पाटील ए हिंदुस्तान...!!
पारंपरिक लष्करी व्यवस्था इंग्रजांसारख्या आधुनिक शत्रूंपुढे टिकणार नाही, हे महादजी शिंदे यांनी वेळीच ओळखले होते. म्हणूनच काळाची पावले ओळखून त्यांनी 'डी बायन' या फ्रेंच सेनापतीला आपल्या लष्करात रुजू करून घेतले. त्याच्या मदतीने युरोपियन धाटणीचे शिस्तबद्ध आणि आधुनिक 'कवायती सैन्य' उभे करणारे महादजी हे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी असलेले पहिले मराठा सरदार ठरले.
जोपर्यंत महादजी बाबा जिवंत होते, तोपर्यंत कोणत्याही शत्रूची मराठा साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. पण त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा एक भक्कम आधार आणि शत्रूंचा कर्दनकाळ कायमचा हरपला. त्यांची ही उणीव नंतरच्या काळात कधीच भरून निघाली नाही. त्यांच्या जाण्याने उत्तरेतील मराठ्यांचा दबदबा संपला आणि दिल्लीतून मराठ्यांचे पाय निघाल्यासारखेच झाले.
महादजींचा मृत्यू मराठेशाहीच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी अतिशय घातक ठरला. तिथून मराठा सत्तेची जी घसरण सुरू झाली, ती पुन्हा सावरता आली नाही.
महादजी बाबा जर आणखी काही वर्षे जगले असते, तर आज भारताचा इतिहास नक्कीच वेगळा असता. मराठ्यांचा ऱ्हास इतक्या लवकर झाला नसता आणि इंग्रजांना त्यांची अधिसत्ता इतक्या सहजासहजी प्रस्थापित करता आली नसती. मराठेशाहीचा भगवा अधिक काळ स्वाभिमानाने फडकत राहिला असता आणि कदाचित परकीय इंग्रजांचे पाय या भारतभूमीला लागलेच नसते!

No comments:
Post a Comment