विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

आषाढी वारी.....!!


 आषाढी वारी.....!!

अटक ते कटकपर्यंत मराठ्यांची भगवी पताका अभिमानाने फडकवणारे श्रीमंत महादजी शिंदे हे केवळ अजिंक्य योद्धे नव्हते, तर ते निस्सीम विठ्ठलभक्त आणि वारकरी संप्रदायाचे उपासकही होते. मल्लप्पा महाराजांकडून त्यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली आणि तेव्हापासून त्यांच्या कपाळी हरिनामाचा गंध कायमचा विराजमान झाला. रणांगणावर शत्रूचा थरकाप उडवणारे महादजी बाबा अंतःकरणाने अत्यंत विनम्र, सात्त्विक आणि कृष्णभक्त होते.
महादजी बाबा हे उत्तम लेखक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला, तसेच घोड्यांच्या जाती, गुण आणि पारख यांवर आधारित अश्वफल हा ग्रंथही रचला. त्यांच्या विद्वत्तेची आणि अभ्यासू वृत्तीची ही साक्ष आहे.
महादजींचे सरदार हैबतरावबाबा पवार (आरफळकर) यांच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली. वारीसाठी त्यांनी सैन्य, काही गावे इनाम आणि धनसंपत्ती अर्पण केली. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे महाद्वार, वीणामंडप आणि ओवऱ्या चिरेबंदी दगडात बांधून देण्याचे महान कार्यही महादजी बाबांनी केले.
याशिवाय आळंदी आणि नान्नज ही गावे त्यांनी माऊलींच्या दिवाबत्तीसाठी इनाम म्हणून दिली. त्यांच्या या अखंड भक्तीच्या स्मरणार्थ आजही श्रीराम नवमी दिवशी ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीवर शिंदेशाही चंदन उटीत पाटील बाबांचे रूप धारण केले जाते. तसेच आषाढी वारीच्या प्रस्थानावेळी पुण्यातील शिंदे छत्री येथे आरती केली जाते आणि परतीच्या प्रवासात पालखीचा मुक्कामही शिंदे छत्री येथेच असतो.

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...