विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - २२

 संताजी घोरपडे : भाग - २२

संताजी घोरपडे विचारात मग्न असतानाच सरलष्कर धनाजी जाधव आले. दोघेही उरी भेटले. तोच नागोजी माने व सुभारराव येताना पाहून संताजींच्या कापाळावर तिरस्कारच्या सूक्ष्म आठ्या उभरल्या. हळूच म्हणाले, "ही बला कशाला घेऊन आलात धनाजी?"

जाधवांनी हेतू पुरस्पर बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि सचिव शंकराजींना म्हणाले, "आपली इथे गाठ भेट होईल अशी आशा नव्हती. हुकूमतपन्हाच्या सांगण्यावरून सेनापतीशी थोडी बोलणी करायला आलो."

संताजी म्हणाले, "वडिलकीच्या नात्याने मला काही सुनवायचे होते सरकारांना..."

धनाजी म्हणाले, "तुम्हाला कोण सुनवणार? तुम्ही तर सगळ्यांनाच जरबेत ठेवलय...."

"जरब फक्त दुश्मनांसाठी. पंत आणि शंकराजी सरकारपुढे आमची मान नेहमीच झुकलेली असते. ते जाऊ देत. दुपारचा खाना तुम्ही आणि शंकराजी सरकारने आमच्याबरोबर घ्यावा ही विनंती.'

"थांबू की! परंतु अगोदर कामगिरी. हे नागोजी माने आणि त्यांचे सुपुत्र सुभानराव..''

क्षणात संताजींची मुद्रा पालटली. क्रोधाग्नीने सर्वांगात इंगळ्या उसवल्यागत झाल्या. तरी क्रोधावर नियंत्रण ठेवत म्हणाले, "यांना कोण ओळखत नाही? हे म्हसवडचे नागोजी माने. पूर्वी आदिलशाही, नंतर मोगलांकडे चाकरीत होते. आता कोणाकडे आहे माहित नाही.''

या बोलण्यावरून माने आणि संताजीत थोडी शाब्दिक चकमक झाली.

माने म्हणाले, "धनाजी, आपण इथे येण्यात चूक केली."

"नागोजीराव जरा सबुरीने घ्या. अद्याप आपण छत्रपती स्वामींचा खलिता संतांजीरावांना दिलेला नाही. संताजीराव बोलले ते पूर्वग्रहामुळे. तुम्ही छत्रपतींच्या पायाशी घेतलेल्या आणाभाकाची त्यांना कल्पना नाही."

"कसला खलिता? कसल्या आणाभाका?"

"घ्या... वाचा म्हणजे कळेल तुम्हाला." नागोजीने धनाजींच्या हातून खलिता घेऊन संताजीकडे भिरकावला. त्याची हिंमत बघून संताजी त्याच्याकडे एकटक पाहतच राहिले. शंकराजी खलिता उचलून वाचू लागले. धनाजीना काय बोलावे सूचेना. खालच्या आवाजात म्हणाले, "हे दोघे पिता-पुत्र स्वामींच्या सेवेत रुजू होण्यासाठी आले आहेत. स्वामींच्या शब्दाला मान देऊन सुभानरावला तुमच्या फौजीत दाखल करून घ्यायला हवे. हे माने पिता-पुत्र कुठल्या लोभापायी किंवा लाभापाई स्वामींच्या सेवेत रुजू होत नाहित."

नागोजी म्हणाला, "लाभ म्हणाल तर, बादशाही चाकरीत जास्त होता. पण हे श्रींचे राज्य... देवभूमी... यांचे सेवेत आयुष्य खर्ची पडावं या पवित्र हेतूने आम्ही छत्रपती स्वामींची भेट घेतली."

संताजींनी नागोरावकडे ढुंकूनही पाहिले नाही. "धनाजीराव, तुम्ही... तुम्ही यांच्या निष्ठेबद्दल शिफारस केलीत? तुम्ही कोणता लाभ पाहिला? या श्रीच्या राज्याच्या? या नागोजी मानेचा? की खुद्द तुमचा?"

"संताजीऽऽऽ", या अनपेक्षित आरोपाने धनाजी भडकून उठले. "संताजीराव, तुमच्यापेक्षा जास्त निष्ठेने या राज्याची सेवा मी केलीय! माझ्याबद्दल असे बोलणे तुम्हाला शोभत नाही. या मराठेशाहीत सर्वांपेक्षा मला जास्त ओळखतात. सरसेनापतीच्या अधिकाराची नशा डोक्यात जाऊ देऊ नका."

"धनाजीराव, आमच्या अनेक पिढ्यांनी छत्रपतींच्या गादीशी निष्ठा वाहिली आहे. अधिकाराची नशा मला नाही, तुम्हाला चढली असणार. म्हणूनच माने सारख्या दलबदलू, स्वार्थी माणसाच्या निष्ठेबद्दल स्वामींना शिफारस केली. महाराजांना बदसल्ला दिला."

आता मात्र शंकराजींना हस्तक्षेप करणे भाग पडले. म्हणाले, "संताजीराव, धनाजीराव तुमच्या बरोबरचे सेनानी आहेत. तुम्ही त्यांच्याशी अदबीने बोलायला हवे. आणि नागोजी माने बाबतीत तुम्हाला मिळालेला हुकुम खुद्द महाराजांनी फर्मावलेला आहे. तरीसुद्धा मला वाटते, ही महाराजांची फार मोठी चूक होत आहे. चूक आहे की बरोबर हे ठरवण्याचा आपला अधिकार नाही संताजीराव."

"का नाही? जीवावर उदार होऊन रोज मी या राज्यासाठी लढतो. सूर्याजी पिसाळापाठोपाठ पिराजी घाटगेनी पन्हाळा मोगलांच्या घशात घातला. आणि आता मोगलांकडून आलेले नागोजी कोणत्या हेतूने आले याची शहानिशा झाली का? आणि माझ्या फौजेत कोणाला घ्यायचे व कोणाला नाही, हे मी ठरवणार."

माने म्हणाले, "आमच्याजवळ दहा हजार कडवी फौज आहे."

शंकराजी म्हणाले, "संताजीराव, माने पोख्त जमानाशी येत आहेत."

संताजी तसूभरही विचलित न होता म्हणाले, "हे असले दहा हजार अस्तिनीतले निखारे माझ्या फौजेत नको आहेत."

शंकराजी गडबडले. म्हणाले, संताजीराव, "तुम्ही फार मोठी चूक करत आहात. महाराजांच्या कानी ही खबर जाईल तेव्हा ते तुमच्यावर ...."

"नाराज होतील. होऊ देत. गाठ पडेल तेव्हा मीच त्यांना जाब पुसणार आहे."

"तुम्ही.... तुम्ही, महाराजांना जाब विचारणार? हुज्जत घालणार? "

"त्याशिवाय स्वामींनी मला पर्यायच ठेवला नाही."

धनाजी म्हणाले, "शंकराजी सरकार, या माणसाशी सरळपणे बोलण्यात अर्थच उरला नाही."

संभ्रमित होऊन नागोजी माने म्हणाले, "धनाजीराव या परिस्थितीत आम्ही काय करावे?"

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...