विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

दुसरी अटक मोहीम....!!

 


दुसरी अटक मोहीम....!!

मराठा साम्राज्याच्या विस्तारात महादजी शिंदे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. पंजाबमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अफगाणांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले आणि शिखांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. मे १७८५ मध्ये महादजी बाबांनी मथुरा येथून उत्तरेकडे कूच केली. त्यांच्यासोबत ६ हजार पायदळ, १० हजार घोडदळ, ६० हत्ती आणि पाठीवर तोफा लादलेले १०० उंट असा प्रचंड मोठा फौजफाटा होता.
जून महिन्यात अंबाला येथे महादजींचा सामना गुर्जर आणि मेवाती यांच्याशी झाला, ज्यात मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला. त्यानंतर महादजींनी आपला मोर्चा थेट लाहोरच्या अफगाण छावणीकडे वळवला. जुलै महिन्यात मराठे आणि अफगाण सैन्यामध्ये पहिली मोठी चकमक झाली. यात मराठ्यांनी अफगाणांची मोठी कत्तल केली आणि अफगाणांचा मुख्य सेनापती शाह गुलझार हुसेन या युद्धात मारला गेला.
जुलै महिन्याच्या शेवटी अफगाण सैन्याने मराठ्यांवर अचानक छुप्या मार्गाने हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे सुरुवातीला मराठा सैन्य थोडे गोंधळले, पण लगेच सावरून हर हर महादेवच्या गर्जनेसह ते शत्रूवर तुटून पडले. या भीषण युद्धात मराठ्यांनी अफगाणांचे मुख्य सेनाधिकारी परवेझ खान आणि अशरफ अली यांना ठार केले. यानंतर महादजींनी आपली मुत्सद्देगिरी वापरली. सरदार अंबाजीराव इंगळे यांच्या मध्यस्थीने त्यांनी शिखांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. त्यामुळे मराठा सैन्याला वेळेवर रसद मिळू शकली आणि इतर बंडखोरांचा पूर्णपणे बीमोड करणे शक्य झाले. महादजींनी इथे शिवरायांच्या युद्धतंत्राचा आणि शक्तीसोबत युक्तीचा पुरेपूर वापर केला.
पुढे मराठ्यांनी थेट लाहोरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी मुहम्मद शाह मोठ्या फौजेनिशी मराठ्यांवर चालून आला. दोन्ही सैन्यांत घनघोर युद्ध झाले, पण अखेर मराठ्यांनी बाजी मारली आणि लाहोरच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका फडकवला. अशा रीतीने एकामागून एक करत मराठ्यांनी अफगाणांची ठाणी जिंकून घेतली आणि अटक, लाहोर यांसारखी प्रमुख ठाणी मराठा साम्राज्याला जोडली. महादजींच्या या पराक्रमाने अफगाणांच्या मनात मराठ्यांची विलक्षण दहशत निर्माण झाली.
महादजींच्या या झंझावाती विजयाचा धसका परकीय इंग्रजांनीही घेतला होता. कलकत्त्याच्या गव्हर्नरने महादजींच्या अटक विजयाची बातमी थेट इंग्लंडला कळवली होती.....
"Maharajadhiraj mahadjee scindia rooted acute terror among the Afghan soldiers by attacking on Afghan military camp at lahor on his way to attock. confirmed news reached last night that scindias power is alarmingly increasing and thus the area under control"
याचा अर्थ असा की, अटक किल्ला जिंकण्याच्या मोहिमेत महादजी शिंदे यांनी लाहोरमधील अफगाणी लष्करी छावणीवर हल्ला करून त्यांच्या मनात मोठी दहशत निर्माण केली आहे. त्यांची वाढती ताकद आणि वर्चस्व इंग्रजांसाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले होते. खऱ्या अर्थाने, आपल्या जीवनकाळात महादजी शिंदे यांनी दुसऱ्यांदा सिंधू नदीचा काठ गाठला होता आणि उत्तरेत मराठ्यांचा दबदबा सिद्ध केला होता!
संदर्भ-श्रीनाथ माधवजी लेखक निलेश करकरे

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...