विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## पुरंदरे आणि पुरंदरे वाडा ##




## पुरंदरे आणि पुरंदरे वाडा ##
postsaambhar :Udaykumar Jagtap
बुद्धी आणि पराक्रम यांच्या साह्याने मराठी तख्तासाठी शिवशाहीपासून पेशवाईच्या अस्तापर्यंतस्तापर्यंत इमानदारीने व निष्ठेने सेवा करणारे सासवडचे पुरंदरे घराणे होय. देशस्थ, ऋवेदी , भारद्वाज गोत्री पुरंदरे घराणे पुरंदर किल्ल्याशी निगडित असल्याने कालौघात पुरंदरे किल्ल्याचे मुख्य सत्ताधीश झाले . पुरंदर किल्ल्याशी संबंधित चिंतो महादेव पुरंदरे हे मोठ्या व जबाबदारीच्या पदावर काम करीत होते . पुरंदरेंचा उदयकाल हा राजाराम महाराजांच्या काळात झालेला आहे. सेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबाजीपंत पुरंदर्यांनी पराक्रमाची शर्थ केली. या सेनापतीचा शेवटपर्यंत अंबाजीपंतांवर लोभ होता. शाहू महाराज दिल्लीवरून सुटून आल्यावर महाराजांचे अस्थिर स्थान स्थिर करण्यासाठी अंबाजीपंत पुरंदर्यांनी पराक्रमाची शर्थ केली . यावर महाराज खुश होऊन त्यांनी पेशवाईची मुतालकी पुरंदरेंना देऊ केली. अंबाजीपंतांचे पुतणे मल्हारराव तुकदेव पुरंदरे याना फडणीशी बहाल करण्यात आली. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईच्या काळात अनेक सरदारांची गर्दी झाली पण पुरंदरे मात्र पेशवाईच्या अगोदर पासून छत्रपतींच्या गादीचे सेवक आहेत .असा हा छत्रपतींच्या गादीची मनोभावे सेवा करणारा कर्तबगार पुरुष क्षेत्र माहुली येथे अंतर्धान पावला . अंबाजीपंतांनंतर महादजी ,त्रंबक , सदाशिव,,महादजीपंत,महिपतराव,मल्हार ,धोंडीबा, यांनी मराठी राज्याची सेवा केली . पुरंदरे घराण्याचे ब्रीद "लौकिकी डाग लावून न घ्यावा " याचा आज पर्यंत विसर पुरंदरेंना पडला नाही .याचा खरोखरीचीच कुठेतरी गौरव व्हावा म्हणून मी लिहीत आहे .सासवडमधील मधील अलीकडील दोनचार पिढयांना माहित असलेले सरदार आबासाहेब पुरंदरे त्यांचे सुपूत्र बाळासाहेब पुरंदरे हे या घराण्याचे वंशज . मल्हारराव व त्यांचे सुपुत्र नानासाहेब पुरंदरे याच वंशातील होत . मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी पुरंदरे शेवटपर्यंत लढले व स्वामीनिष्ठा म्हणजे काय असते हे इतिहासात कोंदण करून गेले.इंग्रजांनी पुरंदऱ्यांची बरीच जहागिरी जप्त केली शेवटची सुपे ,भिवंडी ,कोंडीत खुर्द,आणि बुद्रुक चांबळी सासवड हि गावे आबासाहेब पुरंदऱ्यांच्या जहागिरीत राहिली . पुरंदऱ्यांनी पेशव्यांना २० लक्ष रुपये कर्जाचा डोंगर झालेला असताना आपली सर्व सर्व जायदाद इतकेच नाही तर देव्हाऱ्यावरील शंखाची चांदीची अडणीही विकून पेशव्यांना कर्जमुक्त केले अशा पुरंदरेंना मराठी साम्राज्यासाठी केलेली मदत अमूल्य आहे . अशा पुरंदरेंचा वाडा आज सासवड मध्ये इतिहासाची साक्ष देत उभा आहे . हा वाडा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात बांधला आहे आचार्य अत्रेंनी या वाड्याचे वर्णन फार सुंदर रीतीने केले आहे "सरदार पुरंदऱ्यांचा वाडा एव्हडा अजस्र आहे कि तसा वाडा साऱ्या हिंदुस्तानात नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. पुण्यामधील शनिवारवाडा या वाड्याच्या गुडघ्यालाही पोहोचत नाही असे सांगितले म्हणजे त्या वाडयाच्या तटाच्या उंचीची कल्पना येईल ." हा वाडा लढाईच्या दृष्टीने पुरंदऱ्यांनी बांधला. वाड्याचे प्रवेशद्वार हे सिहंगड अथवा पुरंदर च्या प्रवेश द्वारा सारखे आहे गोलबुरुज,आत मोठे चौक,शत्रूंची टिहळणी करण्यासाठी चारही बाजूस तारांगणे आहेत . वाड्यामध्ये गुप्तमार्गाने बाहेर पडण्यासाठी भुयारे आहेत. विहीर आहे. बांधकाम शके १६५३ मध्ये झाले असावे इतकी वर्ष झाली एकही चिरा निखळला नाही. सन १८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाली . शनीवारवाड्यावर union जॅक फडकला, पण सासवड स्वराज्यात होते . पुरंदरेंच्या वाड्यावर इंग्रजांनी तोफांचा बाढीमार केला, तरी वाड्याच्या पूर्व बाजूच्या दगडांचे टपरे उडण्याच्या पलीकडे वाड्याचे काहीही नुकसान झाले नाही जनरल प्रीझलने ८ पौंडी तोफगोळ्यांचा उपयोग होईना म्हणून १६ पौंडी गोळ्यांचा मारा चालू केला पण तरीही उपयोग झाला नाही. पुरंदर्यांनी १० दिवस वाडा शर्थीने लढवला. गढी पडत नाही हे समजल्यावर इंग्रज हताश झाले . शेवटी घात झाला ,फितुरी झाली. महाराष्ट्राला मिळालेला शाप इंग्रजांना वरदान ठरला . इंग्रजांना वाट दाखवली ,इंग्रज वाड्यापर्यंत पोहोचले . ईशान्य तारांगणाजवळ शिड्या लावून वाड्यात शिरले. तारांगण आणि दिवाणखाना जाळला गेला. घनघोर युद्ध होऊन वाडा पडला. इंग्रजांशी शेवटपर्यंत शर्थीने लढून वाड्याच्या दगडी चिर्यांनी स्वामिनिष्ठ। व इमान राखले . अजूनही उर फुटलेले भग्न जळके तारांगण आपल्या अंतरीचे शल्य घेऊन उभे आहे . माझ्या सासवडचा प्रत्येक दगड आणि माती माझ्या गावाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहेत . मी जास्तीत जास्त अचूक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही राहून गेले असेल तर आपण पूर्ण करण्यास मदत करावी .

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...