कुडाळचे देशमुख बावाजी सूर्याजी शिंदे यांच्या इनामाचा ऐतिहासिक पुरावा
कुडाळ परगण्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना कुडाळ मध्ये १७०२ मधील आज्ञा पत्राची नकल मिळाली. यावरून तत्कालीन पत्रव्यवहारातून शिंदे देशमुख कुडाळकर घराणे, त्यांचे अधिकार आणि राजसत्तेशी असलेले संबंध यांची माहिती मिळते.
पत्राचा दिनांक
२५ ऑगस्ट १७०२; शके १६२४, चित्रभानु संवत्सर, भाद्रपद शुद्ध द्वितीया/तृतीया.
श्री बावाजी सूर्याजी शिंदे देशमुख यांना महाराणी ताराराणी व छत्रपती शिवाजी द्वितीय यांच्या कारकिर्दीत गाव इनाम दिल्याविषयीचे प्रस्तुत पत्र* या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या पत्रातून इनामाची राजमान्यता आणि त्याच्या स्थानिक अंमलबजावणीची प्रक्रिया समोर येते.
उपलब्ध पत्रवाचनात “ सुरो विठल सभासद नामजाद सरहवालदार ” असा उल्लेख आढळतो. त्यांच्या सनदेचा संदर्भ देऊन संबंधित अधिकाऱ्यांना इनामाचा अंमल करण्याची आज्ञा कळविण्यात आली आहे. “महाराज राजश्री स्वामी कृपाळू होऊन” बावाजी नाईक शिंदे देशमुख यांना संबंधित गाव इनाम दिल्याचे पत्र सांगते. त्यासाठी “राजपत्र आलाहिदा सादर आहे” असेही स्पष्ट केले आहे. यावरून या इनामासंबंधी स्वतंत्र राजपत्र देण्यात आले होते आणि प्रस्तुत कागद त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी तयार झाला होता, असे दिसते.
या पत्रातील विशेष महत्त्वाचा उल्लेख म्हणजे “बाबाजी सूर्याजी सींदे” आणि “बावाजी बीन सूर्याजी देशमुख” हे शब्द होय. ‘बीन’ म्हणजे ‘यांचा पुत्र’. त्यामुळे बावाजी हे सूर्याजींचे पुत्र असल्याचा स्पष्ट वंशावळविषयक पुरावा या पत्रात मिळतो. तसेच बाबाजींच्या नावापुढे आलेल्या “देशमुख पा मजकूर” या उल्लेखामुळे त्यांचा संबंधित कुडाळ परगण्याच्या देशमुखीशी असलेला संबंधही स्पष्ट होतो. कुडाळच्या शिंदे देशमुख घराण्याची वंशवेल आणि अधिकारपरंपरा अभ्यासताना ही नोंद उपयुक्त ठरते.
पत्रात गाव बाबाजींचे “दुमाला करणे” अशी आज्ञा आहे. याचा आशय संबंधित गाव इनामाच्या अटींनुसार त्यांच्या ताब्यात व उपभोगाखाली देणे असा आहे. राजसत्तेने दिलेली मंजुरी स्थानिक महसुली व्यवहारात उतरविण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. तथापि, गावातील नेमके कोणते महसुली व इतर हक्क या इनामात समाविष्ट होते, हे निश्चित करण्यासाठी स्वतंत्र राजपत्र पाहणे आवश्यक आहे.
“सनदेची तालीका लिहून घेऊन असल पत्र भोगवटीयांसी देणे” ही सूचना तत्कालीन दप्तरव्यवस्थेचे महत्त्व दर्शविते. सनदेची प्रत सरकारी नोंदीसाठी ठेवायची आणि मूळ कागद हक्काचा उपभोग घेणाऱ्या इनामदाराकडे परत द्यायचा, अशी व्यवस्था यात दिसते. त्यामुळे शासनाच्या दप्तरी नोंद राहात असे आणि इनामदाराजवळही आपल्या हक्काचे प्रमाण उपलब्ध होत असे.
प्रस्तुत पत्रात महाराजांचे व्यक्तिगत नाव आणि इनाम देण्यामागील विशिष्ट कामगिरी नमूद झालेली नाही.
असे असले तरी बावाजी सूर्याजी शिंदे यांची देशमुख म्हणून नोंद, सूर्याजी–बावाजी हा पितापुत्र संबंध आणि राजमान्य इनामाच्या अंमलबजावणीचा आदेश या तिन्ही बाबींमुळे हे पत्र कुडाळ परगण्याच्या इतिहासाचे महत्त्वाचे साधन ठरते. स्थानिक वतनदार आणि राजसत्ता यांच्यातील प्रशासकीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठीही त्याचे स्वतंत्र मूल्य आहे.
संशोधन व संकलन
श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळकर
सचिव
दख्खन इतिहास संशोधन संस्था पुणे


No comments:
Post a Comment