विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

इतिहास संशोधक खरे

इतिहास संशोधक खरे

थोर इतिहास संशोधक खरे यांच्या निधनाला आता ३५ वर्षे झाली. इतिहास अभ्यासंकापैकी खरे यांना पाहिलेले नाही पण त्यांच्या ग्रंथाच्या आणि लेखांच्या रूपाने अनेक जण 'तात्या' या प्रोफेसर खऱ्यांच्या घरगुती नावानेही त्यांना अद्यापही ओळखतात. प्रोफेसर खरे गेले पण इतिहासाच्या विश्वात कीर्ती रुपाने ते चिरंजीव आहेत.
प्रोफेसर खरे यांचा जन्म १० जानेवारी १९०१ रोजी पनवेल येथे झाला. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचे वडील निधन पावले त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना दारिद्र्याचे चटके सहन करावे लागले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण चालू असतानाच संस्कृतमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या निमित्ताने त्यांनी व त्यांच्या काही मित्रांनी आचार्य विनोबा भावे यांच्याकडे भगवद्गीतेचे व काही उपनिषदांचे अध्ययन केले. गीतारहस्य ही त्यांनी विद्यार्थिदशेत वाचले. देशसेवेचे संस्कार झाल्यामुळे त्यांनी व त्यांच्या काही मित्रांनी एक विद्यार्थी मंडळ स्थापन करून त्याद्वारे १९१७ ते १९१९ तीन वर्षे वाईत तीन ठिकाणी रात्रीच्या मोफत शाळा चालवल्या होत्या.
१९२० मध्ये मॅट्रिक झाल्यावर खरे यांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथे पहिल्या वर्षाला असतानाच महात्मा गांधीच्या असहकारितेच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली आणि कॉलेज सुटले. त्यांच्या भाषणामुळे अशांतता माजत आहे अशा आरोपाखाली ते व त्यांचे एक मित्र श्री वि. ना. आपटे यांच्यावर, त्यांनी एक वर्ष अशी चळवळ करणार नाही असा जामीन द्यावा म्हणून खटला दाखल झाला. येरवड्याच्या तुरुंगात त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, गीतारहस्य, तुळशी रामायण इत्यादी ग्रंथांची पारायणे केली.
ज्ञानार्जनाची तळमळ खऱ्यांच्या स्वभावात असल्यामूळे सातारा येथे मुलांना शिकवत असतानाच त्यांनी स्वतःचा अभ्यासही चालू ठेवला होता. आवड आणि परिस्थितीच्या मर्यादा यांमुळे त्यांनी त्याकरिता इतिहास हा विषय निवडला. सातारा येथील वास्तव्यात त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची प्रकाशने आणि इतिहासाचार्य राजवाडे व वासुदेवशास्त्री खरे यांनी संपादित केलेल्या कागदपत्रांची खंड यापैकी मिळतील ती सर्व पुस्तके वाचून काढली व त्यांची टिपणे ही केली. राजवाडे, खरे इत्यादी पूर्वसूरींनी जसे काम केले तसेच आपणही करावे असे अभ्यासातून त्यांना वाटू लागले. नुसते वाटू लागल्यावर थांबण्याचे त्यांच्या स्वभावातच नव्हते. इतिहास संशोधक होण्याचे ठरवल्यावर त्यांनी त्याकरिता पूर्वतयारी सुरू केली. सातारा येथील साडेचार वर्षाच्या वास्तव्यात एवढी पूर्वतयारी केल्यावर त्यांनी अधिक अभ्यासाकरिता पुण्याला जाण्याचे ठरवले तेव्हा इतिहास संशोधक श्री जोशी भारत इतिहास संशोधक मंडळात नोकरी करीत होते. तत्कालीन अडचणीमुळे खऱ्यांना शिवचरित्र कार्यालयात लगेच काही नोकरी मिळू शकली नाही. ते सातारा वरून आले तेव्हा त्यांच्याकडे सगळे मिळून शंभर रुपये होते. शिवचरित्रकार्यालय जरी त्यांना नोकरी देऊ शकले नाही तरी संस्थेकडून त्यांना प्रामुख्याने मोडी कागदपत्रांचे लिप्यांतर करण्याचे काम जमेल तेवढे दिले जाई. त्यातून त्यांना सहा महिन्यांत सुमारे शंभर रुपये मिळाले. या सहा महिन्यांच्या काळात त्यांचा दिनक्रम असा असे: दिवसभर भारत इतिहास संशोधक मंडळात अभ्यास करायचा आणि काही मिळाले तर काम करायचे, अप्पा बळवंत चौकात नूतन मराठी विद्यालय शेजारी असलेल्या आनंदाश्रम या संस्कृत ग्रंथाचा प्रकाशनास वाहिलेल्या संस्थेत जाऊन आंघोळ करायची, एका मित्राकडे घेऊन ठेवलेले दीड पावशेर दूध व दोन पैशांचा पाव यावर होईल तेवढी क्षुधा शांती करून पुन्हा मंडळात अभ्यास किंवा काम करायचे आणि रात्री उपाशी पोटी झोपायचे.
त्यांनी ब्राम्ही व फार्सी यांचे बऱ्यापैकी ज्ञान मिळविल्याचे दिसून आल्यावर १९३० मध्ये त्यांना शिवचरित्रकार्यालयातून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सेवेत घेण्यात आले. तेव्हापासून श्री. शं. ना. जोशी यांच्याप्रमाणेच त्यांनाही दरमहा ५० रुपये पगार मिळू लागला आणि राहण्याकरिता मंडळातच एक छोटी खोलीही मिळाली. मंडळात काम करू लागल्यापासूनच त्यांनी फार्सीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याकरिता पुस्तकांनाच त्यांनी गुरू केले. भावे स्कुलचे प्रमुख श्री. मालशे यांची परवानगी घेऊन काही काळ ते त्या शाळेतील फार्सीच्या वर्गात बसले. याच काळात त्यांनी कानडीचा अभ्यास चालू केला.
सारांश खर्‍यांनी प्रामुख्याने स्वाध्यायाच्या बळावर मोडी, ब्राह्मी, प्राकृत, संस्कृत, उर्दू, कानडी, फार्सी या भाषा उत्तम रीतीने अवगत करून घेतल्या. शाळेत ते इंग्रजी शिकलेले होते; ग्रंथ वाचनाने त्यांनी स्वतःच्या इंग्रजीच्या ज्ञानातही वाढ केली. आवश्यक ती पुस्तके अभ्यासण्याकरता ते पुण्यातील विविध ग्रंथालयांमध्ये जाऊ लागले. मंडळात त्यांच्या अनेक विद्वानांशी परिचय झाला होताच; त्याचाही त्यांना पुस्तके मिळवण्याकरिता चांगला उपयोग झाला. पुढे ते मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटी येथे ही अभ्यासाकरिता भेटी देऊ लागले.
साधारण १९३० पासून खरे यांचे संशोधन प्रकाशित होऊ लागले त्या वर्षी प्रकाशित झालेल्या शिवचरित्रसाहित्य, खंड ३ मध्ये छापण्यात आलेल्या मराठी कागदपत्रं पैकी काही कागदपत्र खर्‍यांनी संपादित केलेले आहेत. पुढे शिवचरित्र साहित्य खंड ६, ११, १२ व १३ हे खंड पूर्णपणे त्यांनीच संपादित केले आणि त्या मालेच्या १४ व्या खंडाच्या संपादक मंडळात ते प्रमुख होते. खर्‍यांना शिवकालाचे जसे सूक्ष्म ज्ञान होते तसेच पेशवे काळाचेही होते. रियासतकार सरदेसाई यांनी पेशवे दप्तरातील निवडक कागदपत्रांचे जे खंड प्रकाशित केले त्यातील अनेक कागदपत्रांचा त्यांनी ठरवलेल्या तारखा चुकलेल्या होत्या. त्या दुरुस्त व्हाव्यात म्हणून त्यांनी 'पेशवे दप्तर पत्रे कालनिर्णय सुधारणा' हे छोटे पुस्तक संपादित व प्रकाशित केले.
खर्‍यांच्या समकालीन इतिहास संशोधकांपैकी बहुतेकांना मोडी येत असल्याने ऐतिहासिक मराठी कागदपत्रे त्यांना वाचता येत. पण आबासाहेब मुजुमदार यांच्या खेरीज फार्सी जाणणारा कोणी मराठी संशोधक तेव्हा नव्हता. खऱ्यांनी फार्सी कागदपत्रांचा सूक्ष्म अभ्यास केला होता हे त्यांच्या संशोधनातील एक ठळक वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक फार्सी साहित्याची सहा खंड त्यांनी संपादित केले. त्यापैकी पहिला खंड १९३४ मध्ये प्रकाशित झाला. त्यात निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल व फारुकी या पाच बादशाह्यांची कागदपत्रे छापलेली आहेत. दुसरा तिसरा व पाचवा या खंडांमधील कागदपत्रे प्रामुख्याने आदिलशाही आहेत. खर्‍यांनी जेवढी आदिलशाही फर्माने संपादित केली तेवढी आत्तापर्यंत कोणीही केलेली नाहीत. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आदिलशाही प्रमाणात पैकी ७५ टक्‍क्‍यांहून अधिक फर्माने एकट्या खरे यांनी संपादित केली आहेत. ऐतिहासिक फार्सी साहित्याचा चौथा खंड प्रामुख्याने पेशवेकालीन कागदपत्रांचे आहे. सहाव्या खंडात औरंगजेबाचे अखबार छापलेले आहेत.
त्यांच्या संशोधनात ऐतिहासिक सत्य शिवाय इतर कोणत्याही गोष्टींना थारा नसे. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर हे त्यांचे पुस्तक मुंबईचा एक प्रकाशक प्रकाशित करणार होता. त्याचे मानधन म्हणून त्याने खरे यांना काही रक्कम दिली. त्या पुस्तकाला एक भक्तीरसप्रधान प्रकरण जोडण्याचा त्याचा विचार असल्याचे त्यांनी खरे यांना नंतर सांगितले. हे पुस्तक संशोधनात्मक असल्यामुळे असे करणे उचित नाही असे वाटून त्यांनी पैसे परत केले आणि पुस्तक स्वखर्चाने प्रकाशित केले.
मोडी व फार्सी प्रमाणे ब्राम्ही व संस्कृतचाही अभ्यास खरे यांनी केला असल्यामुळे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला. दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने या ग्रंथाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या या खंडांमध्ये त्यांनी संपादित केलेले ब्राम्ही, कानडी व संस्कृत कोरीव लेख छापलेले आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात कागदपत्रांचा व इतर वस्तूंचा जो अमूल्य संग्रह आहे तो गोळा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात कर्नाटकात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी मोठ्या परिश्रमाने जी मराठी व फार्सी कागदपत्रे गोळा केली त्यांची संख्या लाखाच्या घरात जाईल. त्याशिवाय सुमारे २०००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे, ३० ताम्रपट व शिलालेख व सुमारे दोनशे ऐतिहासिक वस्तू त्यांनी मंडळास मिळवून दिल्या. मंडळासाठी त्यांनी चार हजारांवर पृष्ठे लिहिली किंवा संपादित केली. त्यांनी लिहिलेल्या लहान-मोठ्या मराठी व इंग्रजी पुस्तकांची संख्या पन्नासहून अधिक आहे आणि त्यांनी लिहिलेल्या मराठी व इंग्रजी लेखांची संख्या सुमारे साडेतीनशे आहे.
त्यांच्या इतिहास संशोधनातील एक विशेष असा आहे की पुरातत्वपासून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासा पर्यंत त्यांच्या ज्ञानाची व संशोधनाची व्याप्ती होती. अशी व्याप्ती असणारा इतिहाससंशोधक महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही कोठे असेल तर क्वचितच असेल. त्यांच्या लेखनातले महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील काटेकोरपणा व मुद्देसूदपणा. त्यांच्या लेखनात पाल्हाळ अजिबात नसे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती ते देत असत.
त्यांच्यासारख्या विद्वानाला आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले यात काही आश्चर्य नाही. इंडियन हिस्टरिकल रेकॉर्ड कमिशनची स्थापना १९१९ मध्ये झाली त्यात भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रतिनिधीला नेहमीच सदस्यत्व असते. १९४२ पर्यंत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार तिथे मंडळाचे प्रतिनिधी मधून जात. त्या वर्षी भारत सरकारने पोतदार यांना व्यक्तीशः प्रतिनिधी म्हणून नेमले. तेव्हापासून तीस वर्ष मंडळाचे प्रतिनिधी म्हणून खरेच तिथे जात. त्यानंतर खरे ही त्या कमिशनवर सरकारने नेमलेले प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले. इंडियन हिस्ट्री काँग्रेस ही मंडळाच्या पुढाकारानेच स्थापन झाली. तिच्या १९५१ मधील अधिवेशनात खरे एका मध्ययुगीन शाखेचे अध्यक्ष होते. खरे स्वतः पदवीधर नसूनही पुणे विद्यापीठाने इतिहास विषयातील डॉक्टरेटची पदवी करिता मार्गदर्शक व परीक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली. १९७४ मध्ये ते न्युमिस्मटिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. डिसेंबर १९७९ मध्ये वॉल्टर येथे झालेल्या इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १९८४ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मानीय डि.लीट देऊन गौरवले. १९८५ च्या जानेवारीत धारवाड येथे भरलेल्या पुराभिलेख परिषदेत त्यांचा गौरव करून त्यांना ताम्रपट देण्यात आला.
असे थोर इतिहास संशोधक आणि भारत इतिहास संशोधक मंडळातील अनेक संशोधकांचे परात्पर गुरू प्रोफेसर गणेश हरी खरे यांचे ५ जून १९८५ रोजी निधन झाले.

संदर्भ:
ग.भा. मेहंदळे लिखित चरित्र 'संशोधकाचे मित्र'
महाराष्ट्राची चार दैवतें. (डॉ ग. ह. खरे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...