अखंड हिंदुस्थानात गो हत्या बंदी कायदा लागू करणारा पाटील..!!
पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर उत्तरेत विस्कळीत झालेली मराठा सत्ता महादजी शिंदे यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने आणि मुत्सद्देगिरीने पुन्हा भक्कम केली. दिल्लीच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करत त्यांनी मुघल बादशहा शाह आलम याला मराठ्यांच्या संरक्षणाखाली आणले. यातूनच महादजी बाबांना वकील-ए-मुतलक हे मानाचे पद प्राप्त झाले.
आपल्या या राजकीय आणि लष्करी सामर्थ्याचा वापर महादजी बाबांनी केवळ सत्ता विस्तारासाठीच नव्हे, तर भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांच्या रक्षणासाठीही केला. काशी, मथुरा आणि प्रयाग यांसारख्या तीर्थक्षेत्रांवरील यात्रेकरूंचा कर माफ करून घेणे आणि तिथे भाविकांना पुन्हा सन्मानाने व मुक्तपणे तीर्थयात्रा करता यावी यासाठी त्यांनी राजकीय पातळीवर यशस्वी प्रयत्न केले. याच प्रगल्भ दूरदृष्टीतून आणि भारतीय कृषीव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या गोवंशाचे महत्त्व ओळखून त्यांनी बादशहाकडून संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी करण्याचा ऐतिहासिक कायदा लागू करून घेतला.
या कायद्याचे मूळ फर्मान खालीलप्रमाणे..
"समस्त राज्यप्रबंधक,खिलाफतचे कार्यकर्ते,तसेच बादशहाच्या कृपेस पात्र असे अमीर व परगणानिहायचे शासक आणि प्रातोप्रांतीचे कारभारी व जवाबदार अधिकारी या सर्वांस कळविण्यांत येते की, बादशहाच्या कारभारांत व मालिकगिरीत स्वामींची आज्ञा म्हणून या मुबारिक फर्मानाचे पालन अवश्य करण्यात यावे, आणि सर्वांनी स्पष्ट ध्यानांत बाळगावे की, पशू सुद्धा विधात्याच्या दृष्टीतले जीव असून ते निरुपयोगी होत असे समजू नये. त्यांतही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत,
पशू या दोघाचही जीवन धान्याच्या पैदाशीवर अवलंबून असून, गाय व बैल याच्याशिवाय शेतीचे काम बिलकुल साध्य होणार नाही मेहनतीशिवाय शेतीचे काम नाही.आणि मेहनतीस तर बैलाचे साह्य अवश्य पाहिजे यास्तव जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरूरी आहे,आणि गाईवरच मनुष्याचे व पशूचे जीवन अवलंबून आहे यास्तव आमचे प्रिय पुत्र #महाराजाधिराज माधवराव सिधिया बहादूर यांनी आमचेकडे मागणी केली, त्यावरून आम्ही आपल्या हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्य भूमीमध्ये गोकशाचा म्हणजे गोहत्त्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोत, या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यातील समस्त अधिकाऱ्यांनी सावधगिरीने प्रयत्नपूर्वक करून ही आज्ञा पाळली जावी,की जेणेकरून कोणतेही नगर,कसबा,गाव यात गोहत्याचे नाव सुद्धा दिसूं नये इतक्याउपर जर कोणी इसम या आज्ञेच्या विरुद्ध वागून गोवधान्या पापात लिप्त होईल,तर तो बादशहाच्या कोपास पात्र होऊन दंड पावेल.
या ऐतिहासिक फर्मानावरून महादजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण पैलू स्पष्टपणे समोर येतो. ते केवळ पराक्रमी सेनानी किंवा कुशल मुत्सद्दी नव्हते, तर तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषीव्यवस्थेची सखोल जाण असलेले लोककल्याणकारी शासक होते. गोवंशाचे संरक्षण हे केवळ धार्मिक भावनेशी संबंधित नसून भारतीय शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनजीवनाच्या स्थैर्याशी निगडित आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा उपयोग करून बादशहाकडून संपूर्ण साम्राज्यात गोवधबंदीचा फर्मान लागू करून घेतला. हा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा, रयतेच्या हिताची असलेल्या बांधिलकीचा आणि भारतीय परंपरा व कृषीसंस्कृतीच्या संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो. या कार्यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या परंपरेला उत्तरेतही समर्थपणे पुढे नेले.
संदर्भ:- मुसलमानी रियासत.

No comments:
Post a Comment