मराठा बाणा / मराठा वृत्ती हा भारतीय राष्ट्रवादाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि ' स्वराज्य ' व 'मराठा साम्राज्य ' यांची वैचारीक भूमी आहे . राजकीय विचार आहे . महाराष्ट्राची ही राजकीय ओळख आहे . भारतीय इतिहासाच्या संदर्भात ' मराठा ' एक राजकीय एकक ( political entity ) आहे .
मराठ्यांची इतिहासविषयक कर्तबगारी व त्यामागील त्यांची राजकीय दृष्टी समजून घेताना , आंग्ल विद्वान ऑक्वर्थ साहेबांचे एक अवतरण महत्वाचे ठरते . मराठ्यांची भारतातील अन्य प्रांतियांशी तुलना करुन ऑक्वर्थ लिहितात ,
" Others in this country are knit together by other causes : they are castes , religious sects , tribes but Marathas are a Nation , and from Brahman to the Kunbi they glory the fact . "
' मराठा ' ही संज्ञा ' राष्ट्र ' म्हणून , व ' मराठा धर्म ' ही संज्ञा
' राष्ट्रीयत्वाचा धर्म ' म्हणून शिवक्रांती कालापासून विकसित व विस्तारीत होऊ लागली . ही ' मराठा ' वृत्ती सर्वांनाच अभिमानाची होती . हा भारतीय राष्ट्रियत्वाचा पहिला हुंकार होता . यामागे शिवरायांची प्रेरणा व राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाने राजकारणाला , मुत्सेदद्दीगिरीला , लष्करीक्षेत्राला तसेच भाषा व्यवहाराला दिलेले निरपेक्ष व मोलाचे योगदान हे प्रमुख कारण होते .
भाषावार प्रांतरचनेच्या निमित्ताने , व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगाने महाराष्ट्र हे ' मराठी ' राज्य असेल की ' मराठा ' राज्य असेल असा शंकाकुल प्रश्न माडखोलकरांनी उपस्थित केला होता . त्याला उत्तर देताना यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट केले होते की ,
' मराठा हा जातिवाचक शब्द नाही ; आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्रास ' मराठा ' नाव दिले ते काय
' जातिवाचक ' होते ? ' असा सवालही केला होता .
महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना नीट माहीत आहे आणि कळला आहे अशांना ' मराठा ' शब्दाचा विकास व विस्तार होत होत तो राष्ट्रक ( nationality )
या धर्म - जातनिरपेक्ष राजकीय ओळखीपर्यंत कसा उन्नत होत गेला हे सहज उमगेल . लो .टिळकांनी सुरु केलेल्या इंग्रजी वर्तमानपत्राला जे ' मराठा ' नाव दिले तेही राष्ट्रवाचकच होते . ' मराठा ' शब्द केवळ जातवाचक नाही . किंबहुना ' मराठा ' हा शब्द एक political entity म्हणून कसकसा विकसित होत गेला हे समजून घेतले तर त्याची व्यापकता समजून येईल . कोणतेही राष्ट्र भिन्न भिन्न धर्म , जाती , पंथ - उपपंथ , वर्ग यांनी मिळूनच साकार होते . म्हणूनच राष्ट्रक नावाची भूमी , प्रांगण राजकीय संघटनाला मुलभूत व व्यापक आधार प्राप्त व्हावा यासाठी आवश्यक असते . ' मराठा ' या political entity ने ही भुमिका समर्थपणे यशस्वी केली ती बहुधर्मीय , बहुजातीय , बहुवर्गीय समुहाच्या सर्वसमावेशक एकत्रीकरणातून. ' मराठा ' शब्दाला हीच व्यापक पार्श्वभूमी आहे . सुज्ञ इतिहासकारांनी शेकडो वर्ष याच अर्थाने ' मराठा राज्य ' , ' मराठा स्वराज्य ' , ' मराठा साम्राज्य ' संबोधले . इतिहास लेखणात मराठा शब्दाची
हीच राजकीय ओळख आहे .
महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत न्या. रानडे म्हणतात ,
" It is the History of the formation of a true Indian Nationality " " जेव्हा एकूण एक माणसाच्या ह्र्दयात राष्ट्रत्वाचे बीज पेरले जावे किंवा स्वत्वाचा भक्कम आणि खोल पाया बसावा , तेव्हाच असे अलौकिक पराक्रम घडून येतात ...."
आचार्य अत्र्यांचा ' मराठा ' , लो. टिळकांचा ' मराठा ' व पुण्यात स्थापन झालेले ' मराठा ' चेंबर ही निश्चितच राष्ट्रवाचक नावे आहेत . कोणीही दावा करु शकणार नाही की या संस्था ' मराठा ' जातिचे प्रतिनिधीत्व करत होत्या .
ही नावे मराठा राज्य / राष्ट्र / महाराष्ट्र या संकल्पनेचे सुचक म्हणूनच निवडली गेली .
रविंद्रनाथ टागोर यांनी शिवरायांविषयी जे गौरवपूर्ण निबंध लिहीले त्यात ते म्हणतात संपूर्ण भारतात ज्यांनी राष्ट्र ही संकल्पना समोर ठेऊन ' स्वराज्य ' निर्माण कले ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज .
राष्ट्रनिर्मिती ही ' मराठा साम्राज्या ' ची भूमी होती . त्यातूनच सर्वसमावेशक ' मराठा आत्मभान ' विकसित होत गेले . त्याला मानवतेशी जोडणारी भुमिका महर्षी शिंदे यांनी मांडली ती सर्वार्थाने योग्य आहे , सर्व समुहास सामाऊन घेणारी आहे , जात , धर्म , पंथनिरपेक्ष आहे .
राष्ट्रकाच्याही पुढे जाणारा महर्षी वि. रा .शिंदे यांनी जो
' मराठा ' शब्दाचा विचार मांडला तो प्रमाण मानला तर ' मराठा ' एका अर्थाने मानवतेपर्यंत व्यापक होतो .
या ' मराठा ' वृत्तीचे योग्य वर्णन शिंदे यांनी केले आहे .
जग हे नव्हे मराठ्यापुरते , पसरे ते अनाद्यनंती ।।
राहणीचे जे साधे , स्वार्थाबाहेर जे पाहती ।।
सत्याची भूक जयांना , अन्याया ते न सहती ।
ते सर्वस्वी अस्सल मराठे ।।
तात्पर्य ,
ज्यांची राहणी साधी असते ,
जे स्वार्थाच्या पलीकडे पाहतात , व
ज्यांना सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असते
ते अस्सल मराठे असे शिंदे सांगतात .
मराठा जातिसमुहासहीत प्रत्येक मराठी माणसाने
' मराठा ' शब्दाचा हा व्यापक अर्थ सयजून घेतला आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून निर्माण झालेल्या
जात - धर्मनिरपेक्ष राष्ट्रियतेचे भान ठेवले तर इतिहास लेखनास व आकलनास यापेक्षा योग्य अशी निरपेक्ष दृष्टी कोणती?
त्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आवाहन करतात ,
" महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि मराठे या दोन वीर बंधूंची संयुक्त कृती आहे . जसा त्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडवून हा इतिहास निर्माण केला तसे आता यापुढे त्याचे शब्दचित्रही दोन्ही जातीच्या विद्वानांनी लेखणीला लेखणी भिडवून रेखाटले व रंगवले पाहिजे . पूढील चित्रपटाच्या रेखा वक्र होऊ नयेत व रंगात भेसळ होऊ नये यासाठी आतापासूनच दोघांनी सावधगिरी व श्रम घेण्यात कसूर करु नये ."
#शाहूपर्व
#जागर_इतिहासाचा
#मराठा_कोण

खूपच छान माहिती thank you for sharing हे पण वाचा > राजमाता जिजाऊ अप्रतिम भाषण निबंध मराठी माहिती !
ReplyDelete