विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

होळकर घराणे


होळकर घराणे
लेखक: ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई- विनया खडपेकर
:मयुर हनुमंतराव सुळ

होळकर घराणे मूळ वाफगावचे.त्यांचे कुलदैवत जेजुरी खंडोबा.फलटण परगण्यातील निरा नदीकाठचे होळ गावचे होळकर. या होळ गावी खंडोजी नावाचे गृहस्थ राहत होते.ते चौगुला म्हणजे ग्रामधिकारी होते. खंडोजीना एकुलता एक मुलगा "मल्हार"
मल्हारी तीन वर्षांचा असताना वडील खंडोजीचा मृत्यू झाला.भाऊबंदकी संपत्ती ओढू लागले,मल्हारीची आई जिवाई घाबरून मुलाचा प्राण ही घेतला जाईल ह्या भीतीने आपल्या माहेरी खानदेशात तळोदे गावी आल्या.
मल्हारी मामाची मेंढरे राखू लागला.थोडा मोठा झाल्यावर मामाने त्यांना कदमबांड्याच्या पागेत घातले. मल्हारी सहज घोड्यावरती हुकूमत ठेऊ लागला, हा हा म्हणता तलवार फिरवू लागला मामाने ओळखले हे पाणी वेगळंच आहे .काही दिवसांनी अत्याघरी मुलगी देण्याच्या रुढीनुसार भोजराज ने आपल्या लेकीचे गौतमीचे लग्न मल्हारीशी केले.
मल्हारी आणि बाजीरावांची भेट झाली. दिवस पालटले.बाजीराव पेशव्यांनी 1725 मध्ये मल्हारीला पाचशे स्वरांची मनसब दिली.याप्रमाणे चौगुल्याचा लेक मल्हारी,छत्रपतींचे मानकरी सरदार मल्हारराव होळकर झाले.मल्हाररावांची यशाची कमान वरवर चढू लागली.माळवा प्रदेश ही मल्हाररावांची कर्मभूमी झाली.1721 ते 1731 बाजीरावांनी माळवा आणि त्यांच्या उत्तरेत भागात, मोहिमांचा यशस्वी दणका उडवून दिला.मल्हारराव होळकर,राणोजी शिंदे आणि इतर अनेक मराठा सरदार खांद्याला खांदा लाऊन होते.मल्हाररावांचे राज्य विस्तारत गेले.त्यांच्या महालांची संख्या चार वर्षात, अकरावरून चौऱ्यांऐशीवर गेली.
माळवा प्रदेशात इंदोर हे छोटेसे गाव हेच मल्हाररावांची राजधानी झाली.हकिमाचा वाडा प्रशस्त होता.हा वाडा त्यांनी ताब्यात घेतला. वाड्याच्या भोवती मजबूत तटबंदी उभारली गेली. इंदूरला या भल्यामोठ्या वाड्यात मल्हाररावांचा कारभार सुरू झाला.
खंडेराव आत्ता नऊ वर्षाचा झाले, त्यांचे लगीन लावायचे.मल्हाररावांच्या तोडीस तोड घरानी कमीच होती.किंबहुना न्हवतीच.
सन 1733.मल्हारराव राजनैतिक कारणासाठी पुण्याला निघाले बरोबर सुभेदारी सरंजाम होताच.मार्गावर सिणा आणि हरणा नदीच्या संगमेवर एक छोटेसे गाव लागले.बीड परगण्यातील चौंडी.मल्हारराव ह्या गावात आले.कुलकर्णी-पाटलांनी पुढे येऊन रामराम केला.सुभेदाराना हवं नको विचारायला चार माणसे दिली.मल्हाररावांचा मुक्काम पडला. बगता बगता तिन्हीसांज झाली. दिवेलागणीची वेळ झाली.परकर पोलक्यातील एक मुलगी मंदिराच्या समोर आली.तिच्या हातात तेलवात लावण्याचे साहित्य होते.ती रूपाने सामान्य होती.पण तिची नजर निर्भय होती.निष्पाप होती. मल्हाररावांनसकट राहुट्यामधील सर्व लोकांचे तिने लक्ष्य वेधून घेतले.तिने सराईतपणे खांबाजवळील दिव्यात तेल अाेतले. वाती सरकवल्या.काही क्षणातच गाभारा प्रकाशने भरून गेला.मुलगी कशी सुलक्षणी दिसत होती.मल्हाररावांना आतआतून वाटले,हीच माझी सून.त्यांनी माहिती काढली.
त्या चौंडी गावाचे पाटील माणकोजी शिंदे यांची लेक.या घरात ज्येष्ठ वद्य सप्तमी शके 1647(31 मे 1725) या दिवशी एक कन्यारत्नचा जन्म झाला.तिचे नाव "अहिल्या".
मुलगी पाहताक्षणी मल्हाररावांना वाटले, हीच मुलगी माझ्या घराला योग्य आहे.मल्हाररावांच्या इतमामाला साजेशा धूमधडाक्यात 1733 मध्ये खंडेराव आणि अहिल्या यांचा विवाह झाला.विवाहात वधु 8 वर्षाची तर वर 9 वर्षाचा होता.
वाड्यात नव्या नवरीचे पैंजण वाजू लागले.बीड-अहमदनगर परगण्यातील ही कन्या होळकर वाड्याचे वैभव पाहून प्रथम दिपून गेली.नोकरांनी मुजरे केले तेव्हा गांगरून भारावून गेली,पण तिला जाणवले,या वाड्यात आपण एक महत्त्वाची व्यक्ती आहोत.हळूहळू ही सून गौतमाबाईच्या पाठोपाठ वाडाभर फिरू लागली,हळूहळू सर्वच गोष्टीचं लक्ष देऊ लागली. जे काही सासू सासऱ्यानी सांगावे आणि हिने व्यवस्थित लक्षात ठेवावे आणि सोपवलेली कामे बिनबोभाट पार पाडावीत!सारे काही झटकन समजून घेणारी तिची नजर समंजस होती.बोलणे मोजकेच होते.वागणे धोरणी होते."ता" म्हणत ताकभात ओळखणारी ही सून पाहून मल्हारराव आणि गौतमाबाई समाधानात होते.
वाड्यात वावरत असताना कितीतरी घडामोडी त्यांच्या कानावर येत होत्या.मल्हाररावांच्या हाताखाली खंडेराव तर गौतमाबाई च्या हाताखाली अहिल्याबाई तयार होत होत्या.वयात आल्यानंतर अहिल्याबाई खंडेरावांच्या बरोबर जाऊ लागल्या.अहिल्याबाईंना रणभूमी प्रत्यक्ष दिसू लागली .
मल्हाररावांच्या चाणाक्ष नजरेने टिपले,सुनेच्या मनात आपला शब्दन शब्द कोरला जात आहे.सून लेकापेक्षा सरसच आहे.हळूहळू मल्हारराव त्यांच्यावरती लहान लहान जबाबदाऱ्या सोपवू लागले.त्या जबाबदाऱ्या त्या चोख पार पाडीत. तोफांसाठी लागणारी दारू कशी तयार करायची.कारखाना कसा असला पाहिजे.तसेच अहिल्याबाई यांनी कोणाकोनाकडून जडीबुटी औषधे यांची माहिती करून घेतली.त्या स्वतः उपचार करू लागल्या.मल्हारराव यांनी होळकरांच्या खजिन्याची किल्ली अहिल्याबाईंच्या ताब्यात दिली.त्यांचा दबदबा भोवताली सगळीकडे पसरला.पराक्रमी सासऱ्याचा उजवा हात झालेली धर्मशिल सूनबाई!
कोणाही सरदार पुत्राचा असावा तसा अहिल्याबाईंचा संसार सुरू होता.खंडेराव मुलुखगिरिवर होते.होळकरांचे राज्य विस्तारत होते.बहरत होते. मराठेशाही पराक्रमाची उंच उंच शिखरे काबीज करत होती.
इंदूरच्या वाड्यातून संस्कार घेत अहिल्याबाई वाढत होत्या. हिऱ्याचे पैलू पडत आहेत, हे मल्हाररावांच्या जाणकार नजरेला कळत होते.जनतेच्या दृष्टीने खंडेराव आणि अहिल्याबाई यांचा अनेक सरदार पुत्रांप्रमाणे संस्कार चालू होता.सर्व काही खुशाल होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...