रवि पार्वती शिवाजी मोरे
Visual storyteller ·
- एकापाठोपाठ एक अशा महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यांची आत्माहुती पडल्या नंतर वादळात सापडलेल्या जहाजासारखी महाराष्ट्राची अवस्था झाली होती . अशावेळी समर्थपणे या नेतृत्वहीन साम्राज्याची धुरा शाहू महाराजांनी आपल्या हाती घेतली व त्याला योजकतेने मार्गाला लावले . त्यांनी आपल्या गरूडा सारख्या पारखी व धुर्त नजरेतुन राज्य वृद्धीसाठी एक एक मोहरे पारखून महाराष्ट्राच्या उत्कर्षाला चालना दिली . राज्य चालवायचे असेल तर त्याला एका दिशेची आवश्यकता असते . त्या प्रमाणे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात एवढी जरब ठेवली होती की ते कुणाचाही मुलाहिजा ठेवीत नसत . त्यांचा शब्द अखेरचा असे . आपल्या शब्दा बाहेर जाणार्यांची ते गय करीत नसत . आणि याच भावनेतुन पुरंदर्यांनी वेळोवेळी पत्र पाठवून महाराजांशी संपर्क साधीत जा अशी बाजीरावांना सक्त ताकीद दिली होती . ही काही दौर्बल्याची उर्मी नव्हती , ही होती शिवतेजाच्या वीर्यशाली वंशाची परंपरा . शाहू महाराजांच्या या करारी स्वभावामुळे पेशव्यांना आपली मनमानी शेवटी पर्यंत करता आली नाही .
शाहू महाराज हे सर्वांना छाया देणारे वटवृक्ष होते . म्हणूनच देशाच्या चतु : सीमेपर्यंत महाराजांची भगवी पताका फडफडत राहिली . राज्याची समृद्धी झाली . सर्वांशी स्नेह - सलोखा ठेवून महाराजांनी नव्या उमद्या विचाराची माणसे जमवली . जी जुनी माणसे बाजुला पडली होती त्यांना अनुकूल करुन मानाची पदे दिली . जी माणसे शहाणी व पोक्त आहेत त्यांच्या मसलतीने चालावे हा त्यांनी आपला धर्म मानला . विश्वास टाकण्याजोगी जी माणसे होती त्यांवर विश्वास टाकून निर्भर राहावे . जे मादकद्रव्याचे सेवन करणारे दारूबाज यांना दुर करुन , प्रधान , प्रतिनिधि आदी करुन अष्टप्रधान व दरखदार यांच्या हाती कारभार व सुभे सांगून चालविले .
शाहू महाराजांनी रामेश्वर आदी अनेक पवित्र स्थाने मुक्त करुन त्याचा कारभार स्थानिक लोकांच्या हाती देऊन त्या वरील वसूल खंडणीच्या रूपाने जमा करण्याचा इंतजाम केला . पश्चिमेकडील द्वारका हे स्थान मुक्त केले व त्या वर खंडणीच्या रूपाने अंमल बसविला . उत्तर प्रदेशात सेना पाठवून त्याचा बंदोबस्त करणे व खंडणीचा अंमल चढवून त्याला आपल्या सेवकांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी आपल्या अधिपत्याखाली फौजा पाठवून केला . खंडणी , पैका आणून हुकुमाप्रमाणे चालावे अशी पेशवे व इतर सरदारांच्या वर जरब बसवली . शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या अस्मितेला कुठे तडा जाऊ दिला नाही . उलट उत्कर्षा साठी त्यांनी वरचेवर प्रोत्साहन देऊन मराठा साम्राज्याची वृद्धी केली . कोणतेही सरकार पैशा शिवाय चालत नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे आणि त्या काळी सारी आर्थिक शक्ती सावकारांच्या ठायी एकवटली होती , परंतु असा जोखमीचा व्यवहार करणार्यांनाही परकीय आक्रमणा पासुन धोका होताच . यासाठी त्याला सुरक्षित राज्य कारभाराचे पाठबळ असणे आवश्यक होते आणि ते शाहू महाराजांनी त्यांना दिले होते . सावकारांनी आपल्या राजधानीतच येऊन सावकारीचा व्यवहार करावा म्हणून त्यांना दिलेले प्रोत्साहनपर पत्र खाली दिले आहे .
" मनोहरदास सावकार वसती सुरत यांस दिल्हे अभयपत्र ऐसे जे - तुम्ही सातार्यास येऊन सावकारी करावी ऐसी उमेद धरून भवानी शंकर व मेहेरमहंमद यांनी हुजुर येवून विदित केले . ऐशास तुम्हास सावकार लोकांचा संग्रह करावा . हे स्वामीस अगत्य आहे . तरी कोणे विशी शंका न धरिता येथे सावकारी व्यवसाय करुन सुखरूप रहाणे , कोणे बाबे आजार लागणार नाही . स्वामी तुमचे चालवतील . या पत्रावरून सातार्याच्या राजधानीस वैभव संपन्न करावे अशी महाराजांची इच्छा होती .
छत्रपती शाहू महाराजांचा स्वभाव -
प्रजेविषयी काळजी असणार्या राजा बद्दल प्रजेला आदर असतो . शाहू राजे हे सर्वसामान्य प्रजेचे राजे होते . पितृवात्सल्याने ते प्रजेकडे पाहत . स्त्री - पुरुष , लहान - थोर अधिकारी या सर्वांशी शाहू महाराज कधीही अंतर ठेऊन वागत नसत . ते सर्वांशी समभावाने वागत . गुन्हेगारांनाही महाराजांच्या बद्दल आदर होता . त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना कुणी असे शत्रू नव्हते . त्यांच्या कडे कुणीही मोकळ्या मनाने तक्रार मांडू शकत असत . शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व मराठा राज्यातील एक मानबिंदू ठरले . महाराजांच्या चांगल्या गुणांमुळे ते मराठेशाहीत आदर्श ठरले . त्यांच्या कडे माणसातील चांगले गुण हेरण्याची कसब होते . म्हणूनच कुशल , पराक्रमी असे सरदार त्यांच्या सेवेत सामील झाले . अशा कर्तबगार माणसांना पुर्ण स्वातंत्र्य देऊन स्वराज्याच्या विस्तारासाठी त्यांचा उपयोग करून घेतला . लोकांच्या अडचणींना साथ देणे हा महाराजांमधील फार मोठा गुण होता . शेतीकडे त्यांचे फार लक्ष असे . वृक्षारोपणाने परिसर सदाहरित राहावा , यात त्यांचे योगदान फार मोठे होते . प्रजेवरील प्रेमापोटी त्यांनी अनेक कर कमी केले . आणि ते वसूल करण्यासाठी त्यांनी कुणावरही दडपण आणले नाही . अशा प्रकारची तुमची कर योजना पाहिजे असे ते राज्यकर्त्यांना सांगत असत . मी आणि प्रजा यात वेगळेपण नाही हा त्यांच्यातील महान गुण होता . ते लोकांच्या सुख : दुखात सामील होत . निरनिराळ्या समारंभात , उत्सव , विवाह समारंभ यात ते कोणताही उच्च -नीच भेदाभेद न करता ते स्वतः सामील होत . या त्यांच्या उदार वृत्ती मुळे लोक त्यांना " आपला राजा " मानीत . शाहूराजांना पुण्यश्लोक अशी बिरूदावली दिली गेली होती आणि ती योग्यच होती . ते वृत्तीने धार्मिक व श्रद्धाळू होते आणि ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती . शिस्तीत ते फार महत्व देत . शिकार हा त्यांचा आवडता छंद होता . उत्तम घोडे , जवाहीर , भरजरी वस्त्रे , दुर्मिळ फुले , फळे यांचा संग्रह करण्याचा त्यांचा छंद होता . शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व रसिक आणि दिलखुलास होते . त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचा मराठा साम्राज्यावर फार मोठा परिणाम होता .
संदर्भ - मराठी रियासत
छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सैंदणे
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा
🙏🚩🚩

No comments:
Post a Comment