विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2026

संताजी घोरपडे : भाग- ४०

 संताजी घोरपडे : भाग- ४०

धनाजी जाधव यांनी छत्रपती राजाराम महाराजांना बरोबर पटवून दिले. एखाद्या बंडखोर सेनानीकडे एवढे मोठे सैन्य ठेवणे छत्रपतीच्या गादीला धोकादायक आहे, असे भासवून त्यांनी संताजीच्या फौजेतील बहुसंख्य सरदार, सैन्य आपल्याकडे घेतले.

संताजीच्या सैन्याला गळती लागली आणि दिवसेंदिवस सैन्य कमी होऊ लागले. तरी या ही परिस्थितीत त्यांनी स्वराज्याचा शत्रू झुल्फिकारखानला कर्नाटकात अप्रतिम झुंज दिली. त्यामुळेच झुल्फिकार खान जिंजीचा वेढा उठवून मद्रासकडील सागर पट्टीवरील वेल्लोर, बंदीवश, अर्काट इथे मोठ्या बंदोबस्ताने राहू लागला. तो अर्काटला असताना संताजी त्याच्यावर चालून गेले. खानला खबर मिळताच अर्काट मधून हळूच बाहेर पडला. पण वाटेत त्याला संताजींनी अडवून त्याची कोंडी केली. खानाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली शेवटी त्यांनी आपल्याला अर्काटकडे जाऊ देण्याची दिनवाणी विनंती केली. संताजीला आपले पाठबळ कमी झाल्यामुळे जास्त ताणून धरले नाही. त्यांनी खानाला जाऊ दिले.

संताजींच्या सैन्याला लागलेली गळती थांबलेली नव्हती. इतक्या कमी सेनेनिशी कर्नाटकात राहणे धोक्याचे म्हणून, ते महाराष्ट्राकडे वळले. बरेच सहकारी सोडून गेले तरी अजून उमेद कमी झाली नव्हती. उमेद बाळगूनच त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. पण धनाजी त्यांचे मागावरच होते. त्यांनी हिंमतराव निंबाळकराला पुढे करून दहिगावजवळ संताजीवर हल्ला चढविला. सैन्याचे पाठबळ नसतानाही संताजींनी माळशीच्या परिसरात दहिगाव जवळ हनुमंतरावास रोखून धरले. तोच धनाजीने निंबाळकरांच्या मदतीला फौज धाडली. लढाईच्या धुमचक्रीत संताजीचे कैक सैन्य त्यांना सोडून पसार झाले. काही हनुमंतास जाऊन मिळाले. आणि वीस हजार फौजेचा मराठ्याचा सरसेनापती संताजी घोरपडे एकाकी... अगदी निवळ एकाकी राहिले.

ज्याने औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेला शह देऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आणलेल्या मराठेशाहीला वाचवले, त्याच मराठेशाहीच्या म्होरक्यांनी संताजीला एकाकी पाडले. शिखर शिंगणापूरच्या डोंगराळ भागात हा मराठ्यांचा अंजिक्य वीर शत्रूपासून, स्वकीयांपासून स्वतःचे रक्षण करत रानोमाळ भटकू लागला. फक्त आत्मबळ आणि मेरू स्वामींनी दिलेला अमोल मंत्राच्या जोरावर....

धनाजी-संताजीच्या शिगेला पोहोचलेल्या वैमनस्याची खबर बादशहाला कळल्यावर, या आयत्याच चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. संताजी दुर्दैवाच्या फेर्‍यात पुरते अडकले होते. त्यातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक गुरफटत गेले. त्याला कारण धनाजीचे पूर्वग्रह दूषित असलेले डावपेच कारणीभूत ठरले. मराठ्यांच्या महाराष्ट्रात एकेकाळचा सरसेनापती मोगल शत्रू आणि स्वकीयांच्या कात्रीत भरडला गेला.

बादशाहच्या छावणीत घोरपडेचा निःपात कसा करावा यावर मसलती होऊ लागल्या. संताजीला नेस्तनाबूत करण्यासाठी बादशहाने गाझीउद्दीन फिरोजगांची नेमणूक केली. इकडे धनाजीने संताजीचा पाठलाग सोडला नव्हताच. दोघांनी संतांजीची कोंडी केली. हनुमंत निंबाळकरने महादेवाचा डोंगर पिंजून काढला. सर्वांचं एकच लक्ष होते.. संताजी घोरपडे! संताजींनी प्रत्येकाला आपल्या तलवारीची चुणूक दाखवली होती. ते सर्वजण एकवटून ह्या एकाकी पडलेल्या अजिंक्य वीराच्या परिपत्यासाठी रात्रंदिवस भटकत होते.

वैरद्वेष माणसाला कोणत्या थराला नेऊन पोहोचवतो याचा अनुभव महादेवाच्या डोंगरावर दिसू लागला. शंभू महादेवाच्या डोंगरावर संताजी विपन्नावस्थेत भूमिगत वावरत होते. ते अजून तरी कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते.

संताजी कारखेडच्या परिसरात वावरत असल्याची पक्की बातमी मसवडच्या नागोजी मानेच्या वाड्यावर पोहोचली. नागोजी मानेच्या पत्नीने नवऱ्याच्या मागे संताजीचा वध करण्याचा तगादा लावला. नागोजी म्हणाले, मी बादशहाच्या दरबारात विडा उचलून आलोय....

ते काही मला ठाऊक नाही. वैरी उंबऱ्यावर येऊन ठेपलाय. संताजी कारखेडच्या डोंगरात हमखास आहे. चारही दिशांनी त्याला मराठे व मोगलांनी घेरले आहे. अन्न मिळेना तरी, झाडाचा पाला खाऊन गुजरान करत आहे. आता तरी तुमची तलवार बाहेर काढा.

माझ्या भावाचा त्याने मुडदा पडल्यापासून माझ्या अंगाची नुसती लाहीलाही होतेय. कधी एकदा त्याचा नरडीचा घोट घेईन असं झालंय. नागोजी म्हणाला, मलाही अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्याने त्याच्या वाड्यातून मला घालवले ते विसरलो नाही. आता बघच, मी संताजीचा वध करूनच परत येईल. असे म्हणून नागोजी माने दख्खनचा वाघ कारखेलच्या जंगलात असण्याची पक्की खात्री घेऊन संताजींच्या मागावर राहिला.

संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख

नमोस्तुते!

No comments:

Post a Comment

संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१

  संताजी घोरपडे : अंतिम भाग - ४१ कारखेलच्या जंगलात भूमिगत असलेल्या संताजीच्या पाळतीवर नागोजी माने होता. ज्याने आपल्या कुळाचे क्षास्त्रतेज दा...