विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

भाई रानेखान....!!






 भाई रानेखान....!!

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा दुर्दैवी पराभव झाला आणि मराठा साम्राज्याचे शूर सेनापती महादजी शिंदे गंभीर जखमी झाले. त्या अत्यंत बिकट प्रसंगी राणेखान हा पाणक्या म्हणून सैन्यात कार्यरत होते.त्यांनी जीवाची पर्वा न करता महादजींना रणांगणातून सुरक्षित ठिकाणी हलवले, त्यांच्यावर योग्य उपचार केले आणि त्यांचे प्राण वाचवले. या अमूल्य उपकाराचे स्मरण महादजी बाबांनी आयुष्यभर ठेवले.
पुढे कृतज्ञतेपोटी महादजींनी राणेखांना पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी बहाल केली.
राणेखानांनी देवपूर येथे आपले वास्तव्य केले. तेथे त्यांनी वाडे, हवेल्या, बंधारे उभारले आणि गावाच्या विकासासाठी मोठे कार्य केले. संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ त्यांनी मशीद आणि मंदिर उभारून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला.
देवपूर गावातून वाहणाऱ्या देवनदीच्या पश्चिम तीरावर त्यांनी स्वतःसाठी बडाबाग हे शाही कब्रस्तान उभारले. २२ डिसेंबर १७९१ रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यांची समाधी याच ठिकाणी बांधण्यात आली. आजही ही वास्तू राणेखानचा वाडा म्हणून ओळखली जाते.
राणेखानांची समाधी ही मराठा आणि मुघल स्थापत्यशैलीचा सुंदर संगम आहे. गुजरातच्या पोरबंदर येथील पिवळसर दगड, मुघल शैलीतील कमानी, नाजूक फुलांची कोरीव नक्षी, घुमटावरील आकर्षक पाकळ्यांची रचना आणि आतील पांढऱ्या चुन्याचा गिलावा यामुळे ही वास्तू अत्यंत देखणी दिसते. काळाच्या ओघात काही भागाचे नुकसान झाले असले तरी, ही समाधी आजही पानिपतच्या युद्धातील एका निष्ठावान सहकाऱ्याची आणि महादजी बाबांच्या कृतज्ञ स्वभावाची जिवंत साक्ष म्हणून उभी आहे.

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...