विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

विठ्ठलभक्ती मध्ये रममाण होणारे दिल्लीदिग्विजवीर, महासेनानी श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार.

 






विठ्ठलभक्ती मध्ये रममाण होणारे दिल्लीदिग्विजवीर,

महासेनानी श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार.
आळंदी आणि देहू या पवित्र तिर्थक्षेत्राशी महादजीबाबांचे
अतूट नाते.
भक्ती आणि शक्तीचा संगम
वारी म्हणजे एक अदभूत आनंद सोहळा,हरिनामाचा गजर करत वारकरी पंढरपूर कडे रवाना होतात. प्रत्येकाला ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची.माऊलींच्या नामाचा जयघोष व तुकोबांच्या अभंगात तल्लीन होऊन पाऊले पंढरीच्या वाटेकडे धाव घेतात.ज्ञानेश्वर माऊली-तुकोबांच्या पालखीसोबत सुरू होणारी आनंदवारी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जाते.या पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. अगदी ज्ञानोबा माऊलींच्या पूर्वीपासून सुरू असणाऱ्या पायी वारीचे माऊली वर्णन करतात.या आनंदवारी मध्ये अनेक संतांच्या पालखींचा समावेश असतो.छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी देहू वरून निघणाऱ्या दिंडीला संरक्षण दिले.तुकोबांना आपले गुरू मानून शिवाजी महाराजांनी भक्ती आणि शक्तीचा खऱ्या अर्थाने संगम घडवून आणला.पुढे तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव बुवांना तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी वेळोवेळी मदत केली व वारीला संरक्षण दिले. हिच परंपरा श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांनी पुढे चालू ठेवली,व वारीला राजाश्रय दिला.महादजीबाबांची विठुरायावरील श्रद्धा आणि देहू व आळंदीशी असणार त्यांच अतूट नाते यावर हा लेख.
आपल्या तलवारीच्या जोरावर संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या दरारा निर्माण करणारे व दिल्लीवर मराठयांचा जरी पटका फडकवून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणारे श्रीमंत महादजी शिंदे सरकार हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते.महादजीबाबांची कृष्णावर मोठी श्रद्धा होती.महादेवाचीही मोठी भक्ती करत.काही पत्रांमध्ये तर त्यांचा उल्लेख"तांडवकृष्ण" व "बाळकृष्ण" असा केला आहे. हे सर्व त्यांची महादेवावर व श्रीकृष्णावर असलेल्या भक्तीमुळेच.निवांतक्षणी विठुरायाचे नामस्मरण करण्यात ते मग्न असत.साधू-संतांच्या मठाला आवर्जुन भेट देत, साधु-संतांच्या सहवासात बराच वेळ घालवत. त्याचबरोबर मुस्लिम साधु-संतांच्या दर्ग्यावरही महादजीबाबा जात असत.हिंदू धर्माबरोबर मुस्लिम धर्मातल्या साधु-संतांना ते गुरू मानत.बीडचे मन्सूरशाह बाबा हे त्यापैकी एक.एकंदरीत महादजीबाबा हे धार्मिक सहिष्णुवृत्तीचे होते.वारकरी संप्रदायातले मल्लापा वासकर हे महादजीबाबांचे गुरू होते.मल्लापा वासकर यांनी महादजीबाबांना दिक्षा देवून तुळशीमाळ त्यांच्या गळयात घातली.याच मल्लापा वासकर यांचा अल्प परिचय करून घेऊ.
निळोबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते.तुकोबांच्या पाठीमागे त्यांच्या उपदेशानुसार निळोबांनी वारकरी संप्रदाय चालविला,त्यांचे शिष्य शंकरस्वामी शिऊरकर यांना अनुग्रह देऊन वारकरी संप्रदाय चालविण्याची आज्ञा केली.पुढे शंकरस्वामींनी आपला वीणा मल्लापा वासकर यांना दिला.अश्याप्रकारे तुकोबांपासून मल्लापा वासकरांपर्यंत वीणा चालत आला.मल्लाप्पा वासाकरांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य केले.मल्लप्पांनी या कीर्तन साधनेच्याद्वारे समाजातील सर्व स्तरांमध्ये वारकरी संप्रदयाबरोबरच वारकरी संप्रदायाची शिकवण रुजवली.मल्लाप्पांचा वीणा पुढे त्यांच्याच वंशजांकडे राहिला व आजही त्यांचे वंशज पंढरपूरमध्ये भजन,कीर्तन,वारी करून मल्लप्पाबुवांनी घालून दिलेल्या वारकरी संप्रदायाच्या शिकवणी वरून वाटचाल करत आहेत.बऱ्याच फडांपैकी वासकरांचा फड हा प्रमुख मानला जातो.याच मल्लापाबुवांना पाटीलबाबांनी आपले गुरू मानले व त्यांचे शिष्यत्व पत्करले.मल्लापाबुवा वासकरांची व श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांची भेट विठुरायाच्या पंढरीत झाली.
महादजीबाबा हे परम श्रीकृष्ण भक्त असल्याने त्यांनी भगवंतावर अनेक अभंग व पदे-काव्ये लिहली.याशिवाय माधवदासी या नावाचा गीतेवर टीका करणारा ग्रंथ ही लिहला. ज्ञानेश्वरी प्रमाणे आपली टीकाही जगमान्य व्हावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून ते माधवदासी आपला ग्रंथ मोठ्या उत्साहाने हिंदुस्थानातल्या विद्वानांना दाखवीत व त्यांच्याकडून अभिप्राय घेत असत.युद्धशास्त्रात निपुण असणाऱ्या या महासेनानीचे हे रूप पाहून मोठ-मोठया विद्वानांना त्यांचे विशेष कौतुक वाटत ते पाटीलबाबांची मोठी प्रशंसा करत.परंतु वारकरी संप्रदायात ही टीका प्रसिद्ध व्हावी म्हणुन महादजीबाबा पंढरपुरात आले व आपल्या ग्रंथाला मान्यता मिळावी म्हणून योग्य व्यक्तीचा शोध घेऊ लागले.त्याचवेळी काहीं व्यक्तींकडून त्यांना सांगण्यात आले की,पंढरपुरात एक व्यक्ती आहेत जर त्यांनी तुमची टीका मान्य केली तर वारकरी संप्रदायात मान्य होईल.मल्लाप्पाबुवा वासकर यांचे नाव कळताच पाटीलबाबांना त्यांच्या भेटीची ओढ लागली.वासकरांचा फड चंद्रभागेच्या वाळवंटात होता.आप्पांचे व्यक्तिमत्त्व पाहून महादजीबाबांनी आप्पांना साष्टांग नमस्कार केला व येण्याचे प्रयोजन सांगितले.परंतु कीर्तनाची वेळ झाल्यामुळे मल्लाप्पाबुवांनी नंतर बोलू असे पाटीलबाबांना सांगितले.मल्लप्पाबुवांच्या अमृतवाणीने महादजीबाबा धन्य धन्य झाले. कीर्तन झाल्यावर दोघे एकत्र बसल्यावर पाटीलबाबांनी माधवदासी हा आपला भगवद गीतेवर टीका करणारा ग्रंथ व अभंग मल्लप्पाबुवांना दाखविले.मल्लप्पाबुवांनी काही वेळ पाहून ग्रंथ महादजीबाबांकडे परत दिला व ते शांत बसले. आपल्या या काव्याबद्दल महादजीबाबांनी मल्लप्पाबुवांकडे अभिप्राय विचारला परंतु मल्लप्पाबुवा मौनच राहिले परत परत महादजीबाबा आप्पांकडे अभिप्राय विचारत आणि शेवटी मल्लप्पाबुवांनी मौन सोडले व नि:स्पृह असे मल्लप्पाबुवा स्पष्ट शब्दात उदगारले ,"माधवदासी हे तुमच्या टीकेचे नाव आहे व ज्ञानेश्वरी ही आमची आई आहे.आईच्या स्तनामध्ये भरपूर दूध असताना आम्ही दासीकडे जाणार नाही".बुवांच्या कीर्तनाचा व त्यांच्या परखड शब्दांचा पाटीलबाबांवर एवढा परिणाम झाला की त्यांनी मल्लप्पाबुवांचे शिष्यत्व पत्करले. मल्लप्पाबुवांनी आपल्या स्वतःच्या हाताने महादजीबाबांच्या गळ्यात तुळशीमाळ घालून वारकरी संप्रदायाची भगवी पताका महादजीबाबांच्या खांद्यावर दिली.
मल्लप्पाबुवा वासकर आणि श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांच्या भेटीने भक्ती आणि शक्ती संगमाची पुनरावृत्ती घडवून आणली.छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायांच्या भेटीने भक्ती आणि शक्तीचा संगम होऊन महाराष्ट्राला एक नवीन चालना,नवसंजीवनी,नवीन ऊर्जा मिळाली होती. त्याचाच प्रत्यय ही भेट "याची देही याची डोळा"पाहण्याचा योग लोकांना पुन्हा आला.जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे निरंतर चालू ठेवणारे मल्लप्पाबुवा आणि स्वराज्यनिर्माण करून रयतेला उराशी कवटाळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून मराठयांचा नावलौकीक चहूदिशांत बुलंद करणारे महादजीबाबा या दोघांची भेट श्री क्षेत्र पंढरपुरी व्हावी ही पांडुरंगाचीच लीला असावी.
महादजीबाबा पुण्याला वास्तव्यास असताना त्यांनी देहू व आळंदी या तिर्थक्षेत्रांना अनेकवेळा भेटी दिल्या.तुकोबांच्या आणि माऊलींच्या चरणांवर नतमस्तक होऊन महादजीबाबा धन्य होत. माऊलींच्या आळंदीशी तर महादजीबाबांचे अतूट नाते होते.माऊलींच्या पालखीला महादजीबाबांनी संरक्षण दिले.त्यासाठी त्यांनी हैबतराव पवार(आरफळकर) यांची निवड केली.त्यांचा थोडक्यात अल्प परिचय करून घेऊ.
महादजी महाराजांच्या पदरी साताऱ्याच्या आरफळ गावचे हैबतराव पवार हे सरदार होते.हैबतराव पवार मोठे स्वामिनिष्ठ होते.त्यामुळे महादजीबाबांनी हैबतरावांवर माऊलींच्या पालखीची जबाबदारी सोपवली.त्यांच्यासोबत निवडक सैन्य व भरपूर संपत्ती दिली. महादजीबाबांनी उभारलेल्या बलाढ्य कवायती फौजेला एक शिस्त होती,आणि तशीच शिस्त त्यांनी वारीला लावली या कामी हैबतरावांनी खूप मेहनत घेतली.निवडक सैन्याच्या बंदोबस्तात वारी पंढरपूरला जाऊ लागली.चोपदार मंडळींच्या नियुक्त्या देखील त्याच वेळी करण्यात आल्या.पूर्वी माऊलींच्या पादुका डोक्यावर घेऊन वारकरी वारीला जात असत,माऊलींच्या पादुका सन्मानाने व सुखरुप पंढरपूरला जायला हव्यात असे महादजी महाराजांना वाटले म्हणुन त्यांनी माऊलींच्या पादुकांसाठी पालखीची उत्तम व्यवस्था करून दिली.हैबतरावांवर जबाबदारी सोपवून ते माऊलींची सेवा करत व वेळोवेळी आळंदी तीर्थक्षेत्राला मदत करत.माऊलींच्या पालखीला महादजीबाबांनी राजाश्रय दिला.हैबतराव पुढे आळंदीतच राहिले.माऊलींच्या भक्तीत एवढे रमले की त्यांना संसाराची विरक्ती आली व त्यांच मन हे संसारात रमेनासे झाले.हैबतराव माऊलींच्या भक्तीत अखंड बुडाले हरिनामाचा जप करण्यात ते मग्न झाले आणि हैबतरावांना सगळे हैबतबाबा आरफळकर म्हणुन ओळखु लागले.हैबतबाबा भजनात एवढे तल्लीन होत की साक्षात माउलींची समाधी डोलायला लागत.माउलींची भक्ती करून हैबतबाबांनी जीवनाचे सार्थक करून घेतले.
हैबतबाबा आरफळकर यांच्या विवेकमय विचारांमध्ये एक गोष्ट आली की,हा सोहळा पंढरपूरला जातोय खरा पण या सोहळ्याला शाही स्वरूप यावं कारण ज्ञानेश्वर महाराज देवाचे अवतार आणि देव देवाच्या भेटीला जातायत म्हणजे हा सोहळा अवर्णनीय व्हावा.यासाठी त्यांनी तुकोबांचे विद्यावंशज मल्लप्पाबुवा वासकर आणि महादजीबाबांचे जावई अंकलीकर शितोळे सरकार यांची भेट घेतली व आपला विचार मांडला.त्यांना हा विचार ऐकून मोठा आनंद झाला व त्यांनी यास संमती दर्शवली.महादजीबाबांकडे हैबतबाबांनी हा प्रस्ताव पाठवला,त्यांनी पालखीला सोने, नाणे, आणि त्यासोबत बराच लवाजमा पाठवुन दिला. गुरू वासकरबुवांचा वारकरी संप्रदाय व अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे,तंबू, सामान वाहण्यासाठी गाड्या,नेवैद्यासाठी सेवेकरी असा सारा लवाजमा दिला.शिंदे सरकारांचे जावई अंकलीकर शितोळे सरकार आजही पालखीस तंबू व अश्वाची सेवा देत आहे.हैबतबाबांचे माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी खूप मेहनत घेतली.त्यांच्या कार्याची उतराई म्हणून माऊलींच्या मंदिराच्या मुख्यप्रवेशद्वारावर हैबतबाबांच्या नावाची पायरी लावली आहे.
महादजीबाबांनी माऊलींच्या सेवेत तसूभरही खंड पडू दिला नाही.त्यांनी महाद्वार, नगारखाना,घाट,सभामंडप,मंदिराभोवती ओवऱ्या बांधून दिल्या,तसेच माऊलींच्या सेवेसाठी आळंदी व नान्नज ही दोन गावे इनाम म्हणून दिली. महादजीबाबांनी केलेल्या या सेवेची उतराई म्हणून आळंदी देवस्थानकडून गुढीपाडवा अथवा रामनवमीच्या दिवशी माऊलींच्या समाधीला शिंदेशाही पगडी पुजा श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांच्या रुपात बांधली जाते.आळंदीवरून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यावर पुण्यात वानवडी येथे श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांच्या समाधी छत्रीवर माऊलींची मानाची आरती केली जाते.तसेच महादजीबाबांच्या समाधी छत्रीच्या अंगणात थोड्या वेळ विसावा घेतल्यावर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. असे अतूट नाते महादजीबाबांचे आळंदी, देहू व पंढरपुराशी आहे.
सबंध हिंदुस्थानतल्या आपल्या शत्रूंना तलवारीच्या जोरावर सळो की पळो करून सोडणाऱ्या श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी आपला क्षत्रिय धर्म सांभाळत वारकरी धर्माचेही आचरण करून विठुरायाच्या नामाचा गजर केला.वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन सोबत मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला जरी पटका मोठ्या डौलाने हिंदुस्थानात फडकविला. सुरू होत असलेल्या आनंदवारी सोहळ्याच्या निमित्ताने हा लेख विठुरायाच्या व महादजी बाबांच्या चरणी अर्पण करतो.
धन्यवाद..
-प्रसाद शिंदे सरकार
#The Great Maratha श्रीमंत महादजी शिंदे सरकार

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...