विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग - ३१

 संताजी घोरपडे : भाग - ३१

संताजीराव कापशीला येताच आपल्या दोन पत्नी, मोठा पुत्र राणोजी व नवजात बालकात रमून गेले.

दुपारी सदरेवर गावकरी भेटायला आले. संताजीराव सर्वांची आस्थेने चौकशी करत होते. न्यायनिवाडा करत होते. तेवढ्यात नारो संताजींच्या भेटीला आला.

"तात, एक नामी खबर घेऊन आलो. मोगलांचा सरदार छत्रसाल राठोड बराच मोठा फौजफाटा आणि नऊ जंगी तोफा घेऊन जिंजीकडे निघाला आहे. मी सर्व तुकड्या एकत्र करून मोक्याच्या जागी दबा धरून बसवून आलो."

संताजींनी विना विलंब मोहिमेवर जायची तयारी केली. वाटेतच त्यांना मानकोजी पांढरे मोगलांना मिळाल्याचे कळले. ती खबर राजाराम महाराजांना कळविण्याची व्यवस्था केली. संताजींचा तळ जिथे पडला होता, तिथे नवीन सैन्याची भर पडली होती. त्यातच एक आनंदाची खबर मिळाली. संभाजी राजेंच्या वधानंतर हनुमंतराव निंबाळकर हा मराठ्यांचा सरदार मोगलांना मिळाला होता, तो आता स्वराज्यात येऊन मोगलांविरुद्ध लढू लागला. त्याची आणि संताजींची वाटेत अचानक गाठ पडली. आधी संताजींनी त्यांची चांगली कान उघडणी केली नंतर नरमाईने म्हणाले, "हिम्मतखान माझ्या पाठीवर आहे. तुम्ही निघा. आम्ही हिंमत खानचा समाचार घेतो."

संताजींनी हिम्मतखानच्या हालचालीवर आपले लक्ष केंद्रित केले. खान बलाढ्य शत्रू असून जय्यत तयारीनिशी असल्याची खबर होती. त्याच्याशी समोरासमोर सामना करून आपल्या फौजेचे नुकसान करून घेण्यापेक्षा गनिमी काव्याने त्याची शिकस्त करावी असा डाव आखत असतानाच दुसरा एक मोगल सरदार नजीब खान बहादूर मराठी प्रांतावर हल्ल्याच्या तयारीने जात असल्याची पक्की खबर आली. त्याला कल्पनाही नव्हती की संताजीसारखा शत्रू आपल्या जवळपास आहे.

नजीब खान बहाद्दूरवर संताजींनी अचानक हल्ला चढवून त्याच्या सैन्याला चारी बाजूने घेतले. नजीब खानसमोर शरणागती खेरीज पर्याय नव्हता. सर्व मोगल सरदारांना माहीत होते की, संताजीशी सामना म्हणजे एक तर मरण किंवा शरण. नजीबखानने मरण्यापेक्षा शरण पत्करले.

माणगावच्या परिसरात हिंमत खान असल्याची कुणकुण लागल्यामुळे संताजींनी आपला मोर्चा माणगाव कडे वळवला. गनिमी काव्याचे मुख्य तंत्र म्हणजे, शत्रूला अचानक चहू बाजूने घेरुन कह्यात घेणे! खान न भूतों न भविष्यती अशा संकटात सापडला. संताजींच्या धाकाने, हिम्मत खानची हिम्मत खचत असतानाच, खानाच्या सुदैवाने हमीउद्दीनखान व खाजाखान हे दोन मोगल सरदार हिंमत खानच्या मदतीला धावून आले. पुन्हा नव्या जोमाने हिम्मत खान लढण्यास सज्ज झाला. मोगल वरचढ होत असलेले पाहताच संताजींनी पवित्रा बदलला. पुढच्या सगळ्या योजना बारगळल्या.

मोगल सैन्य संताजी घोरपडेंच्या मागावर निघाले. काही अंतर गेल्यावर संताजीने आपल्या सैन्याची विभागणी केली. आणि योग्य सूचना देऊन, नारोच्या नेतृत्वात रवाना केले व स्वतः विशाळगडाकडे रामचंद्र पंतांच्या भेटीस निघाले.

रामचंद्र पंत, संताजीच्या चुकीचे माप त्यांच्या पदरी घालीत म्हणाले, "संताजीराव, तुमचे शौर्य आणि शिस्त पाहून महाराजांना गळ घालून सेनापतीपद तुम्हाला मिळवून दिले आणि तुम्ही खुद्द महाराजांनाच हुकूम बजावायला निघालात."

"मी काय गैर वागलो, तेवढं मला निदर्शनास आणून द्यावे."

"संताजीराव, तुमचं शौर्य ,कर्तृत्व, निष्ठा याबद्दल आम्हाला तीळमात्र शंका नाही. तुमच्या तलवारीच्या शौर्याइतकीच मुत्सद्यांच्या बुद्धीचीही राज्यकर्त्यांना कदर करावी लागते. आणि नेमके हेच तुम्ही विसरलात.

महाराजांनी झुल्फीकारखानाला बंदवशला सुखरूप जाऊ दिल्याचा तुम्हाला राग आला. पण त्यावेळी खानाला दगा फटका झाला असता तर, मोगलांच्या छावणीत असलेल्या महाराणी येसूबाई व शाहू राजेंना धोका झाल्याशिवाय राहिला नसता. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार महाराजांनी केला त्यात त्यांचे काय चुकले?"

"पण माझे सेनापतीपद...?"

"अलिखित स्वरूपात तुमच्याकडेच आहे. रागाच्या भरात महाराज बोलून गेले असतील इतकच. त्यानंतर तुम्ही महाराजांना प्रत्यक्ष भेटून पुढच्या मोहिमेचा सल्ला घ्यायला हवा होता.

तुम्ही त्रिचनापल्लीला वेढा दिला. शेवट कसा झाला? हीच मोहीम महाराजांना विश्वासात घेऊन केली असती तर, महाराजांच्या मनातील कटूताही गेली असती आणि आपली एकजूट शाबूत राहून आपल्यातली दुही शत्रूला दिसली नसती. एवढेच नव्हे तर, त्रिचनापल्लीच्या स्वारीवर खुद्द महाराजांना तुमच्या सोबत यायचे होते."

"काय सांगता?"

"खरं तेच.. महाराजांना तुमचा रुसवा घालायचा होता. त्यासाठीच त्यांनी ही योजना आखली होती. पण... तरीसुद्धा माझ्याकडे आलेल्या महाराजांच्या प्रत्येक पत्रातून तुमचा उल्लेख सरसेनापती असाच केला आहे."

"पंत आता मी काय करावे?"

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...