विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

महादजी शिंदे यांची चितोडगड मोहीम..!!


 महादजी शिंदे यांची चितोडगड मोहीम..!!

​पाटणच्या विजयानंतर महादजी शिंदेंनी आपले लक्ष मेवाड आणि रजपूत सरदारांकडे वळवले. चितोडचा शासक राजे भीमसिंग याने मराठ्यांविरुद्ध फौज जमा करून लढाईची तयारी केली होती. त्याआधीच महादजींच्या सूचनेनुसार मराठा सरदार अंबाजी इंगळे आणि सदाशिव मल्हार यांनी चितोडगडाला वेढा (मोर्चे) घातला होता.
​"राजश्री सदाशिव मल्हार व अंबोजी इंगळे, जालिमसिंग कोटेकर, उद्देपूर प्रांतीं आहेत. भीमसिंग चितोडकर यांचीं पत्रे राजश्री पाटीलबाबांस आलीं आहेत... राजश्री सदाशिव मल्हार व इंगळे मजकूर यांनीं चितोडगडास मोर्चे लाविले आहेत."
(लेखांक १६)
​ऑक्टोबर १७९० मध्ये महादजी शिंदे स्वतः उदयपूरच्या राणासह चितोडगडजवळ अवघ्या दोन कोसांवर लष्करासह पावले आणि गडाला चौफेर लष्करी वेढा घट्ट केला. गडाच्या परिसरात मराठ्यांच्या छावणीमुळे मोठी महागाई वाढली होती, तरीही पाटीलबावांचा दबाव कायम होता. भीमसिंगाची अट होती की तो उदयपूरच्या राणामार्फत तह करणार नाही. अखेर गडातील अंतर्गत फितुरी आणि मराठ्यांचा दबाव पाहून भीमसिंगाने राणेखान भाईंच्या मध्यस्थीने शरणागती पत्करली.
​"राजश्री पाटीलबावा व उदेपूरकर राणा व राजे जालीमसिंग कोटेकर श्रीनाथद्वाराहून कूच करून चितोडगड नजीक दों कोसांवर मुक्काम करून आहेत. राजे भीमसिंग चितोडकर यांचें बोलणें आहे कीं, आमचा मामला राणाचे व जालीमसिंगाचे विद्यमानें होणार नाहीं. त्यावरून राजश्री पाटीलबाबांनीं चितोडगडास मोर्चे कायम केले... लष्करांत महागाई फार; रुपयास सात शेर अन्न मिळत नाहीं."
(लेखांक ३८)
​२० नोव्हेंबर १७९० रोजी भीमसिंगाने पूर्णपणे शरणागती पत्करून चितोडगड मराठ्यांच्या स्वाधीन केला. महादजी शिंदेंनी उदयपूरच्या राणाचे कारभारी आणि स्वतःचे ५०० मराठा सैनिक किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी आत दाखल केले आणि भीमसिंगाची भेट घेऊन शिष्टाचार पाळला.
​"राजश्री पाटीलबाबांनीं चितोडगडास मोर्चे कायम केल्यावर, राजे भीमसिंग चितोडकर हिरासा होऊन, सलुखाचा पैगाम राणेखानभाई वराजश्री आबा चिटणीस यांचे विद्यमानें करून... छ २० रविलावलचे तारखेस चितोडगड खालीं करून दिल्हा. राजश्री पाटीलबाबांनीं उद्देपूरकर राणा यांजकडील कारभारी व आपल्याकडील पांचरों लोक किल्यांत दाखल केले."
(लेखांक ३९ व ४१)
​यानंतर महादजी शिंदेंनी मोठी मुत्सद्देगिरी दाखवत भीमसिंगाला उदयपूरच्या राणाच्या भेटीस नेले आणि त्यांच्यातील जुना गृहकलह मिटवून तडजोड घडवून आणली. मेवाड प्रांताकडून मराठ्यांनी सुमारे ६० लक्ष रुपयांचा मामला (खंडणी) ठरवून मेवाडवर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले.
​संदर्भ-
​दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २ रा)
​लेखांक क्रमांक: १६, ३१, ३६, ३७, ३८, ३९, ४१, ४४ आणि ४५

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...