विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

रणांगणाचा महामेरू ते श्रेष्ठ कवी- महादजी शिंदे..!!

 


रणांगणाचा महामेरू ते श्रेष्ठ कवी- महादजी शिंदे..!!

महादजी शिंदे यांना संस्कृत, मराठी, हिंदी, ब्रजभाषा, गुजराती आणि फार्सी या भाषांचे ज्ञान होते. त्यांनी या भाषांमध्ये अनेक काव्यरचना केल्या. त्यांच्या दरबारात साधुसंत, विद्वान, पंडित, कवी, गायक, संगीतकार, चित्रकार, मूर्तिकार आणि वैद्य यांना राजाश्रय मिळत असे.
महादजी शिंदे हे श्रीकृष्णभक्त होते. त्यांनी मुघल सम्राट शाह आलम याला पुन्हा दिल्लीच्या सिंहासनावर बसवले. शाह आलम स्वतःही कवी होता. त्याच्या नादिरात-ए-शाही या काव्यसंग्रहात महादजींच्या भक्तिपदांचा समावेश करण्यात आला असून त्याने त्यांच्या काव्याची प्रशंसा केली आहे.
महादजींचे संतकवी दत्तनाथ यांच्याशी निकटचे संबंध होते. उज्जैन येथील दत्तनाथ मठ आणि बाळकृष्णबुवांच्या मठात महादजींच्या काव्याच्या वह्या सापडल्या आहेत. तसेच ग्वाल्हेर राजवाड्यात त्यांचा माधव विलास हा हस्तलिखित ग्रंथ मिळाला. या ग्रंथाचे १९२१ साली प्रकाशन झाले. त्यात मराठी, हिंदी, ब्रजभाषा आणि गुजरातीतील रचना आहेत. ओवी, अभंग, श्लोक आणि दोहा अशा विविध काव्यप्रकारांचा त्यात समावेश आहे.
काळाच्या ओघात महादजींच्या अनेक रचना नष्ट झाल्या. मात्र उपलब्ध साहित्यावरून त्यांच्या साहित्यिक अभ्यासाची आणि भक्तीपर लेखनाची कल्पना येते. त्यांच्या होळी उत्सव या पदातील काही ओळी...
"होळी स्वानंदे खेळुनि पाहे।
श्रीगुरू लागी शरण जाई।।धृ।।
ध्यान धारणा आसन मुद्रा,
लक्षुनि लक्षा दृढ होई।।१।।
काम-क्रोधादि इंधने रचुनी,
ज्ञानाग्नि लाऊनि ते ठाई।।२।।
द्वैत नारीकेळ त्या माजी होर्मी,
वासना पोळी टाकुनि देई।।३।।"
संदर्भ : अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे,डॉ.पी.एन शिंदे
पृष्ठ क्र. ६७४–६७५.

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...