विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## बाळोजी कुंजीर ##




## बाळोजी कुंजीर ##
postsaambhar :Udaykumar Jagtap बाळोजी कुंजीरांविषयी लिहिण्याअगोदर कुंजीरांबद्दल थोडी माहिती देणे उचित ठरेल . वर्षानु वर्ष सांगत आलेल्या माहितीवरून असे आढळून येते कि देवगिरीच्या १३ शतकातील यादवांच्या कुळी पैकी एक उपशाखा दक्षिणेत स्वारीच्या उद्देशाने महाराष्ट्रातील पुणे येथील पूर्व भागात आली. काही लढाया जिंकल्या काही हरल्या त्या फौजेतील काही सरदारांनी मागे राहायचे ठरवले व ते येथेच कायम स्थायिक झाले बारामती .भुलेश्वर ढवळेश्वर, कानिफनाथ या परिसरात कायमचेच रहिवासी झाले ते पाटील म्हणून त्या गावात राहिले . त्या पैकी काही सरदार हत्तीवरील दलातील प्रमुख होते संस्कृत मध्ये हत्तीला "कुंज म्हणतात त्यांचे दलप्रमुख "कुंजर "कालांतराने ते कुंजीर झाले सासवड जवळील वाघापूर गाव हे कुंजीरांचे मूळ गाव आहे . कालांतराने काही कुंजीर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पांगले दिसतात पण ते पाटील अथवा सर पाटील या पदावर पुढे कार्यरत राहिलेले आहेत . पेशवाईमध्ये नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर शहाणपण संपले असे म्हटले जात असले तरी मराठेशाहीस सावरण्याचा प्रयत्न ज्याने केला त्यात बाळोजी कुंजीरांना अग्रस्थान देण्यात येते. सासवडच्या अंबाजीपंत पुरंदऱ्यांना वाघापूर गाव इनाम म्हणून देण्यात आलेले होते. त्याची पाटीलकी कुंजीर घराण्याकडे होती . पुरंदरे आणि कुंजीरांची घनिष्ट मैत्री होती. सरदार त्र्यंबकराव पुरंदरे यांच्या समकालीन कुंजीर घराण्याची नावारूपास आलेली व्यक्ती म्हणजे बाळोजी सुभानजी कुंजीर होत . पुरंदऱ्यांच्या बरोबर कुंजीर सासवड मध्ये आले आणि पुरंदऱ्यांचा आणि पेशवांच्या संबंधामुळेच बाळोजी कुंजीर पेशवे दरबारात परिचित झाले . दुसया बाजीराव पेशव्यांना पेशवे पदावर पुन्हा आरूढ करण्यात बाळोजी कुंजीर यांनी अत्यंत जिकरीचे काम अवघड परिस्थितीतून पार पडले. याच हुशार व्यक्तीचे कार्य लक्षात घेऊन बाजीराव पेशवे दुसरे यांनी कारभारी पदाची सूत्रे बाळोजी कुंजीरांच्या हाती दिली. कारभारी पदाचा मान एका मराठा व्यक्तीने मिळवण्याची पहिली वेळ होती व हि अवघड कामगिरी स्वीकारली. विठोजी व यशवंतराव होळकरांचे बंडाचे पारिपत्य करण्याची जबाबदारी बाळाजी कुंजीरांवर सोपवण्यात आली व त्यांनी ती चोख बजावली. बाळोजीनी पेशवाईच्या डबडघाईच्या काळात भरीव कामगिरी केली व बाजीराव पेशव्यांचा विश्वास संपादन केला . पुढे पेशवे आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्याला वसईचा तह म्हणतात . पेशव्यांवर खूप अटी लादण्यात आल्या . त्यामुळे पेशवे फक्त नावाला राहिले . पण बाळोजी कुंजीर हरले नाहीत . गुप्तपणे पेशव्यांची मदत घेऊन सैन्याला प्रशिक्षण देवूंन स्व;ताची फौज तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी नीरेच्या पठारावर त्रंबकजी डेंगळेच्या मदतीने केला .हि गोष्ट इंग्रजांना कळली त्यांनी पेशव्यांना दम भरला व बाळोजी कुंजीरांना थांबवण्यात आले .. कुंजीर ग्वाल्हेरला शिंद्यांकडे पेशवांचे मध्यस्थ म्हणून काही काळ राहिले . बाळोजी कुंजीर हे एक प्रामाणिक आणि मराठी साम्राज्याचे खंदे पुरस्कर्ते होते . इंग्रज बाळोजी कुंजीरांना खूप वेळा पेशव्यांकडील सरदारांच्या फुटीसाठी व ते सरदार मिळवण्यासाठी खूप मोठी रक्कम देण्यासाठी तयार असूनही हा प्रामाणिक योद्धा कोणत्याही अमिषाला बळी पडला नाही . ग्वाल्हेरला बाळोजी असताना त्यांनी शिंदे होळकरांचा समेट घडवून इंग्रजांचा विरोधात सैन्य उभे करण्याचा प्रयत्न केला . पेंढाऱ्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्नही त्यांनी करून बघितला . अशा या कर्तबगार पुरुषाचे देहावसान पंढरपूर येथे ९ मे १८१७ मध्ये झाले . या योध्यास माझा सलाम .... बाळोजी कुंजीर यांनी बांधलेला व सासवड मध्ये" कुंजीरवाडा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या वास्तूचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे . बाळोजी कुंजीरांचे भव्य वस्तू बांधण्याचे स्वप्न त्यांच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिले . काळाच्या ओघात आजही त्याची वस्तू सासवड मध्ये ऊन, वारा पावसात कुंजीरांचा इतिहास सांगत ताठ मानेने उभी आहे ...

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...