विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 November 2026

"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"

 


"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"

अशी ख्याती असणारा हा गड, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अवघ्या १८ दिवसांत जिंकला. पानिपतानंतर मराठ्यांना गतवैभव आणि मानाचे स्थान पुन्हा मिळवून देणारे, प्रथम इंग्रज-मराठा युद्धात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, दिल्लीच्या तख्तावर सलग २५ वर्षे भगवा फडकावून थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराजाधिराज, उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे).
थोरल्या महाराजांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या महान सरदारास मानाचा मुजरा!
रियासतकारांनी महादजी शिंदे यांच्याविषयी म्हटले आहे की, शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि महादजी शिंदे यांनी तिच्यावर कळस चढवला.
महादजींची लष्करी प्रतिभा नेपोलियनहून कमी नव्हती. नेपोलियन एका लष्करी साम्राज्याचा, एका बलाढ्य देशाचा प्रमुख होता. महादजींकडे यांपैकी काहीच नव्हते. त्यांना आयुष्यभर स्वकीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. तो विरोध मोडून काढत त्यांना आपला मार्ग आखावा लागला.
त्यांनी जिंकलेला प्रदेश नेपोलियनने जिंकलेल्या परदेशी प्रदेशांहून वेगळा नव्हता.
महादजी जर युरोपात जन्माला आले असते, तर त्यांची प्रतिमा नेपोलियनहून थोर झाली असती. त्यांच्या अलौकिक कारकिर्दीचे वर्णन करणारी कित्येक पुस्तके लिहिली गेली असती.
महादजी शिंदे यांचे आंग्ल चरित्रकार कीन यांनी त्यांना अठराव्या शतकात आशिया खंडात होऊन गेलेला सर्वात मोठा पुरुष म्हणून संबोधले आहे.
आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे या महान लष्करी नेत्याच्या आणि थोर मुत्सद्द्याच्या जीवनावर विशेष साहित्य उपलब्ध नाही.
महादजींच्या शंभराव्या पुण्यतिथीदिनी बेळगावच्या नातू यांनी प्रकाशित केलेले चरित्र हे मराठी साहित्यातील महादजींचे एकमेव चरित्र आहे.
पानिपताच्या लढाईत महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी गारद झाली. महाराष्ट्रात एक लाख बांगड्या फुटल्या. पण शिंदे घराण्याला या लढाईचा जबरदस्त तडाखा बसला.
महादजी शिंदे यांचे बंधू तुकोजी आणि पुतणे जनकोजी हे दोघे पानिपतावर कामी आले. बंधू दत्ताजी शिंदे हे अगोदर नजीबाच्या कटकारस्थानाला बळी पडले होते आणि वडील बंधू जयाप्पा राजपुतांकडून दगाबाजीने मारले गेले होते.
नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पडले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करण्याची शपथ घेतली आणि ती पूर्णत्वास नेली. नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत हवेत भिरकावले. नजीबाचा नातू गुलाम कादर यालाही महादजींनी यातनामय मरण देऊन त्याचा निर्वंश केला.
महादजींनी मराठ्यांच्या इतर शत्रूंनासुद्धा चांगलेच वठणीवर आणले. दिल्लीच्या बादशहाला नामधारी बनवून सत्तेची सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली.
देशातील सर्व सत्तांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याच्या कल्पनेचे ते जनक होते.
यांच्याबाबत म्हणताना कर्नल मॅलेसन (Malleson) म्हणतात,
"It must never be lost sight of that great dream of Mahadaji Sindia's life was to unite all the nation powers of India in one Great Confederacy against The English. In this respect he was the most far sighted statesman that India has ever produced...
It was grand idea capable of realization by Mahadaji but by him alone..."
महादजींनी पानिपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले.
यापूर्वीसुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येक वेळा स्वारी केली होती, पण कोणीही महादजींसारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही. महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली, त्याला तुलना नाही.
त्यांच्या या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलना केली. तसाही त्या तथाकथित मुत्सद्द्यांनी पानिपताचा पराभव गंभीरपणे मनाला लावून घेतलाच कुठे होता?
पानिपतावरील सदाशिवभाऊंचे आणि विश्वासरावांचे रक्त वाळते ना वाळते, तोच पुणे दरबाराने अब्दालीकडे मैत्रीचा तह केला.
१७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली. तिचा तळ अहमदनगर येथे पडला होता. पुणे दरबाराने तिची उत्तम बडदास्त ठेवली. तिची व्यवस्था आणखी चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल यांच्या नावे सनदा काढल्या.
सनद :
"गणेश विठ्ठल यांचे नावे सनद की गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उटे व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.
त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे."
पुणे दरबाराने अब्दालीच्या माणसांची चांगली सरबराई केली. शिवाय भद्रगज नावाचा हत्ती अब्दालीस नजर केला. त्याबद्दलची सनद अशी,
सनद :
"गणेश विठ्ठल याचे नावे सनद की, किले अहमदनगर इथे भद्रगज हत्ती आहे व तो अब्दाली शाहास देविला. तरी राजश्री पुरुषोत्तम महादेव वकील यांजकडील कारकून येईल त्याचे स्वाधीन करून पावालीयाचे काबाज घेणे म्हणून सनद."
संदर्भ : सनदा, पत्रे आणि याद्या, माधवराव पेशवे १.
असा नामुष्कीजनक समझोता जगात कोणीच केला नसेल. मराठ्यांनी पानिपतावर स्वतःचे कपाळ फोडून घेतले असले, तरी गिलच्यालासुद्धा त्यांनी गुडघ्यावर आणले होते. अब्दालीची ग्वाल्हेरमध्ये उतरायची हिंमत नव्हती, मग पुणे दूरच राहिले असते.
पानिपताच्या पराभवानंतरही माळव्यात मराठ्यांच्या मजबूत शिबंदी तळ ठोकून होत्या. पानिपतावरून जीव वाचवून परत आलेल्या मराठा सैनिकांना त्यांनी सामावून घेतले होते. त्यांचा धाक अब्दालीला होताच. शिवाय शिखांनीही अब्दालीच्या परतीच्या वाटेवर जागोजागी अडथळे आणून त्याच्या नाकी नऊ आणले होते.
पण पुणे दरबारातील तथाकथित मुत्सद्द्यांना अब्दालीशी तह करण्याची घाई झाली होती. म्हणून त्यांनी हा अपमानास्पद तह केला.
असे स्वाभिमानशून्य आणि अदूरदर्शी धोरण पुणे दरबाराने मराठ्यांच्या इतर शत्रूंशीही ठेवले. नजीबने मराठ्यांचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्या नजीबाशीही पुणे दरबाराने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.
नजीबामुळे शुक्रतालावर दत्ताजींची जशी कोंडी झाली होती, तशी दुआबात मराठ्यांची कोंडी करण्याचा नजीबाने घाट घातला. पण महादजींच्या दक्षतेमुळे तो डाव मराठ्यांनी हाणून पाडला.
पुणे दरबाराने केलेल्या घोडचुका निस्तरताना निस्तरताना महादजींच्या नाकी दम आला. पण पुण्यातील मुत्सद्द्यांनी कधीच स्वतःची चूक मान्य केली नाही आणि त्यांचा पदोपदी अपमान केला.
पुणे दरबाराच्या या मत्सरग्रस्त वृत्तीवर सर जदुनाथ सरकार यांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
सर जदुनाथ सरकार यांचे मत :
"These records prove that in establishing Maratha control over The Imperial Government of Delhi and wiping off the disgrace of Panipat, Mahadaji Sindia Had to Labour alone, nay in the teeth of pin-pricks and covert opposition by the court of poona.. and armed help in his sorest need and insulted him in public..He was called in Poona Governments letters a cheat, a disloyal Governments letters a cheat, a disloyal servant, a selfish upstart....All this Mahadji bore with infinite patience, just he broke through the successive nets of intrigue woven around him by his foreign enemies and nominal allies .He triumphed in the end....
He Towers over Maratha History in solitary grandeur a ruler of India, withought any ally, withought a party, without even able and reliable civil and diplomatic service..."
जदुनाथ सरकार म्हणतात,
"नाना फडणीसांना त्यांचे चाहते मराठी मॅकियाव्हेली म्हणतात. त्यांनी मॅकियाव्हेलीचा अर्धा देशाभिमान दाखवून महादजी शिंदे यांना मदत केली असती आणि महादजींची पदोपदी अडवणूक केली नसती, तर महादजींनी पाच वर्षे अगोदरच दिल्लीवर कब्जा केला असता आणि इंग्रजांना कलकत्त्याच्या समुद्रात लोटले असते. तसे झाले असते, तर महादजी अजून काही वर्षे जगले असते आणि इंग्रजांचे राज्य या देशावर कधीच आले नसते.
पण नाना फडणीसांनी मत्सरी वृत्तीने महादजींच्या मार्गात अडथळे निर्माण केले."
संदर्भ :
१) सनद १ (सातारा महाराज व पेशवा दैनंदिनी)
२) सनदा, पत्रे आणि याद्या, माधवराव पेशवे १.

No comments:

Post a Comment

"गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया"

  "गड मे गड चितौड गड बाकी सब गढीया" अशी ख्याती असणारा हा गड, ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अवघ्या १८ दिवसांत जिंकला. पानिपतानं...