विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती भाग ४

 महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती

पोस्तसांभार :: आदित्य गोखले

भाग ४
महाराणी ताराबाईंच्या युद्धनीतीची ठळक वैशिष्ट्ये
सर्व युद्ध वृत्तांत आणि फौजांच्या हालचाली बघितल्या तर महाराणी ताराबाईंनी किती वेगळी, चलाख आणि कुशल युद्धनीतीचा वापर केला हे लक्षात येते
१. किल्ले मोगलांकडे देण्यामागे एक मोठा डावपेच होता असे स्पष्ट दिसते. किल्ले स्वाधीन केल्याच्या वर दिलेल्या तारखा बघितल्या तर असे दिसते की त्या सगळ्या पावसाळ्याच्या थोड्या आधीच्या तारखा आहेत. म्हणजे ७-८ महिने मोगलांना वेढ्यात गुंतवून ठेवायचे, शेवटी त्यांच्याच कडून भली मोठी रक्कम स्वीकारायची आणि आपल्या सेनेला सुरक्षित वाट मिळण्याच्या अटीवर मिळालेले पैसे घेऊन निघून जायचं. ताराबाईंनी कोंढाण्याच्या किल्लेदाराची कानउघडणी करताना किल्ला ठरल्या वेळेपेक्षा आधीच मोगलांच्या स्वाधीन कसा केला अशी विचारणा एका पत्रात केली आहे. ह्यावरून त्यांचे हे डावपेच स्पष्ट होतात. असे करून १-२ किल्ले घेण्यास मोगल सेनेला पूर्ण वर्ष लागायचं शिवाय मराठ्यांना खंडणी मिळायची ते वेगळच. महाराणींना मनात हे पक्के माहीत होते की हे किल्ले कधी ना कधी आपण मोगलांकडून सहज पुन्हा हस्तगत करू. मनुची लिहितो की मराठ्यांचा असा मनसुबा होता की मोगलांनी ताबा घेऊन एकदा किल्ल्यात रसद व अन्य सामग्रीची व्यवस्था केली की विजेच्या चपळाईने हल्ला करून किल्ला परत आपल्याकडे घ्यायचा !!!
२. दुसरा महत्वाचा डावपेच होता तो म्हणजे युद्धाचे क्षेत्र वाढवण्याचा - ही कूटनीती अत्यंत महत्वाची आणि प्रभावी ठरली. औरंगजेबाची पूर्ण ताकत व लक्ष त्यावेळी स्वराज्यावर केंद्रित होते. स्वराज्याच्या आसपास माळवा, खानदेश, गुजरात, बिजापूर, कर्नाटक असे मोगली सुभे होते. महाराणी ताराबाईंनी ह्या मोगली वतनावर आपले सरदार पाठवून चौफेर तुफान हल्ले चढवले, लुटालूट माजवली, शहरे बेचिराख केली,प्रचंड खंडण्या वसूल केल्या. ह्यामुळे औरंगजेबाला एक डोळा स्वराज्यातल्या किल्ले मोहिमेवर तर एक डोळा स्वतःच्या सुभ्यांच्या संरक्षणवर ठेवावा लागत होता. आधीच एक-एक किल्ला जिंकण्यासाठी महत्प्रयास करावा लागत होता, पैसे मोजावे लागत होते - त्यात ह्या मराठा सीमोल्लंघना मुळे त्याच्या डोक्याला एक वेगळीच कटकट निर्माण झाली. युद्ध हळूहळू त्याच्या आटोक्याच्या बाहेर जायला लागलं होतं
३. ह्या सगळ्या धुमश्चक्रीत मोगलांवर गनिमी कावा करून छोटे हल्ले चालूच होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातला फौजेवर हल्ला, विशाळगडहुन परतणाऱ्या आणि पावसाचा प्रसाद मिळालेल्या मोगली फौजेवर हल्ला करून त्यांची उरली सुरली वाताहत पूर्ण करणे अशी कित्येक उदाहरणं आहेत. त्याच बरोबर काही वेळा तर मराठा फौजा थेट औरंगजेबाच्या छावणीभोवती घिरट्या घालत असल्याच्या एक पेक्षा जास्त नोंदी आहेत. १७०६ मध्ये वकिनखेडा हुन बहादूरगड छावणीकडे निघालेल्या औरंगजेबाला रस्त्यात अनेक मराठा हल्ल्यांना आणि छाप्यांना तोंड द्यावे लागले. मोगल सैन्याला रस्त्यात गाठून त्यांची सामग्री आणि रसद मारून त्यांची पार भंबेरी उडवण्याचे अनेक प्रसंग झाले. हे सर्व महाराणींच्या कुशल युद्ध-नीतीचा एक भाग होय.
४. मोगल प्रदेशावर हल्ला करून मिळवलेली खंडणी व चौथ हे स्वराज्याच्या कामास अत्यंत उपयोगी पडले असणार. स्वराज्याच्या बऱ्याचशा मुलखात मोगलांच्या आक्रमणामुळे महसूल व कर व्यवस्था ह्यावर परिणाम झाला असणार. रयत सततच्या युद्ध खाली होरपळत होती. अशा वेळी दौलतीची मिळकत तसेच युद्धखर्च ह्या दोन्ही गोष्टींची सोय ह्या खंडणी मुळे झाली. दुसरा फायदा असा की ह्यामुळे मोगलांना ह्या सर्व प्रदेशातून मिळणाऱ्या आर्थिक आणि रसद रुपी मदतीवर विपरीत परिणाम झाला असणार.
.
५. १७०५ नंतर मराठा सैन्यानी हरलेले सगळे किल्ले पुन्हा स्वराज्यात आणायला सुरवात केली. ह्या वेळी औरंगजेब थोडा सह्याद्री पासून लांब वकिनखेडा मोहिमेवर होता. ही संधी साधून लोहगड आणि राजमाची काही महिन्यातच पुन्हा स्वराज्यात दाखल झाले. कोंढाणा परत स्वराज्यात आणण्याची जबाबदारी शंकराजी नारायण सचिवांना देण्यात आली. त्यांचे सरदार त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव व रामजी फाटक ह्यांनी माळा लावून पुन्हा कोंढाणा स्वराज्यात आणला. पुढे १७०७ मध्ये राजगड आणि १७०८ ला तोरणा सुद्धा पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करण्यात मराठा फौजेला यश आले
राजाराम महाराजांच्या निधना नंतर महाराणी ताराबाईंनी मोगलांशी उघडलेली तहाची बोलणी साफ धुडकावण्यात आली होती. तेव्हा जेमतेम २५ वर्ष वय असलेल्या ह्या रणचंडिकेच्या वेगळ्या परंतु अत्यंत प्रभावी युद्धनीती आणि डावपेचांनी मोगलांचे दक्षिणेतील संपूर्ण साम्राज्य हादरून सोडलं. ह्या काळात औरंगजेबाला अशी खात्री पटायला लागली की हे सगळे युद्ध आपण करतोय ते व्यर्थच - मराठ्यांना पूर्णपणे जिंकणं अशक्य आहे. १७०३-०४ ला एक काळ तर असा आला की औरंगजेबानीच महाराणी ताराबाईंशी तहाच्या वाटाघाटी चालू केल्या होत्या - त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही.
अशा ह्या शूर आणि अत्यंत चलाख रणवाघिणीला मानाचा त्रिवार मुजरा !!!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...