द्वारकाबाईंनी घाटगेबाबतीत अशी काही तोड सुचवली की, संताजींना द्वारकाबाई सारखी पत्नी मिळाल्याचा अभिमान वाटला. नंतर हासपरिहास करत झोपी गेले.
मोगलांचा पाडाव करण्याकरिता राजाराम महाराजांनी लोकांना उत्तेजन देण्यासाठी इनामे, जहागिरी, बक्षीस सढळ हाताने देणे सुरू केले. त्यामुळे महाराजांची किर्ती चौमुखी पसरली. लोकही स्वराज्यासाठी कामे करण्यास उत्साहाने उद्युक्त झाली.
मराठी सरदारांनी बादशहाच्या सैनिकांशी लढून बालगण, गोंडावण, स्वदेश, कर्नाटक, जिंजी वगैरे ठाणे व दुर्ग काबीज केले. मराठी फौज हिंडती फिरती ठेवून व लढाई करून खंडण्या घ्याव्यात, बादशहाची ठाणी उडवावी, बादशहाचा मुक्काम असेल तिथे जाऊन छापे घालावे, मुलुख मारावा, मिळेल ती लूट मारावी अशी सर्व धांदल चालली. चहुकडे मराठी फौज विखुरली असल्यामुळे, ती किती आहे याचा अंदाज मोगलांना लागत नव्हता. बादशाह समजून चुकला, मराठेशाही काही मोडत नाही.
जिंजीमध्ये राजाराम महाराजांचे योग्य बस्तान बसावे, किल्ल्याचा व इतर तरतुदीचा योग्य बंदोबस्त करण्यास पुरेसा अवधी मिळावा यासाठी सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव व इतर मराठी सेनानी महाराष्ट्रात मोगल सेनेला गुंतवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते आणि संताजींचा हेतू सफल पण झाला.
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला मराठ्यांची नवीन राजधानी स्थापन केली. छत्रपतीपद व राजचिन्हे धारण केली. अष्टप्रधानांच्या नेमणुका जाहीर केल्या. रामचंद्रपंतांच्या शिफारसी वरून संताजीचे सेनापती पद त्यांच्याकडे कायम ठेवले.
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे राजाराम महाराजांनी सर्वांना आवाहन केले.
सेनापती घोरपडेंच्या मोगलांशी केलेल्या लढायात मिळालेल्या विजय वार्ता मराठा सरदारांच्या कानावर येऊ लागल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. मोगली चाकरी पत्करलेले अनेक मराठा सरदार राजाराम महाराजांकडे परत आले. त्यांचे स्वागत करून त्यांची वतने कायम केली. या परत आलेल्या सरदारात नागोजी माने, हनुमंतराव निंबाळकर, नेताजी शिंदे, मानकोजी पांढरे इत्यादी होते. महाराजांच्या आज्ञेनुसार या सर्वांना संताजींनी सेनेत सामील करून घेतले. नागोजी माने आणि धनाजी जाधवचे जरा जास्त सख्य होते.
वाड्यातील सदरेवर संताजी घोरपडे व विशाल गडावरून आलेले शंकराजी नारायण राजकारणा विषयी बोलत बसले होते. बोलता बोलता शंकराजी म्हणाले, "सेनापती, धनाजी जाधव तुमच्यावर अतिशय नाराज आहे."
"का? आमच्याकडून असा कोणता गुन्हा घडला? नारायणजी, पंत नाराज व्हावे असं काय घडले याची खरंच आम्हाला बिलकुल ही कल्पना नाही."
"पन्हाळगडावर एकाकी लढणाऱ्या घाटगेच्या मदतीला जाण्याची पंतानी तुम्हाला आज्ञा केली होती... "
"ते होय! त्याचवेळी बादशहा छावणीकडे निघण्याची खबर मिळाली म्हणून...."
"पण बादशाही तुकडी जात असताना त्यांच्या फरशा पडला. तुकडीला अडवले....पण संताजी, पन्हाळा मोगलांच्या हाती गेला त्याचे काय?"
"आम्ही पन्हाळा पुन्हा शर्थीने जिंकून घेऊ.ते नंतरचे नंतर. पण आज तुम्ही पंतांचा हुकुम न मानल्यामुळे घाटगेंनी मोगलांची चाकरी पत्करली. हे तुमचे चुकलेच."
"संताजीराव, तुम्ही सेनापती आहात. तुमच्यावर हुकुमतपन्हाने सोपवलेली कामगिरी पार पाडणे, एवढच तुमचं काम. तुम्ही मर्यादा ओलांडली आहे."
"शंकराजी सरकार, थोडी मर्यादा ओलांडली गेली खरे, पण मला त्या पिराजी घाटगेला धडा शिकवायचा होता. त्याला फार घमेंड होती. तो स्वतःला मराठेशाहीचा आधारस्तंभ समजत होता. आता बसला बादशहाचे पाय चेपत."
"धडा पिराजीला नाही, उभ्या दौलतीला भोगावा लागलाय. तुमच्या अशा उद्दाम वागण्याचा परिणाम काय होईल याचा विचार केला का? तुमच्यासारखा सेनापती असे मनमानेल तसे हुकूम सोडायला लागला तर......"
"सरकार, मी सरसेनापती आहे. सांगकाम्या माणूस नाही."
"संताजीराव, युद्धाच्या वेळी तुमच्या हाताखालच्या सेनाधिकाऱ्याला हुकूम देता व त्याने त्याप्रमाणे वागावे हा तुमचा आग्रह असतो ना?"
"अलबत!"
"मग तुमच्या फौजेतल्या प्रत्येकाने स्वतंत्रपणे डोके चालवायचे ठरवले तर काय होईल? सैन्यात बेशिस्त निर्माण होईल ना?
मग विचार करा... हुकूमतपन्हाचे हुकूम सरसेनापतीने धुडकावून लावायला सुरुवात केली तर राज्यकारभार कसा चालणार? तुम्हाला सरसेनापती पद मिळवण्यासाठी त्यांनीच महाराजांना शब्द टाकला होता हे विसरलात का? मी तडक विशालगडी जाऊन पंतांची समजूत काढून त्यांची माफी ...."
"त्यासाठी जायची गरज नाही. खलिता पाठवला तरी चालेल. ठीक आहे. तुमच्या मर्जीप्रमाणे करू."
खलिता धाडण्याचा विचार करून पन्हाळगडावरचे राजकारण किती विकोपाला गेले? घाडगेनी काय करामत करून ठेवली या विचारात असतानाच.......
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
नमोस्तुते!
No comments:
Post a Comment