आजच्या जावळी तालुक्यात मेढा विभाग, कुडाळ विभाग, केळघर विभाग, करहर विभाग, कास बामणोली विभाग असे प्रशासकीय दृष्ट्या वेगवेगळे केलेले विभाग आहेत.
कुडाळ परगण्याचा इतिहास अभ्यासताना चिकणे देशमुख यांचा एक अस्सल कागद मिळाला. त्यानुसार भाद्रपद शुद्ध सप्तमी शके १६२४, चित्रभानु संवत्सर मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट १७०२ रोजी *महाते बुद्रुक* हे गाव *पदाजी चिकण देशमुख* यांना इनाम दिल्याचा उल्लेख आहे.
*त्याच लिप्यांतर खालीलप्रमाणे*
ता मेढे पैकी पदाजी
चिकणे देशमुख ता मार
यासी इनाम मौजे महाते बु I I
ता मार हा गाव इनाम छ ६
रबिलाखर सन सलास देहे १
मध्ययुगीन कालखंडात ६० गाव खोरे कुडाळ हा परगणा शिंदे देशमुख यांच्या अखत्यारीत, मेढा परगणा चिकणे देशमुख व भणगे देशमुख यांच्या अखत्यारीत, केडंबे विभाग ओंबळे देसाई यांच्या अखत्यारीत, कास बामणोली हा विभाग मोरे देशमुख यांच्या अखत्यारीत होता.
१६ ऑक्टोबर १६८८ च्या वाईच्या थिटे यांच्याशी संबंधित कागदपत्रात बावाजी सुर्याजी नाईक सिंदे देशमुख प्रा कुडाळ, सिवजी नारायण देशपांडे प्रा कुडाळ, बाजी कृष्णाजी देसाई व देशपांडे केडंबे, पदाजी बीन लखमाजी नाईक चिकणे देसाई, खेलोजी बीन सुर्याजी नाईक भणगे देशमुख ता मेढे असा उल्लेख मिळतो.
कुडाळ परगण्याच्या देशकुलकर्णी व गावकुलकर्णी वतनासंबंधी कुसाजी अनंत प्रभुणे आणि जोशी-अकलूजकर यांच्यात झालेल्या वादाच्या वर्णनात ‘राजश्री बाजी चिकणे देशमुख (मेढा)’ यांचे नाव येते. त्याच प्रसंगात कुडाळचे राजश्री शाहाजी शिंदे देशमुख यांचाही उल्लेख आहे. हे वर्णन १ जून १७२४ च्या महजराशी जोडलेले आहे.
आजही मेढा आणि इतर अनेक गावांत चिकणे देशमुख यांचे वास्तव्य आहे.
*संशोधन व संकलन-*
*श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळकर*
*सचिव*
*दख्खन इतिहास संशोधन संस्था पुणे*
*संदर्भ-*
१) पे. द. शा. रुमाल नंबर १, पुडके क्रमांक १६, पृष्ठ क्रमांक १२५
२) शाहू दप्तर पुणे पूरलेखागार

No comments:
Post a Comment