लाहोर ते अटकपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व आणि सोमनाथ मंदिराचे दरवाजे..!!
महादजी शिंदे यांनी शिखांशी मैत्री करून पंजाबचे अफगाण आक्रमणांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.हिंदुस्थानावर वायव्य सीमेवरून सतत होणारी अफगाणांची आक्रमणे कायमची रोखण्यासाठी त्यांनी थेट लाहोरकडे मोर्चा वळवला.
मे १७८५ च्या अखेरीस महादजी मथुरेतून लाहोर मोहिमेवर निघाले. त्यांच्या सोबत ६ हजार पायदळ, १० हजार घोडदळ, ६० हत्ती आणि उंटांवर बसवलेल्या लहान तोफांचा उष्ट्र तोफखाना होता. अंबाला येथे गुर्जर आणि मेवाती यांचा पराभव करून त्यांनी जूनच्या अखेरीस लाहोरवर आक्रमण केले. या मोहिमेत गुलझार हुसेन, परवेझ खान, अशरफ अली आणि अखेरीस लाहोरचा सुभेदार महमद शहा अब्दाली यांचा पराभव झाला. या सलग विजयांमुळे लाहोर ते अटकपर्यंतचा प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आला. पंजाबवरील अफगाणांचा प्रभाव कमी झाला आणि शिखांवरील अत्याचारांनाही मोठ्या प्रमाणात आळा बसला.
या मोहिमेतील सर्वात उल्लेखनीय घटना म्हणजे सोमनाथ मंदिराचे चांदीचे दरवाजे परत मिळवणे, इ.स. १०२५ मध्ये गझनीच्या महमदाने सोमनाथ मंदिरातून नेलेले चांदीचे दरवाजे लाहोरमधील महमद शहा अब्दालीच्या वाड्यात होते. त्याचा पराभव झाल्यानंतर महादजींनी ते दरवाजे ताब्यात घेतले आणि सुमारे ७६० वर्षांनंतर भारतात परत आणले.
महादजींची इच्छा हे दरवाजे पुन्हा सोमनाथ मंदिरात बसवण्याची होती. मात्र काही ब्राह्मणांनी ते मुस्लिमांच्या ताब्यात राहिल्यामुळे अशुद्ध झाल्याचे सांगून त्याला विरोध केला. त्यामुळे महादजींनी ते दरवाजे उज्जैनला पाठवले. त्यांपैकी एक जोडी महाकालेश्वर मंदिरात, तर दुसरी द्वारकाधीश गोपाळ मंदिरात बसवण्यात आली.
संदर्भ : अलिजाबहाद्दर महादजी शिंदे (लेखक डॉ.पी एन शिंदे), पृ. ३३०,३३१.

No comments:
Post a Comment