इंग्रज अधिकारी महादजींबद्दल लिहितात
महादजींच्या सहवासात दीर्घकाळ राहिलेला इंग्रज वकील अँडरसन, गव्हर्नर जनरल (ग.ज.) हेस्टिंग्जला लिहितो
"शांत व न्याय्य वृत्ती कायम ठेवून महादजींनी जी कामगिरी केली (साल्बाईचा तह), त्याबद्दल माझ्या मनात मोठा आदरभाव आहे. तो होता म्हणूनच बारभाईंच्या शंका दूर झाल्या. अशा थोर पुरुषांचा स्नेह आपण कधीही तोडू नये. युद्धात बाजू अंगावर आली तर त्यांचा हुरूप व शांती कधी भंग पावत नाही, तसेच विजय मिळाला असता ते हर्षाने फुगून जात नाहीत."
हा अँडरसन काही काळ शिंद्यांच्या दरबारात इंग्रज वकील होता,
आता प्रत्यक्ष ग.ज. वॉरन हेस्टिंग्ज काय लिहितो ते पाहूया —
"महादजी कपटी व पाताळयंत्री आहेत, ते इंग्रज व अर्काटच्या नबाबाचा अत्यंत द्वेष करतात (हा नबाब इंग्रजांचा मित्र होता) असे पुष्कळ लोक मला सांगतात. पण मला ते बिलकूल खरे वाटत नाही. माझा त्यांचा इतक्या वर्षांचा संबंध आहे, त्यात लबाडीचे एकही उदाहरण नाही. गोहदच्या राण्याचे उदाहरण वारंवार दिले जाते; पण त्या राणाने आमच्याशी इतकी लबाडी केली आहे की, महादजी जे करत आहेत ते योग्यच वाटते."
(राणाला योग्य धडा शिकवून श्रीमंतांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले, तेव्हा त्याच्या पत्नीने गोहदच्या किल्ल्यात स्फोट घडवून आत्महत्या केली होती. प्रत्यक्ष ती त्यात मृत्युमुखी पडली होती).
हेस्टिंग्ज पुढे म्हणतो, "उगाच अविश्वास दाखवून शिंद्यांना आपण दुखवू नये, नाहीतर आपल्या सत्तेस धोका निर्माण होईल."
या गव्हर्नर जनरलवर असा आरोप होता की, मुगल बादशहाला महादजींनी इंग्रजांच्या ताब्यातून सोडवून आपल्या नियंत्रणात ठेवले. तसेच इंग्रज-मराठा पहिल्या युद्धाबद्दल हेस्टिंग्जला ब्रिटिश पार्लमेंटसमोर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यावेळी त्याने महादजींचे ठाम समर्थन केले होते.
संदर्भ-अलिजाह बहाद्दूर महादजी शिंदे
डॉ.पी एन शिंदे

No comments:
Post a Comment