कानोडची लढाई आणि इस्माईल बेगचा पराभव..!!
डिसेंबर १७९० मध्ये इस्माईल बेगने कानोडच्या दिशेने चाल केली. ही बातमी महादजी शिंदे यांचे सरदार खंडेराव हरी यांना समजल्यावर त्यांनी फौजेची तयारी केली आणि ते लढाईसाठी मैदानात उतरले.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्माईल बेगने मराठ्यांवर हल्ला केला. खंडेराव हरी यांनी त्याला मैदानात गाठले. दोन प्रहरपर्यंत दोन्ही बाजूंनी तोफांची जोराची लढाई झाली. त्यानंतर मराठा फौजेने चहूबाजूंनी हल्ला करून इस्माईल बेगचा पूर्ण पराभव केला. या लढाईत मराठ्यांनी त्याच्या २४ तोफा आणि इतर सरंजाम मिळवला. पराभव झाल्यावर इस्माईल बेग पळून कानोडच्या किल्ल्यात गेला.
"मिर्जा माघारे कानोडचे रुखास येऊन, आठ कोसांवर मुक्काम केला. छ ७ तारखेस राजश्री खंडेराव हरी यांसीं लढाईचा मुकाबला केला. रावमजकुरांनीं मैदानात घेऊन, नंतर चहूकडून हल्ला करोन मिर्जाची लढाई शिकस्त केली. चोवीस तोफा वगैरे सरंजाम लुटीत आला... पादशाहांनीं मिर्जाची लढाई शिकस्त जाल्याचें वृत्त श्रवण करून राजश्री खंडेराव हरी यांस सा पारचे खिलत, जेगा, शिरपेंच, मोत्यांची माळ, तरवार येणेंप्रमाणें इनायत करून..."
या विजयाची बातमी दिल्लीत पोहोचल्यावर बादशहा खूश झाला. त्याने खंडेराव हरी यांना पोशाख, शिरपेच, मोत्याची माळ आणि तलवार देऊन त्यांचा सन्मान केला. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठेशाहीच्या फौजेने उत्तरेत आपली ताकद कशी वाढवली होती, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
संदर्भ:- दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २ रा) संपादक : दत्तात्रय बळवंत पारसनीस (लेखांक ४६, डिसेंबर १७९०)

No comments:
Post a Comment