
ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे जिंजीला छत्रपतींच्या दरबारात येऊन दाखल झाले. येताच त्यांनी छत्रपती महाराजांना व महाराणींना मुजरा केला. महाराणी म्हणाल्या, "छत्रपतींच्या मुजऱ्याला यायलाही सेनापतीला वेळ नाही का?"
"आईसाहेब, बाहेर शत्रूंच्या कारवाया इतक्या वाढत आहेत की महाराजांच्या पायाशी मुजरे करत बसण्याची ही वेळ नाही."
संताजीच्या या ठसकेबाज उत्तराने धनाजी दचकले. संताजीच्या मानाने त्यांचा पराक्रम थोडा कमीच पडत होता. मोहिमा सोडून ते जिंजीतच स्थिरावल्यामुळे संताजींचे तिखट बोलणे त्यांच्या वर्मी लागले. ते तडक दरबारातून निघून गेले.
त्यानंतर महाराजांची आणि संताजींची शाब्दिक चकमक उडली. ताराऊंनी हस्तक्षेप केल्याने महाराजांना चेव आला. संतापाने त्यांचा चेहरा लाल झाला. हाक मारली, "खंडो बल्लाळ.."
"संपूर्ण महाराष्ट्रासहित दक्षिणेपर्यंत रात्रंदिवस संचार करणाऱ्या संताजीला वाट दाखवण्याची गरज नाही. मी माझ्या पायाने जातो."
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक शिस्तीत तयार झालेले संताजींचे मन कुठल्याही प्रकारची तडजोड, नरमाई किंवा शितलता मानायला तयार नव्हते. पंतांचं मन आपल्याविषयी कलुषित होऊ नये म्हणून, त्यांनी महाराजांशी झालेल्या वादाची कबूली देऊन ताबडतोब लखोटा पाठवला. त्याचबरोबर महाराज आपल्याविषयी कसा पक्षपात करतात हे सुद्धा प्रकर्षाने नमूद केले. एवढे होऊनही महाराजांशी सेवकाच्या नात्याने एकनिष्ठ राहू. आमची निष्ठा छत्रपतीच्या गादीशी आहे. महाराजांचे मनात आमचे विषय दुजा भाव का निर्माण झाला? आम्ही जिंजी पासून दूर प्रांतात लढत होतो. तिथेच आम्हाला कळले की, महाराजांची आमच्यावर गैरमर्जी झाली आणि तिकडेच दूर राहावे व धनाजींनी जवळ राहावे अशी त्यांची इच्छा दिसली. आमचे स्वराज्यासाठी श्रम कमी पडले असे नाही. फक्त राज्यात बखेडा माजू नये यासाठी आम्ही महाराजांचे बोलणे ऐकून घेतो.
राजाराम महाराजांनी झुल्फीकारखान, असद खान यांना ससैन्य बंदिवशाला जाण्याची वाट मोकळी करून दिली, याचा संताजींना संताप आला. ह्याच कारणाने घडलेल्या वादातून त्यांचे सेनापतीपद काढून धनाजीला दिले. पुन्हा महिन्याभराने संताजींना सेनापतीपद दिले. त्यामुळे धनाजी जाधवांचा संताजीवर द्वेष अधिकच बळावला. त्यांच्या मनात द्वेषाची मुळे खोलवर रुजली. मध्यंतरी संताजी धनाजीचे खटके उडले. पण प्रल्हाद निराजीने मध्यस्थी करून वादावर पडदा पडला असला तरी दोघांची भांडणे विकोपाला गेली होती.
संताजी घोरपडे निघून जाताच महाराजांचा पारा चढला. याला धडा शिकवायचा. त्यांनी प्रण केला. धनाजीने खतपाणी घातले. शत्रूचा बिमोड करायचे सोडून स्वकीयांच्या नाशासाठी खुद्द छत्रपती जिंजी सोडून कांजीवरम कडे निघाले....
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment