विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 November 2026

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज..

 


लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

कोल्हापूरच्या अनेक पिढ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थक्षेत्रांचा वारसा सांगत घडून गेल्या. पण कोल्हापूर हे फक्त इतिहासाच्याच परिघात मावणारे शहर नाही. कोल्हापूरच्या मोठेपणाला माणुसकीचीही एक सुंदर किनार आहे. त्यामुळेच, देश सोडून परागंदा झालेला "एक जर्मन डॉक्टर" आणि "त्याच्याच देशाने छळलेले काही लोक" यांच्या नियतीची गाठ जेंव्हा कोल्हापुरात पडली, तेव्हा कोल्हापूरच्या इतिहासात एक आगळावेगळा अध्याय लिहिला गेला. आणि या अध्यायाचा साक्षीदार बनली अशी एक वास्तू, जिचे संपूर्ण कोल्हापूरवर आधीपासूनच न फिटणारे ऋण आहे.
ही गोष्ट आहे जर्मन ज्यू डॉक्टर डॉ. एडमंड रोझेनबाम आणि राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या "लक्ष्मी विलास पॅलेस" यांची आणि त्याचबरोबर, त्यांच्या सहवासात घडलेल्या मानवतेच्या एका अपरिचित अध्यायाची!
याची सुरुवात जुलै १९४३ मध्ये झाली. वळीवड्याच्या माळावर कॅम्प आकाराला आला आणि पोलंडचे नागरीक टप्प्याटप्प्याने त्यात वस्तीला आले. शक्य तितक्या नागरी सुविधा कोल्हापूरकरानी पुरवलेल्या होत्याच. पण दवाखाना मात्र अजून बांधून पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी, चौफाळ्याच्या माळावरचा "थोरला दवाखाना" किंवा कावळ्याच्या नाक्यावरचा "डनिंगबाईंचा वानलेस अमेरिकन दवाखाना" एवढे दोनच पर्याय होते. पण इथेही प्राधान्यक्रमाच्या प्रशासकीय अडचणींमुळे पोलिश रुग्णांच्या उपचारावर मर्यादा येऊ लागल्या. यांची जाणीव कोल्हापूर नगरपालिका आणि कोल्हापूर दरबार यांना झाल्यावर एक निर्णय घेण्यात आला. वळीवड्यातला दवाखाना बांधून होईपर्यंत बावड्यातल्या, कागलवाडीतला "लक्ष्मी विलास" पॅलेस, दवाखाना म्हणुन पूर्णवेळ पोलिश लोकांसाठी वापरायचा ठरला.
"लक्ष्मी विलास".. राजर्षि शाहू महाराजांचं जन्मस्थळ! ज्या वास्तूने त्यांचा पहिला श्वास अनुभवला, ती आता शेकडो युद्धपीडित, आपलं गाव, देश सोडून कोल्हापुरात आलेल्या लोकांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम करणार होती. शाहुंच्या मानवतावादी दृष्टिकोनाला पुढे नेणाराच हा निर्णय होता. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या लक्ष्मी विलासमध्ये प्रशस्त इमारत, नळाचे पाणी, वीज, पंख्यांची सुविधा, कर्मचारी निवासाची व्यवस्था आणि सभोवतालचा हिरवागार परिसर होता. त्यामुळे ते रुग्णालय म्हणुन ते एक आदर्श ठिकाण ठरले. आंबा, डाळिंब आणि विविध फुलझाडांनी नटलेल्या विस्तीर्ण बागांमुळे येथे एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळत असे. युद्धाच्या जखमा घेऊन आलेल्या पोलिश निर्वासितांसाठी हे वातावरण औषधांइतकेच महत्त्वाचे होते. या "लक्ष्मी विलास" दवाखान्याचे प्रमुख म्हणुन नेमणूक झाली डॉ. एडमंड रोझेनबाम यांची.
रोझेनबाम, एक जर्मन ज्यू वंशाचे डॉक्टर. वंशवादाच्या अत्याचाराना बळी पडून जर्मनी, इटली, पॅलेस्टाईन असे दर दर भटकत हा तीस पस्तीशीचा तरुण जर्मन डॉक्टर कुटुंबासह शेवटी युद्धकैदी म्हणुन तेंव्हाच्या भारतात, लाहोर येथे ब्रिटिशांच्या आश्रयाला आला. पुढे पोलिश निर्वासितांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण झाल्यावर, स्वेच्छेने त्यानी कोल्हापुरात वैद्यकीय सेवेची जबाबदारी पत्करली. रोझेनबाम यांच्यासमोरची सर्वात मोठी अडचण वैद्यकीय नव्हती; ती मानवी होती. ज्या राष्ट्राने पोलंडवर आक्रमण केले होते, त्याच राष्ट्रातून आलेल्या एका डॉक्टरवर पोलिश निर्वासित विश्वास ठेवतील का? हा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. त्यात भर म्हणजे रोझेनबाम यांना पोलिश भाषा येत नव्हती. त्यामुळे जर्मन आणि इंग्रजी जाणणाऱ्या पोलिश परिचारिकांची (नर्स) मदत घेण्यात आली. प्रत्येक पाळीत एक दुभाषी परिचारिका असण्याचा नियम करण्यात आला. भाषेची अडचण, मर्यादित साधनसामग्री आणि युद्धकाळातील अडचणी असूनही डॉ. रोझेनबाम यांनी पोलिश परिचारिका आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्कृष्ट आरोग्यसेवा उभारली.
जानेवारी १९४४ मध्ये वळीवडे कॅम्पमध्ये घटसर्पाच्या साथीचा संशय निर्माण झाल्यावर लक्ष्मी विलास मध्ये विलगीकरण विभाग सुरू करण्यात आला. सर्व पोलीश मुलांचे लसीकरण करण्यात आले. मानसिक तणाव, कुपोषण, संसर्गजन्य आजार आणि युद्धजन्य आघात अशा विविध समस्यांशी सामना करताना डॉ. रोझेनबाम, जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व दवाखान्याची प्रयोगशाळा सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी झेंटा रोझेनबाम, इतर पोलिश परिचारिका आणि कोल्हापूरातील कर्मचारी अथकपणे कार्यरत होते. विशेष म्हणजे हे सर्व लक्ष्मी विलास मध्येच रहात होते. त्यांच्या कार्यामुळे पोलिश निर्वासितांचा त्यांच्यावर अपार विश्वास बसला. ख्रिसमस आणि इस्टरच्या सणांमध्ये लक्ष्मी विलास मध्ये धार्मिक कार्यक्रम होत, पोलिश पारंपरिक भोजन दिले जाई आणि रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेता येत असे. लक्ष्मी विलास मध्ये एकाच वेळी इंग्रजी, पोलिश, जर्मन आणि मराठी भाषेची आवर्तने घडत होती. त्यामुळे लक्ष्मी विलास हे केवळ उपचारांचे केंद्र नसून पोलिश संस्कृती आणि सामाजिक जीवनाचेही एक महत्त्वाचे केंद्र बनले होते. लक्ष्मी विलास मधील डॉक्टरांच्या कार्याचे विश्लेषण शासकीय पातळीवरही केले जात होते. रोझेनबाम यांनी रुग्णांचा सरासरी मुक्कामाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करून दाखवला. भाषेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भिंती गळून पडल्या. लक्ष्मी विलासमध्ये निर्माण झालेला डॉ. एडमंड रोझेनबाम यांच्याबद्दलचा विश्वासच त्या दवाखान्याचा सर्वात मोठा उपचार ठरला.
त्यांची मदतनीस असणाऱ्या पोलीश परिचारिका "विएस्तावा क्लेपका " यांनी तेंव्हाच्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
" वळीवडे कॅम्पपासून लक्ष्मी विलास दवाखान्यापर्यंतचा रस्ता हा नितांत सुंदर होता. तो कोल्हापूर शहराबाहेरून, हिरव्यागार शेतांमधून जायचा. दोन्ही बाजूला पेंडगुळाची झाडे (Jungle Flame) रांगेत लावलेली होती. ही झाडे फुलोऱ्याला आल्यावर अक्षरक्ष: पेटल्यासारखी दिसत असत. लक्ष्मी विलासच्या आवारात प्रवेश करताच ते ठिकाण हिरवाईने नटलेल्या शांत नंदनवनासारखे वाटत असे. तिथल्या उद्यानात फिकट हिरव्या मोहोरानी बहरलेली जुनी आंब्याची झाडे, फुलोऱ्यात अत्यंत सुंदर दिसणारी डाळिंबाची झाडे, विविध झुडपे आणि सुगंधी निशिगंधाचे वाफे होते. त्याचा घमघमाट इतका असायचा की तो सहन न झाल्यामुळे आम्हाला डोकेदुखी सुरू व्हायची. रात्रीच्या ड्युटीवेळी, सभोवतालच्या शांततेत बाहेरील ऊसाच्या शेतांचा आवाज समुद्राच्या लाटांसारखा वाटत असे. "
त्यांनी लिहिलेलं हे वर्णन आजच्या तावडे हॉटेल, कावळा नाका, सिंचन भवन, ताराबाई पार्क ते कसबा बावडा या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांचे आहे. हरवलेल्या कोल्हापूरचे आहे. विशेष म्हणजे त्यांना स्थानिक महिला कर्मचाऱ्यांच्या साडीचे ही कुतूहल होते. आज डॉ. एडमंड रोझेनबाम यांचे कुठलेही छायाचित्र अधिकृतपणे उपलब्ध नाही, पण "विएस्तावा क्लेपका" यांचे मात्र खुद्द लक्ष्मी विलास मधील छायाचित्र उपलब्ध आहे. राजाराम महाराजांचा आवडता घोडा शाहनवाज यांचे स्मृतिस्थळ लक्ष्मी विलासच्या प्रांगणात आहे . तिथे काढलेले हे छायाचित्र म्हणजे या माणुसकीच्या उदाहरणाचे एकमेव दृश्य साक्षीदार आहे.
यथावकाश वळीवडे छावणीतील दवाखान्याचे काम पूर्ण झाले आणि लक्ष्मी विलास मधला हा वैद्यकीय विभाग सुरू ठेवण्याचे कुठलेही प्रयोजन उरले नाही. तिथला सर्व कार्यभार हा वळीवडे येथे स्थलांतरीत करण्यात आला.
आज लक्ष्मी विलासकडे पाहताना बहुतांश कोल्हापूरकरांच्या डोळ्यांसमोर राजर्षि शाहू महाराजांचे जन्मस्थळ उभे राहते. किंवा छत्रपती शिवरायांच्या वाघनख्याशी संबंधीत एक ठिकाण म्हणुन ते सध्या परिचित आहे. ते स्वाभाविकही आहे. पण या वास्तूच्या भिंतींनी एक वेगळा इतिहास अनुभवला आहे. त्यांनी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे अश्रू पाहिले आहेत, परदेशातून आलेल्या निर्वासितांच्या वेदना ऐकल्या आहेत आणि एका जर्मन-ज्यू डॉक्टरने राष्ट्र, भाषा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांच्या पलीकडे जाऊन केलेली सेवा अनुभवली आहे.
कदाचित म्हणूनच लक्ष्मी विलास हा केवळ एक राजवाडा नाही. तो कोल्हापूरच्या माणुसकीचा एक जिवंत दस्तऐवज आहे. इतिहासाच्या पुस्तकांत हा प्रसंग कदाचित काही ओळींचा असेल; पण कोल्हापूरच्या माणुसकीच्या परंपरेत तो एक संपूर्ण अध्याय आहे. आणि म्हणूनच डॉ. एडमंड रोझेनबाम, त्यांचे सहकारी आणि लक्ष्मी विलास यांची ही कहाणी केवळ पोलिश निर्वासितांची किंवा एका दवाखान्याची कथा राहत नाही. ती अशा कोल्हापूरची कथा बनते, ज्याने संकटात सापडलेल्या अनोळखी माणसांनाही आपले मानले.
✍
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
विएस्तावा क्लेपका यांचे लक्ष्मी विलासच्या प्रांगणात शाहनवाज घोड्याच्या स्मृतिस्थळाजवळ काढलेले छायाचित्र. मूळ छायाचित्र Black and White असून आजच्या काळाशी सुसंगत वाटावे म्हणुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यात रंग भरलेले आहेत.

महादजी शिंदे यांनी हिंदुस्थानात केली होती गोहत्या बंदी

 


महादजी शिंदे यांनी हिंदुस्थानात केली होती गोहत्या बंदी

✍🏻 लेखक - सुयोग छत्रे✍🏻
---------------------------
महादजी शिंदे म्हणजे इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व ! मराठ्यांचा दरारा 18 व्या शतकात एवढा वाढला होता की शाहआलम या मुघल बादशहाला महादजी शिंदेनी गोहत्या बंदी आणायला भाग पाडले आणि तसे फर्मान सुद्धा अखंड हिंदुस्थानात जाहीर केले! त्या फर्मानाचा मराठी तर्जुमा खालीलप्रमाणे -
“समस्त राज्यप्रवन्धक, खिलाफतचे कार्यकर्ते, तसेंच बादशहांच्या कृपेस पात्र असे अमीर व परगणानिहायचे शासक आणि प्रांतोप्रांतींचे कारभारी व जबाबदार अधिकारी ह्या सर्वांस कळविण्यांत येतें कीं, बादशहाच्या कारभारांत व मालिकगिरींत स्वामींची आज्ञा म्हणून ह्या मुबारिक फर्मानाचें पालन अवश्य करण्यांत यावें, आणि सर्वांनीं स्पष्ट ध्यानांत बाळगावें कीं, पशु सुद्धां विधात्याच्या सृष्टींतले जीव असून ते निरुपयोगी होत असें समजू नये. त्यांतही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत. कारण मनुष्य व पशू ह्या दोघांचेही जीवन धान्याच्या पैदाशीवर अवलंबून असून, गाय व बैल ह्यांच्याशिवाय शेतीचें काम बिलकुल साध्य होणार नाहीं. मेहनतीशिवाय खेती नाहीं. आणि मेहनतीस तर बैलांचें साहाय्य अवश्य पाहिजे. ह्यास्तव जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरूर आहे; आणि गाईवरच मनुष्यांचें व पशुंचें जीवन अवलंबून आहे. ह्यास्तव आमचे प्रिय पुत्र महाराजाधिराज माधवराव सिंधिया बहादुर ह्यांनी आमचेकडे विनंती केली, त्यावरून आम्ही आपल्या उदार अंतःकरणानें व हर्षपूर्ण दृष्टीनें आमच्या समस्त राज्यभूमीमध्यें गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहों. ह्या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यांतील समस्त अधिकाऱ्यांनीं सावधगिरीनें प्रयत्नपूर्वक करून ही आज्ञा पाळीत जावी, कीं जेणेकरून कोणतेंही नगर, कसबा, गांव ह्यांत गोहत्येचें नांव सुद्धां दिसूं नये. इतक्याउपर जर कोणी इसम ह्या आज्ञेच्या विरुद्ध वागून गोवधाच्या पापांत लिप्त होईल, तर तो बादशहाच्या कोपास प्राप्त होऊन दंड पावेल.”
------------------------------
📜मी वरील जो लेख लिहिला त्याला पुरावा
👉🏻मुसलमानी रियासत, खंड- 2, गोविंद सरदेसाई, पान क्रमांक- 429 व 430
👉🏻नक्कल फर्मानशाही दरबाव मुमनियत गौकशी, जी महाराज सिंधीयाचे दरबारात पितळेवर खोदून ठेवलेली आहे, अशी टीप ग्रंथात आहे
👉🏻शहाआलमचा जूलूस सुरू छ २ जमादिलावाल स. ११७३ हिजरी म्ह. २२-१२-१७५९. वरील फर्मान शोभाराम स्मारक ग्रंथमालेतील 'भारतरक्षक' नांवाच्या पुस्तकांत डॉ. रामचंद्र गुप्ता ह्यांनीं प्रसिद्ध केले आहे.

.. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे


 .. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे

दि.१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या प्रचंड पराभवामुळे मराठी साम्राज्याच्या कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा भर माध्यान्ही असलेला सूर्य इथेच अस्ताला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
त्या भयंकर प्रलयंकारी रणकंदनात झालेल्या विश्वासराव व सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूमुळे श्रीमंत थोरल्या नानासाहेब पेशव्यांची मनस्थिती प्रचंड उद्विग्न झाली. त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्यांनी नाना पुरंदऱ्यांना लिहिलेल्या २३ फेब्रुवारी १७६१ च्या पत्रात दिसून येते. त्यात ते म्हणतात - 'चिरंजीव भाऊ आल्यावर मग सर्व मनसबे करावे, चिरंजीव भाऊ जिवंत नसल्यास मजला लढणे नाही. येक भाऊ वाचून दुनिया दौलत व्यर्थ आहे. त्याचे हातचे पत्र पाहीन तेव्हा माझे बायकोस मला जीव येईल. आता तो वेडेपणे आहो. लेक अल्पायुषी होता. सूर्यमंडळ भेदून गेला. ते दु:ख परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकिले परंतु चिरंजीव भाऊ वाचून दुनिया व्यर्थ आहे..!!'
६ जून १७६१ रोजी उत्तरेकडून स्वारी पुण्यास परत आली. पण पानिपतच्या आघातामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांनी शिंदे, पवार, होळकर व ज्येष्ठ सरदारांवर दरबारी कामात कोताई केली असा ठपका ठेवून त्यांचे महाल जप्त केले. प्रकृती अस्वस्थ्याने श्रीमंतांचा कारभारावर ताबा राहिला नाही. शेवटी हवाफेरासाठी त्यांनी पर्वतीवर स्थलांतर केले.
६ जून ते १२ जून पर्यंत नानासाहेब पालखीत बसून पर्वतीवर जात असत. अखेरीस अंगात ज्वर वाढून वाताचे झटके येऊ लागले. वाताच्या झटक्यात 'भाऊ ! भाऊ !' असे किंचाळत. दिवसेंदिवस भाऊसाहेबांच्या शोकेंकरून शरीर कृश झाले. बुद्धिभ्रंश झाला. लोकांस शिव्यागाळी करू लागले. कारभार विपरीत होऊ लागला. पुत्रशोक व बंधुशोक झाला.
अखेरीस तशाच विषण्ण मनस्थितीत पर्वतीवरच्या वाड्याच्या होमशाळेत रघुनाथरावाच्या मांडीवर डोके ठेऊन 'शके १६८३, वृषनाम संवत्सरे, ज्येष्ठ वद्य ६, मंगळवार दि.२३ जून १७६१ रोजी दिड प्रहर रात्रीस' श्रीमंत नानासाहेब पेशवे निजधामास गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी लकडी पुलाजवळ थोरल्या माधवरावांच्या हस्ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नारो केशव बर्वे यांचेबरोबर अस्थी महायात्रेला (काशीस) पाठवल्या.
ह्या अत्यंत दुःखद प्रसंगाचे ६ जुलै १७६१ च्या पत्रात आलेले उल्लेख असे - 'मरणाचे पूर्वी दोन दिवस पर्वतीसच होते. तेथेच मृत्यू आला. मृत्यू होताच शहरची बंदोबस्ती केली. जागा जागा दहा दहा वीस गाडद्यांच्या चौक्या ठोकून वाड्याभोवते हजार बाराशे गाडदी चवकी ठेऊन बंदोबस्त केली मंगळवारचे दिडा प्रहरा रात्रीस. दुसरे दिवशी बुधवारी अग्नी दिला, ते दिवशी शहरात मोठा आकांत झाला.'
१७६० च्या उदगीरच्या लढाईपर्यंत मराठी साम्राज्याचा वारू चहू दिशांना चौखूर उधळत भरधाव सुटला असतानाच झालेला पानिपताचा प्रचंड पराभव, जनकोजी शिंदे, विश्वासराव, सदाशिवरावभाऊंसह अनेक कर्त्या मराठ्यांचा त्यात झालेला मृत्यू हे कमी म्हणून कि काय त्यानंतर सहाच महिन्यात झालेला हा नानासाहेबांचा अकाली मृत्यू राज्याच्या प्रगतीला चांगलीच खीळ घालणारा ठरला. जणू नानासाहेबांना भरला डाव अर्ध्यावरच सोडावा लागला. विस्तारलेल्या राज्याला स्थैर्य प्राप्त होण्याआधीच त्यांचं निधन झालं. पूर्वी नसलेल्या आव्हानांना सामना करण्याची वेळ आली. ह्या कर्तबगार पेशव्यांच्या निधनामुळे राज्याचं तारू वादळात भरकटल्यासारखं झालं होतं.
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड - डॉ.उदय कुलकर्णी
२) पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
३) मराठी रियासत : ६ - पेशवा बाळाजी बाजीराव [सन १७४९ - १७६१] - गोविंद सखाराम सरदेसाई
४) पानिपतचा रणसंग्राम - शंभुराम रामचंद्र देवळे
५) श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे चरित्र - चिंतामण गंगाधर गोगटे

छत्रपती संभाजी महाराज (दुसरे)

 छत्रपती संभाजी महाराज (दुसरे)

छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) हे कोल्हापूर छत्रपती गादीचे दुसरे अधिकृत छत्रपती (कार्यकाळ: १७१४ ते १७६०) होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराज (पहिले) व त्यांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांचे सुपुत्र होते.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात कोल्हापूर राज्याची घडी मजबूत करण्यात आणि करवीर गादीला स्थैर्य मिळवून देण्यात छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमुख मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल:
१. जन्म आणि गादीवर आगमन (१७१४)
  • जन्म: त्यांचा जन्म २३ मे १६९८ रोजी झाला. त्यांचे बालपण सातारा-कोल्हापूर गादीच्या संघर्षात आणि राजकीय अस्थिरतेत गेले.
  • सत्तापालट: १७१४ पर्यंत कोल्हापूर गादीची सूत्रे महाराणी ताराबाई आणि त्यांचे सुपुत्र शिवाजी (दुसरे) यांच्याकडे होती. परंतु, राजघराण्यातील अंतर्गत मतभेद आणि सरदारांच्या मदतीने राजसबाई यांनी पन्हाळगडावर सत्तापालट घडवून आणला. महाराणी ताराबाई व शिवाजी (दुसरे) यांना स्थानबद्ध करून १७१४ मध्ये संभाजी महाराज (दुसरे) यांना कोल्हापूरच्या गादीवर बसवण्यात आले.
२. सातारा आणि कोल्हापूर गादीमधील संघर्ष
संभाजी महाराज (दुसरे) गादीवर आल्यानंतरही सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर गादी यांच्यातील संघर्ष चालूच राहिला.
  • दोन्ही गाद्यांनी स्वतःला मराठा साम्राज्याचे खरे वारसदार मानल्यामुळे अनेक लष्करी लढाया झाल्या.
  • या संघर्षात संभाजी महाराजांना निझाम-उल-मुल्क (हैदराबादचा निझाम) याने सातारा गादीविरुद्ध (शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव यांच्याविरुद्ध) चिथावणी दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु, पेशवे बाजीराव यांच्या पराक्रमापुढे निझाम आणि कोल्हापूर सैन्याचा निभाव लागला नाही.पालखेडच्या लढाईत (१७२८) निझामचा पराभव झाला.
३. 'वारणेचा ऐतिहासिक तह' (१७३१) आणि राज्याला मान्यता
लगातारच्या संघर्षामुळे मराठ्यांचे अतोनात नुकसान होत होते. अखेर, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) या दोन्ही चुलत भावांनी समजूतदारपणा दाखवून गृहकलह संपवण्याचा निर्णय घेतला. १३ एप्रिल १७३१ रोजी 'वारणेचा तह' झाला. या तहाने इतिहास बदलला:
  • स्वतंत्र राज्याला मान्यता: या तहानुसार कृष्णा आणि वारणा नद्यांमधील दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेश कोल्हापूर गादीच्या स्वतंत्र अधिकारक्षेत्रात आला. साताऱ्याच्या गादीने कोल्हापूर गादीचे स्वतंत्र अस्तित्व अधिकृतपणे मान्य केले.
  • शांततेचा काळ: या तहामुळे दोन्ही राज्यांमधील संघर्ष कायमचा संपला आणि कोल्हापूर राज्याला अंतर्गत विकासासाठी आवश्यक असलेली शांतता आणि स्थैर्य लाभले.
४. कोल्हापूरचा विकास आणि प्रशासन
वारणेच्या तहानंतर संभाजी महाराजांनी कोल्हापूर राज्याच्या संरक्षणावर आणि आर्थिक घडी बसवण्यावर भर दिला.
  • त्यांनी पन्हाळगड, विशालगड आणि रांगणा या किल्ल्यांची डागडुजी केली.
  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रबळ आरमार असलेल्या 'सावंतवाडीचे सावंत' आणि 'आंग्रे' यांच्याशी समेट घडवून आणून कोल्हापूरच्या सीमा सुरक्षित केल्या.
  • त्यांच्या काळात करवीर (कोल्हापूर) नगरी धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक समृद्ध झाली. महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थापनाला त्यांनी पाठबळ दिले.
५. उत्तराधिकारी आणि शेवटचा काळ
छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांनी तब्बल ४६ वर्षे कोल्हापूर गादीचा कारभार सांभाळला. मराठा इतिहासात इतका प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या मोजक्या राज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
  • निधन: १८ डिसेंबर १७६० रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
  • वंशावळ: त्यांना स्वतःचा पुत्र नसल्यामुळे, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई (थोरल्या) यांनी खानवटकर घराण्यातून एक मुलगा दत्तक घेतला, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज (तिसरे) म्हणून गादीवर बसवण्यात आले.
ऐतिहासिक महत्त्व:
छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांचे ऐतिहासिक महत्त्व यात आहे की, जर त्यांनी वारणेचा तह केला नसता, तर मराठ्यांमधील गृहकलह स्वराज्याला गिळून बसला असता. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणाने तह करून कोल्हापूरच्या करवीर गादीला सार्वभौमत्व आणि कायदेशीर मान्यता मिळवून दिली, ज्यावर पुढे कोल्हापूरचा गौरवशाली इतिहास उभा राहिला.

छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) - कलासंस्कृतीचे उदार संरक्षक

  छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) - कलासंस्कृतीचे उदार संरक्षक छत्रपती राजाराम महाराज (तिसरे) यांना कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासातील '...