महादजी शिंदे यांचे विविध पैलू..
१) स्वभाव: महादजी हे मोकळ्या स्वभावाचे होते, त्यामुळे ते सर्वांना आवडत. त्यांच्याकडे अमाप संपत्ती असूनही त्यांची राहणी साधी होती.
२) धार्मिक सहिष्णुता: महादजी हे धार्मिक सहिष्णू वृत्तीचे असून ते परम कृष्णभक्त होते. ते ईश्वर भक्तीत बराच वेळ घालवत. कपाळावर मुद्रा लावत आणि हातात जपमाळ धरत. मथुरा, गोकुळ, वृंदावन, पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी मोठा खर्च केला. महादजींचे गुरू केवळ हिंदूच नव्हते, तर मुस्लीम पीर आणि साधू-संतही होते. वारकरी संप्रदायातील संत मल्लाप्पा वास्कर हे त्यांचे मुख्य गुरू होते. वास्कर महाराजांनीच महादजींना दीक्षा देऊन त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली होती. तीच माळ हातात घेऊन फावल्या वेळी 'पाटीलबाबा' भगवंताच्या नामाचा जप करत.
३) शिक्षण: महादजी सुशिक्षित होते. त्यांनी मराठीसोबतच फारशी आणि उर्दू या भाषांवरही प्रभुत्व मिळवले होते.
४) लेखन: महादजी शिंदे हे उत्तम कवी होते. जेव्हा जेव्हा त्यांना सवड मिळे, तेव्हा ते पदांची रचना करत. त्यांनी 'माधव' या टोपणनावाने अनेक अभंग रचले आहेत. त्यांनी 'माधवविलास' नावाचा ग्रंथही लिहिल्याचे आढळते.
५) प्रशासन: महादजी एखादे राज्य जिंकल्यानंतर तिथे तत्काळ चोख व्यवस्था लावत. राज्यात शांतता राखण्यासाठी योग्य उपाययोजना करून प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष देत. राज्याच्या हिशोबाबाबत ते अत्यंत दक्ष असत.
६) युद्धनीती: पानिपतच्या युद्धात महादजींना अपंगत्व आले होते, तरीही त्यांचा उत्साह कमी झाला नाही. ते पूर्ण तयारीनेच शत्रूवर आक्रमण करत. युद्धनीतीमध्ये ते नेहमी नवनवीन प्रयोग करत. सर्वांशी एकाच वेळी शत्रुत्व न घेता, 'एकाशी मैत्री आणि दुसऱ्याशी विरोध' यानुसार आपले डावपेच आखत.
७) सैन्यव्यवस्था: महादजींनी डी-बॉय (De Boigne) या फ्रेंच अधिकाऱ्याच्या साहाय्याने कवायती लष्करी फलटणी तयार केल्या. डी-बॉय, राणेखान, आंबुजी इंगळे, खंडेराव रायाजी पाटील यांसारख्या विश्वासू सरदारांच्या नियंत्रणाखाली त्यांनी फौज तैनात ठेवली. लष्कराचा मुख्य तळ उज्जैन आणि आग्रा येथे असे. महादजींनी आग्रा येथे दारुगोळा आणि तोफा तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता, ज्यावर संगस्टर (Sangster) नावाचा परदेशी तज्ज्ञ अधिकारी नेमला होता.
८) परकीय धोरण: वॉरन हेस्टिंग्स असेपर्यंत महादजींनी इंग्रजांना मर्यादित ठेवले होते. नंतर मात्र त्यांनी इंग्रजांना भारतातून घालवून देण्यासाठी प्रयत्न केले. टिपू सुलतानसारख्या इंग्रजांच्या प्रबळ शत्रूचा नाश होऊ नये, असे त्यांना वाटत असे.
९)गुणग्राहकता: महादजी हे गुणांचे चाहते होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक कर्तबगार अधिकाऱ्यांचा उदय झाला. डी-बॉय, लखबा दादा, राणेखान, जगूबापू, आप्पा खंडेराव, जिवबा दादा आणि अंबुजी इंगळे यांच्यातील कतृत्व ओळखून महादजींनी त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या.
१०) संगीताची आवड: महादजींना संगीताची विशेष आवड होती. त्यांच्या दरबारी बीनकार मोहम्मद जमान यांच्यासारखे निष्णात संगीतकार होते.
#तलवार बहाद्दर, मुत्सद्दी राजकारणी आणि संवेदनशील कवी अशा बहुआयामी गुणांचा संगम म्हणजे महादजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व होय.

No comments:
Post a Comment