विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 November 2026

.. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे


 .. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे

दि.१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या प्रचंड पराभवामुळे मराठी साम्राज्याच्या कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा भर माध्यान्ही असलेला सूर्य इथेच अस्ताला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
त्या भयंकर प्रलयंकारी रणकंदनात झालेल्या विश्वासराव व सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूमुळे श्रीमंत थोरल्या नानासाहेब पेशव्यांची मनस्थिती प्रचंड उद्विग्न झाली. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांनी नाना पुरंदऱ्यांना लिहिलेल्या २३ फेब्रुवारी १७६१ च्या पत्रात दिसून येते. त्यात ते म्हणतात - 'चिरंजीव भाऊ आल्यावर मग सर्व मनसबे करावे, चिरंजीव भाऊ जिवंत नसल्यास मजला लढणे नाही. येक भाऊ वाचून दुनिया दौलत व्यर्थ आहे. त्याचे हातचे पत्र पाहीन तेव्हा माझे बायकोस मला जीव येईल. आता तो वेडेपणे आहो. लेक अल्पायुषी होता. सूर्यमंडळ भेदून गेला. ते दु:ख परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकिले परंतु चिरंजीव भाऊ वाचून दुनिया व्यर्थ आहे..!!'
६ जून १७६१ रोजी उत्तरेकडून स्वारी पुण्यास परत आली. पण पानिपतच्या आघातामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांनी शिंदे, पवार, होळकर व ज्येष्ठ सरदारांवर दरबारी कामात कोताई केली असा ठपका ठेवून त्यांचे महाल जप्त केले. प्रकृती अस्वस्थ्याने श्रीमंतांचा कारभारावर ताबा राहिला नाही. शेवटी हवाफेरासाठी त्यांनी पर्वतीवर स्थलांतर केले.
६ जून ते १२ जून पर्यंत नानासाहेब पालखीत बसून पर्वतीवर जात असत. अखेरीस अंगात ज्वर वाढून वाताचे झटके येऊ लागले. वाताच्या झटक्यात 'भाऊ ! भाऊ !' असे किंचाळत. दिवसेंदिवस भाऊसाहेबांच्या शोकेंकरून शरीर कृश झाले. बुद्धिभ्रंश झाला. लोकांस शिव्यागाळी करू लागले. कारभार विपरीत होऊ लागला. पुत्रशोक व बंधुशोक झाला.
अखेरीस तशाच विषण्ण मनस्थितीत पर्वतीवरच्या वाड्याच्या होमशाळेत रघुनाथरावाच्या मांडीवर डोके ठेऊन 'शके १६८३, वृषनाम संवत्सरे, ज्येष्ठ वद्य ६, मंगळवार दि.२३ जून १७६१ रोजी दिड प्रहर रात्रीस' श्रीमंत नानासाहेब पेशवे निजधामास गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी लकडी पुलाजवळ थोरल्या माधवरावांच्या हस्ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नारो केशव बर्वे यांचेबरोबर अस्थी महायात्रेला (काशीस) पाठवल्या.
ह्या अत्यंत दुःखद प्रसंगाचे ६ जुलै १७६१ च्या पत्रात आलेले उल्लेख असे - 'मरणाचे पूर्वी दोन दिवस पर्वतीसच होते. तेथेच मृत्यू आला. मृत्यू होताच शहरची बंदोबस्ती केली. जागा जागा दहा दहा वीस गाडद्यांच्या चौक्या ठोकून वाड्याभोवते हजार बाराशे गाडदी चवकी ठेऊन बंदोबस्त केली मंगळवारचे दिडा प्रहरा रात्रीस. दुसरे दिवशी बुधवारी अग्नी दिला, ते दिवशी शहरात मोठा आकांत झाला.'
१७६० च्या उदगीरच्या लढाईपर्यंत मराठी साम्राज्याचा वारू चहू दिशांना चौखूर उधळत भरधाव सुटला असतानाच झालेला पानिपताचा प्रचंड पराभव, जनकोजी शिंदे, विश्वासराव, सदाशिवरावभाऊंसह अनेक कर्त्या मराठ्यांचा त्यात झालेला मृत्यू हे कमी म्हणून कि काय त्यानंतर सहाच महिन्यात झालेला हा नानासाहेबांचा अकाली मृत्यू राज्याच्या प्रगतीला चांगलीच खीळ घालणारा ठरला. जणू नानासाहेबांना भरला डाव अर्ध्यावरच सोडावा लागला. विस्तारलेल्या राज्याला स्थैर्य प्राप्त होण्याआधीच त्यांचं निधन झालं. पूर्वी नसलेल्या आव्हानांना सामना करण्याची वेळ आली. ह्या कर्तबगार पेशव्यांच्या निधनामुळे राज्याचं तारू वादळात भरकटल्यासारखं झालं होतं.
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड - डॉ.उदय कुलकर्णी
२) पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
३) मराठी रियासत : ६ - पेशवा बाळाजी बाजीराव [सन १७४९ - १७६१] - गोविंद सखाराम सरदेसाई
४) पानिपतचा रणसंग्राम - शंभुराम रामचंद्र देवळे
५) श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे चरित्र - चिंतामण गंगाधर गोगटे

No comments:

Post a Comment

छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) - कलासंस्कृतीचे उदार संरक्षक

  छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) - कलासंस्कृतीचे उदार संरक्षक छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) यांना कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासातील '...