विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

# दूरदृष्टीचा राजा, राजर्षी शाहू छत्रपती #




# दूरदृष्टीचा राजा, राजर्षी शाहू छत्रपती #

कोल्हापूर शहर व त्याच्या सभोवतालच्या ६०—८० कि.मी. च्या परिघामध्ये फिरत असताना राजर्षी शाहूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला, वावर लाभला वा बांधणीस प्रोत्साहन लाभले अशा अनेक वास्तू पाहायला मिळतात. खुद्द कोल्हापूर शहरात तर ठेचे—ठेचेला अशा गोष्टी संदर्भात राजर्षींच्या दूरदृष्टीचा प्रत्यय अनुभवायला मिळतो. यात अभयारण्या पासून धरण, पिण्यायोग्य पाण्याचे तलाव, दवाखाने, औद्योगिक वसाहती, कापड मिल, मंदिरे, नाट्यगृह, शैक्षणिक संकुले, वसतिगृहे, नदी घाट, समाज भुवनाच्या वास्तू, विविध क्रिडा मैदाने, ग्रंथालये, पुतळे, निराधार प्राण्यांसाठी पांजरपोळ, बँका कितीतरी गोष्टी पाहायला मिळतात. ही यादी हनुमानाच्या शेपटीसारखी मोठी न संपणारी आहे. वरील सर्व बाबींचा विचार केला तर या राजाने फक्त आपल्या ४८ वर्षोच्या आयुष्यात किती क्षेत्रात पथदर्शक वाटा निर्माण केल्या याला काही गणती नाही. शाहूराजा जे—जे ऊत्तम ते—ते माझ्या रयतेला मिळालेच पाहिजे याबाबत आग्रही होता. आता एखादा म्हणेल राजाला काय अशक्य आहे! ती सुप्रसिध्द म्हण नाही का, राजा बोले तैसे दल हाले! पण हे बोलणे व तशी अंमलबजावणी करणे खूप अवघड काम आहे. राजर्षींनी प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टी बाळगणार्‍या व त्यासाठी झोकून देणार्‍या हिर्‍यांची पारख केली व त्या हिर्‍यांना आपल्या भक्कम पाठीब्यांचे कोंदण प्राप्त करून दिले. ही यादी बघायचीच झाली तर खूप मोठी पण वानगीदाखल काही ऊदा मी देतो. गायन संगीत क्षेत्रात अल्लादियाँ खाँसाहेब, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, नाट्य चित्रपट क्षेत्रात कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, शाहीरी क्षेत्रात लहरी हैदर, चित्रकारतेच्या क्षेत्रात आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, शिक्षण क्षेत्रात वासुदेव तोफखाने, दिक्षित गुरूजी, सहकार क्षेत्रात भास्करराव जाधव, इ. अशी शेकड्याने ऊदा देता येतील. शिवछत्रपतींना जसा आपल्या रायगड, राजगड, तोरणा अशा किल्ल्यांबद्दल शेवट पर्यंत लढणार असा विश्वास होता तसाच शाहू छत्रपतींना वरील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रयोगशील तज्ञांबद्दल शेवटपर्यंत आपण योजून दिलेले काम ते करणार याबद्दल दृढ असा विश्वास होता. आजही आपण प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर अर्बन बँक, शिवाजी ऊद्यम नगर, मिरजेचे मेरी वॉनलेस हॉस्पीटल या व अशा अनेक संस्थांची भरभराट बघतो, त्यावेळी शाहूंच्या दूरदृष्टीची दाद द्यावी तेवढी थोडीच असे आपल्याला वाटते. आज कोल्हापूर शहर व भोवतालच्या परिसरात जे जे म्हणून ऊत्तम काम आहे त्याची पायाभरणीच राजर्षींनी केली आहे हे बिनदिक्कतपणे म्हणूनच अभिमानाने सांगू शकतो. हे झाले करवीर संस्थानात त्यांनी केलेले काम ते सोडून त्यांनी राज्यस्तरावर— देशपातळीवर केलेल्या कामाची व योग्य त्या मदतीची तर यादी फारच मोठी आहे. जशी
शिवरायांनी आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे रयतेची काळजी घेतली तोच आदर्श शाहूराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या कृतीने त्यांनी आपण शिवरायांचे सच्चे वारसदार आहोत हे त्यांनी आपल्या कारकिर्दीत कृतीतून सिद्द केले. अाजच्या या पवित्रदिनी या महामानवास विनम्र आभिवादन.
आपला नम्र — इतिहास अभ्यासक भगवान चिले

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...