द्वारकाधीश मंदिर पंढरपूर..!!
श्रीमंत महादजी शिंदे यांच्यापासूनच शिंदे घराण्याचा आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा अत्यंत जवळचा संबंध राहिला आहे. उत्तरेत मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण करणारे महादजी शिंदे हे स्वतः मोठे विठ्ठल भक्त होते. त्यांनी पंढरपूरमध्ये मल्लपा वासकर महाराजांकडून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली होती आणि ते वारकरी संप्रदायाशी एकरूप झाले होते. त्या काळात वारीला आणि वारकऱ्यांना सुलतानी संकटांचा सामना करावा लागायचा, तेव्हा शिंदे घराण्याने वारीला लष्करी संरक्षण दिले. तसेच विठ्ठलाच्या दैनंदिन पूजेसाठी, नैवेद्यासाठी आणि उत्सवांसाठी त्यांनी दोन गावे इनाम म्हणून दिली. याच भक्तीच्या परंपरेतून शिंदे घराण्याचे पंढरपूरशी एक अतुट नाते निर्माण झाले, ज्याची साक्ष पंढरपूरमध्ये आजही उभी आहे.
शिंदे घराण्याच्या याच भक्ती परंपरेचा वारसा पुढे चालवत, श्रीमंत दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई शिंदे यांनी चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर एक भव्य वाडा आणि मंदिर उभारले.पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने सन १८४९ मध्ये सव्वा लाख रुपये खर्च करून त्यांनी ही वास्तू बांधली. दुरून पाहिल्यावर हा वाडा एखाद्या भक्कम किल्ल्यासारखा दिसतो,बायजाबाईंनी स्वतः उपस्थित राहून या वाड्यात श्रीद्वारकाधीश मंदिराची स्थापना केली आणि त्यावेळी मोठा दानधर्म करत हजारो वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली.
या वाड्याची आणि मंदिराची रचना अतिशय साधी पण भक्कम आहे. घाटावरून वर आल्यावर प्रवेशद्वारावर एक मोठी दगडी कमान आणि नगारखाना आहे. आत गेल्यावर चोवीस खांबांचा सभामंडप आणि चांदीने मढवलेला गाभारा दिसतो. या गाभाऱ्यात शंख, चक्र आणि गदा घेतलेली भगवान श्रीकृष्णाची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती आहे. शेजारी राधा आणि सत्यभामा यांच्या पांढऱ्या संगमरवरातील मूर्ती आहेत.
या देवतांच्या सोबतच महाराणी बायजाबाई शिंदे यांचीही हात जोडलेली एक मूर्ती तिथे बसवली आहे. मंदिराच्या भोवती प्रशस्त अंगण असून भाविकांना राहण्यासाठी १२५ खणांचा वाडा आणि ओवऱ्या बांधल्या आहेत.
बायजाबाईंनी तिथे येणाऱ्या भक्तांसाठी कायमस्वरूपी अन्नछत्र सुरू केले. दरवर्षी गोकुळाष्टमीचा सण नऊ दिवस अत्यंत थाटात साजरा करण्याची आणि रात्री देवाची पालखी काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. मंदिरात नियमितपणे रामायण, महाभारत आणि भागवत वाचण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. या वाड्यासोबतच शिंदे घराण्याने विठ्ठलाला अर्पण केलेले हिऱ्याचे दागिने आजही श्रींच्या खजिन्यात आहेत.
आजच्या काळातही हा वाडा पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील शिंदे घराण्याचे योगदान अत्यंत प्रभावीपणे सांगत उभा आहे.





No comments:
Post a Comment