महायोद्धा संताजी : दोडेरीचा संग्राम
पोस्तसांभार :: https://adityagokhale.wixsite.com/.../santajighorpadedode...
मोगली सैन्य नामोहरम
ह्याच दरम्यान चितळदुर्गचा जमीनदार बरमाप्पा नायक, ज्याला मोगलांच्या हातून त्रास झाला होता, संताजींना येऊन मिळाला. संताजींनी गढी वर हल्ला चढवला - हा हल्ला परतवण्यात किल्ल्यातील दारुगोळा रिकामा झाला. दुसरीकडे किल्ल्यातले अन्नधान्य आणि चारा पण खूप लोकात आणि जनावरात वाटला गेल्याने संपुष्टात यायला लागले. मोगल फौजेची अवस्था वाईट होती. मराठा शिबिरात बरंच अन्नधान्य व सामग्री होती. हे सगळं त्यांनी किल्ल्याच्या आतल्या मोगलांना आस्मानी भावाने विकायला सुरवात केली. तरीही एवढ्या फौजेला रसद पुरवठ्याला येणं शक्यच नव्हतं. बरेच सैनिक भुकेनी मरायला लागले, घोडे एकमेकांच्या शेपट्या चारा समजून चावायला लागले. ह्यातच वेढ्याच्या तिसऱ्या दिवशी कासिमखान मरण पावला. त्याच्या मरणाबद्दल साकी मुस्तैदखान म्हणतो की अफूचे व्यसन असलेला कासीमखान अफू न मिळाल्याने मरण पावला. ह्या उलट खफी खान म्हणतो कि एक तर कासीम खान पराभवाच्या नैराश्यातून विष खाऊन गेला किंवा मग अफू न मिळाल्याने मरण पावला. कारण काही असो, संताजींच्या कुशल आणि अचूक युद्धनीतीने मोगलांच्या एका बलाढ्य सरदाराचा साफ फडशा पाडला हे मात्र नक्की.
भुकेने बेजार झालेल्या आतल्या सैन्यापैकी बऱ्याच सैनिकांनी किल्ल्याच्या तटावरून उड्या टाकल्या. काही शत्रूशी सामना करायच्या गोष्टी करू लागले तर कोणी शरण जायच्या. संताजींनी वेढा चालूच ठेऊन किल्ल्यातल्या शिबंदीची चोहो बाजूनी नाकाबंदी केली. संताजींची फौज गढीच्या चोहोबाजूनी जोरदार हल्ला चढवत होते - बंदुकीच्या गोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवरच्या अनेक गनिमांना टिपत होते. आता फार वेळ अशा स्थितीत गडात राहणे शक्य नाही हे खानाजद खानला कळून चुकले. इथे राहिलो तर संताजींची फौज आपल्या पूर्णच फौजेचा फडशा पाडेल अशी भीती त्याला वाटू लागली. लढाईच्या जागी असलेल्या एका साक्षीदाराचा हवाला मस्सीर मध्ये दिला आहे - त्याच्या मते एक तृतीयांश मोगली फौज पहिल्यांदी तंबू मारले त्या लढाईत आणि किल्ल्याबाहेरच्या तलावा जवळच्या लढाईत मारली गेली होती. त्यातच संताजींच्या फौजेनी गढीचा एक बुरुज उडवून दिला. आता खानाजद खानाने हार मानली आणि संताजींशी तहाची बोलणी चालू केली. तहाच्या अटीनुसार संताजींनी कासिमखानाचे पैसे, सर्व चीजवस्तू, भांडी-कुंडी, हिरे-पाचू, दाग-दागिने आणि त्याच बरोबर घोडे आणि हत्ती सर्व जप्त केले. साकी मुस्तैदखानाच्या अंदाजाप्रमाणे तहात संताजींच्या हाती लागलेल्या मोगली संपत्तीचे मूल्य ६० ते ७० लाखाच्या घरात असावे. अशी जबर खंडणी मोगलांकडून वसूल करून मावळ्यांनी गनिमाला ३ दिवसानंतर वाट दिली - प्रत्येक मोगल सैनिकाला त्याचा घोडा व स्वतःचे कपडे घेऊन जायला परवानगी देण्यात आली, बाकी सगळं खंडणी म्हणून वसूल करण्यात आलं.
संताजींच्या अतुलनीय युद्धनीती आणि डावपेचंपुढे मोगल फौज आणि त्याचे मोठे मोठे सरदार पूर्ण नामोहरम झाले होते. एका अर्थाने शत्रू आपल्यावर चालून यायच्या आधीच संताजींनी शत्रूलाच गाठून पूर्ण नेस्तनाबूत केले - गनीम एका हल्ल्यातून सावरतोय तोच दुसरा हल्ला, त्यातून सावरायचा आत तिसरा हल्ला. मोगलांची मालमत्ता, खजिना, रसद आणि पाणी तोडून संताजींनी मोठं-मोठ्या मोगल सरदारांच्या फौजेला गुडघे टेकायला लावले. स्वतःचा जीव वाचवून लाजेने मान खाली घालत खानाजद खान, राहिलेले सरदार आणि फौज दोडेरीहून माघार घेऊन निघून गेली. संताजींच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या फौजेचा निर्विवाद असा विजय झाला. ह्या लढाईच्या थोड्याच दिवसानंतर संताजींनी बसवपट्ट्णम जवळ हिम्मत खान नावाच्या अजून एका बलाढ्य मोगल सरदारला लढाईत गाठून यमसदनी धाडले. थोड्या दिवसांच्या अंतराने महायोद्धा संताजींच्या पराक्रमाला २ मोठे सरदार बळी पडल्याने मोगलांची जबरदस्त पीछेहाट झाली आणि संताजींच्या कारकीर्दीवर अति-उच्च असा कळस चढला.

No comments:
Post a Comment