लीळाचरित्रात उल्लेख असलेले शिंदेराणे व अनामिक राजा कोण याचा उलगडा चालुक्य / साळुंखे काळातील मराठा घराण्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येईल. चक्रधरस्वामींनी नागदेवाचार्यास निष्ठेचे उदाहरण म्हणून शिंदेराणे घराण्याचे उदाहरण दिले होते. चक्रधरस्वामींचा जन्म इ.स 1194 चा. साहजिकच चक्रधर स्वामींनी त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या घटनेचे उदाहरण दिलेले असणार. इ.स. 1160 ते 1190 पर्यंत चालुक्य / साळुंखे व कलचुरी / सुर्यवंशी मध्ये सत्ता संघर्ष झालेला पाहायला मिळतो. कल्याण चालुक्य / साळुंखे काळातील नकाशाचा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते की शिंदे घराण्यावर चालुक्य / साळुंखेंचा विशेष विश्वास होता कारण त्यांच्या राजधानीला वेढूनच
तीन शिंदे घराणे शासन करीत होते. राजधानीच्या इतक्या लगतच शिंदेच्या तीन शाखा असणे हे चालुक्य / साळुंखेंचा शिंदे घरण्यावरील विश्वास दर्शविते (तसे पाहता चालुक्य / साळुंखे व शिंदे घराण्याचे संबंध बदामी साळुंखे / चालुक्य काळापासूनचे आहेत. पुलकेशी दुसरा याचा मामा कराडच्या शिंदे घराण्यातील होता ). अचूगिदेव शिंदे दुसरा हा तर कल्याण चालुक्य / साळुंखे साम्राज्याचे अतीशय बिकट परिस्थितीत रक्षण केल्याने चालुक्य / साळुंखे इतिहासात प्रसिद्ध आहे. लीळाचरित्रेत असा उल्लेख आहे की शिंदेराणे यांनी त्या अनामिक राजाची सत्ता संपुष्टात आल्यावर इतर कोणाचे मांडलिक होण्याचे नाकारले व पुढे त्याच राजाची सत्ता आल्यावर राजाने खुश होऊन आपले अर्धे राज्य शिंद्यांना देऊन टाकले. इथे उल्लेख आलेला अनामिक राजा दुसरा तिसरा कोणी नसून शेवटचा चालुक्य / साळुंखे राजा सोमेश्वर चतुर्थ असावा व शिंदे-राणे हे कल्याण लगतच्या कोणत्यातरी एका शाखेतील असावेत. सोमेश्वर चतुर्थ ने कलचुरी / सुर्यवंशीचा पराभव करून पुन्हा चालुक्य साम्राज्य स्थापन केल्यावर जो प्रसंग घडला त्यावर चक्रधरस्वामींनी दिलेले शिंदेराणे यांचे उदाहरण आधारित आहे असे दिसून येते.




No comments:
Post a Comment