विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

पाटण आणि मेर्टा विजय..!!

 


पाटण आणि मेर्टा विजय..!!

​१७९० च्या सुरुवातीला उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी जयपूर-जोधपूरचे राजे आणि मुघल सरदार मिर्षा इस्माईल बेग यांनी मोठी आघाडी उभी केली होती. मे १७९० च्या अखेरीस इस्माईल बेग हा नारनोलाहून कूच करून शेखावती प्रांतातील पाटण येथे डोंगराळ व घाटाच्या संरक्षणात तळ ठोकून बसला होता, जिथे त्याला जोधपूरचे हजारो राठोड सैन्य येऊन मिळाले होते.
​"मिर्जा इस्मालवेग... नारनोलाहून कूच करून वीस कोस माघार सेखावट प्रांतीं पाटणास गेला. तेथें चोहोंकडून पहाड व घांट आहेत; ह्मणून त्या ठिकाणीं मुक्काम करून आहे. जोधपूरकरांची फौज आठ हजार राठोड... सामील जाले."
(लेखांक ११)
​मात्र, महादजी शिंदे (पाटीलबावा) यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंच सेनापती डि ब्वॉयन याच्या शिस्तबद्ध पलटणी आणि मराठ्यांच्या फौजेने शत्रूचा हा डाव उधळण्याचे निश्चित केले. २० जून १७९० रोजी पाटणच्या विस्तीर्ण मैदानावर दोन्ही फौजांमध्ये अंतिम संग्राम झाला. या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्यापुढे शत्रूचा पूर्ण पाडाव झाला. इस्माईल बेग केवळ १४ स्वारांनिशी जीव वाचवून जयपूरकडे पळून गेला, तर जोधपूरचे सैन्य सांभरकडे पळाले. मराठ्यांनी शत्रूचा संपूर्ण तोफखाना, जडजवाहीर आणि छावणी जिवंत हस्तगत केली.
​"मिर्जा इस्मालबेग चौदा स्वारांनिर्सी पळोन छ ९ तारखेस जैपुरांत दाखल जाला... जोधपूरवाले राठोड पराभूत पावून सांभराकडे गेले... तोफखाना व जडजवाहीर व हत्ती घोडे व राहुट्यासुद्धां लष्कर हस्तगत जाहालें. पाटणचा मामला साठ हजार रुपये ठेरोन फडशा जाला."
(लेखांक १८)
​पाटणच्या या विजयानंतर पाटीलबावांचे सैन्य मारवाडच्या रोखाने निघाले. १२ सप्टेंबर १७९० रोजी मेर्टा येथे जोधपूरच्या राठोड सैन्याशी मराठ्यांचा दुसरा भीषण संग्राम झाला. राठोडांच्या आत्मघाती हल्ल्यांना धुळीस मिळवत मराठ्यांनी तेथेही विजय मिळवला. या लष्करी हालचालींमुळे इस्माईल बेग मारवाड सोडून पळत होता आणि दुसरीकडे खंडेराव हरी यांनी दिल्लीच्या किल्ल्याचा चोख बंदोबस्त ठेवला.
​"राजश्री पाटीलबावांनी मेवाड मारवाड प्रांते फौजसुधां जाऊन... मारवाड प्रांतीं ठाणीं बसविलीं... मिर्जा इस्मालबेग मारवाड सोडून जैपुराकडे गेला. राजश्री खंडेराव हरी यांनीं दिल्लीचे किल्ल्याचा बंदोबस्त चोख राखिला याजमुळें पादशा बहुत संतोषी जाले."
(लेखांक १२ व १६)
​या लष्करी पराक्रमाचा परिणाम असा झाला की, दिल्लीच्या पादशहाने महादजी शिंदेंसाठी सर्वोच्च सन्मानाची वस्त्रे आणि किताब स्वीकारण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी भव्य फर्मानबाडी उभारण्यात आली होती. या विजयांमुळे मुघल बादशहा आणि दिल्लीचे तख्त अधिकृतपणे मराठ्यांच्या संपूर्ण संरक्षणाखाली आले आणि अटकेपासून ते रामेश्वरपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचा वचक पुन्हा एकदा प्रस्थापित झाला.
​"पातशाहानें पाटीलबावांचे नांवची खिलत पेशजी रवाना केली होती, ती घ्यावयाकरितां छ १५ जिल्हेज रोजीं फर्मानबाडी तयार करून मोठी भपका जाली होती."
(लेखांक २२)
​संदर्भ-
​दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २ रा)
​लेखांक क्रमांक: ११, १२, १६, १८, २२

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...