विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

महायोद्धा संताजी : दोडेरीचा संग्राम भाग १

 महायोद्धा संताजी : दोडेरीचा संग्राम


भाग १
संताजी घोरपडे म्हणजे एक वादळ, संताजी घोरपडे म्हणजे एक विजेचा लोळ, संताजी घोरपडे म्हणजे पराक्रमाचा महामेरू. सरनोबत संताजींची दहशत औरंगजेब पासून साधारण मोगली शिपाया पर्यंत सगळ्यांनाच होती. ते व्यक्तिमत्व तसंच होतं - निडर आणि अतिशय पराक्रमी. मोगल इतिहासकार खफी खान म्हणतो की संताजींशी युद्ध म्हणजे तीनच परिणाम - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सरनोबत झालेल्या संताजींनी अनेक लढाया गाजवल्या. महाराष्ट्र पासून कर्नाटक ते जिंजी ह्या सगळ्या पट्ट्यात मोगल सैन्याला त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. अशा अनेक लढायांपैकी एक संस्मरणीय लढाई म्हणजे दोडेरीची लढाई. ह्या लढाईची जास्त माहिती मराठी ऐतिहासिक दस्तैवजांपेक्षा मोगल इतिहासकारांच्या नोंदीत आढळते. साकी मुस्तैद खान आणि खाफी खान दोघंही ह्या लढाईचे वर्णन करतात - तसेच जदुनाथ सरकार ह्यांनी सुद्धा मोगल संदर्भांचा अनुवाद केलेला आहे.
संतांजींचे डावपेच - मोगल सैन्याची दाणादाण
संताजी कर्नाटक प्रांतात धुमाकूळ घालत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने 2 वेगळ्या फौजा पाठवल्या. मातब्बर सरदार खानाजद खान बरोबर सफशिकान खान, सय्यद असालत खान आणि मुहम्मद मुराद खान ह्यांच्य्या बरोबर एक फौज संताजींवर रवाना झाली. त्या पेक्षा मोठे संकट म्हणजे सिरा चा मोगल सुभेदार आणि प्रसिद्ध मोगली सरदार कासीम खानाची फौज सुद्धा खानाजाद खानाच्या फौजेला येऊन मिळाली.
खानाजद खानाच्या पाहुणचारासाठी कासीम खानाने स्वतःच्या अख्त्यारीतले महागडे नवे कोरे कर्नाटकी तंबू, सोने, चांदी, धातू आणि चिनी मातीची भांडी काढली आणि स्वतःच्या तंबू आणि सामग्री बरोबर तीन कोस आघाडीला पाठवली. ३ कोस पुढे प्रशस्त जागी छावणी उभारून तळ ठोकण्याचा मनसुबा खानाने केला होता. ह्या सगळ्या ताम-झामा ची बातमी संताजींना समजताच त्यांनी एक अतिशय चलाख योजना आखली. नेहमीप्रमाणे गनिमाच्या ध्यानीमनी ही नसताना विजेच्या वेगानी हल्ला करून शत्रूला जबर तडाखा द्यायचे असे संताजींनी ठरवले. स्वतःच्या सैन्याचे त्यांनी ३ तुकड्यांमध्ये विभाजन केले. पहाट उजाडत असतानाच पहिल्या तुकडीने हल्ला चढवला आणि वर सांगितलेलं सर्व किमती सामान लुटून नेले. कासीम खानला ही बातमी कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खानाजद खानला झोपेतून न उठवता तो स्वतः गनिमाचा समाचार घेण्यास निघाला. संताजींची दुसरी तुकडी तिथे त्याची वाटच बघत होती - कासीम खानाच्या सैन्याची जबरदस्त कत्तल झाली. थोड्या वेळात खानाजद खान मुक्कामी तळ सोडून कासीम खानाच्या मदतीला आला. सगळे मातब्बर मोगल सरदार आणि बरेच सैन्य लढाईमध्ये गुंतले होते तेव्हा अचानक संताजींच्या तिसऱ्या तुकडीने त्यांच्या मुक्कामी तळावर हल्ला चढवून उरले सुरले सगळे सामान पण लुटून नेले !!!!! ह्यातून आपल्याला झलक मिळते ती संताजींच्या डावपेच आखण्याच्या कौशल्याची !!
जोरदार लढाई चालू असताना मुक्कामी तळावर झालेला हल्ला आणि लुटालूटीची बातमी जेव्हा दोन्ही खानांना समजली तेव्हा त्यांना जबरदस्त हदरा बसला. संताजींच्या वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत असल्यामुळे मोगलांना नक्की किती शत्रू आहे आणि तो कुठल्या बाजूने हल्ला चढवतोय ह्याचा अंदाज आला नसावा. दोघांनी निर्णय घेतला की जवळच्या दोडेरी किल्ल्यात आश्रय घ्यावा - हा किल्ला तेव्हा मोगलांच्याच ताब्यात होता. किल्ल्यासमोर एक पाण्याचे तळेही होते. मोगली फौज लढत लढत संध्याकाळ पर्यंत किल्ल्याजवळ पोचली. संताजींची फौज त्याच्या मागोमाग त्यांचा पाठलाग करत होती - पण आता त्यांनी पाठलाग थांबवून किल्ल्याहुन थोडा लांब स्वतःचा तळ ठोकला. आधीच संकटात सापडलेल्या कासीम खानाच्या फौजेला किल्ल्यातल्या मोगली फौजेनी आत घेण्यास साफ नकार दिला !!! ह्याचं कारण होतं कि किल्ल्यात अतिशय मर्यादित धान्यसाठा होता. शेवटी २-३ दिवसांनी मोठ्या कष्टानी आणि काही वेळा आतल्या फौजेची फसगत करून कासीम खानाच्या फौजेनी शेवटी गढीत प्रवेश केला. संताजींनी किल्ल्याला वेढा घातला आणि तलावाचा ताबा घेतल्याने किल्ल्यातल्या शिबंदीचे पाणी मारले गेले.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...